संदीप नलावडे

इस्रालय-हमास युद्धात गाझा शहरातील रुग्णालये संकटात सापडली आहेत. अनेक रुग्णालये जखमी रुग्ण, वैद्यकीय कर्मचारी आणि तिथे आश्रय घेतलेल्या विस्थापित नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनली आहेत. युद्धाच्या नियमानुसार रुग्णालयांना विशेष संरक्षण असते. मात्र हा नियम इस्रायल-हमास युद्धात पायदळी तुडवला जात असल्याचे दिसून येत आहे. वैद्यकीय सुविधांना आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यांतर्गत विशेष संरक्षण असतानाही हे का घडते, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.

mining projects in sindhudurg
सिंधुदुर्गातील खनिज प्रकल्प कायमचे बंद व्हावेत; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणवाद्यांना अपेक्षा
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका
CJI DY Chandrachud
केंद्रीय तपास यंत्रणांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोलाचा सल्ला; म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित…”

गाझातील रुग्णालयांची स्थिती कशी आहे?

गाझामधील आरोग्य सुविधा गेले काही दिवस इस्रायल-हमास संघर्षांच्या कात्रीत सापडल्या आहेत. अल शिफा या प्रमुख रुग्णालयावर हल्ला करण्यात आल्यानंतर हा संघर्ष आणखी वाढला आहे. शिफा रुग्णालयातून हमासच्या बंदूकधारी दहशतवाद्यांना नेले जात असल्याचा दावा करून इस्रायलने रुग्णवाहिकांनाही लक्ष्य केले. शस्त्रक्रिया विभागात गेल्या आठवडय़ात गोळीबार झाला. इस्रायलचे सैनिक आणि हमासचे अतिरेकी यांच्या संघर्षांचा फटका रुग्णालयातील रुग्ण, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बसत असल्याचे या रुग्णालयाच्या प्रशासनाने सांगितले. इस्रायलचे म्हणणे आहे की, हमासचे दहशतवादी ढाल म्हणून रुग्णालयांचा वापर करत आहेत. रुग्णालयात आश्रय घेतलेल्या नागरिकांना इजा केली जात असल्याचा  पॅलेस्टाइनचा आरोप आहे. ताज्या वृत्तानुसार, शिफा रुग्णालयाच्या परिसरात इस्रायली रणगाडे शिरले आहेत. संयुक्त राष्ट्रांनीही या हल्ल्याची दखल घेतली असून तात्काळ युद्धबंदी करण्याची सूचना केली आहे.

हेही वाचा >>> आयएएस कोचिंग संस्था जाहिरांतीमधून दिशाभूल कशी करतात? २० संस्था दोषी कशा आढळल्या?

इस्रायलचे म्हणणे काय?

हमासने रुग्णालये, शाळा आणि मशिदींसारख्या संवेदनशील ठिकाणांचा ताबा घेतला आहे. दहशतवादी येथे दबा धरून बसल्याचा दावा इस्रायलने केला आहे. रक्तपात हाच हमासचा उद्देश असून केवळ आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष जावे आणि त्यांची सहानुभूती मिळविण्यासाठी हमास रुग्णालये, शाळा या ठिकाणांचा वापर करत आहे, असे इस्रायलचे म्हणणे आहे. भूमिगत दहशतवाद्यांचा तळ असलेल्या ठिकाणांसह शिफा रुग्णालयाचा सचित्र नकाशा इस्रायलने जारी केला आहे. हमास, तसेच शिफा रुग्णालयाचे संचालक मोहम्मद अबू सेलमिया यांनी याचा इन्कार केला आहे. गेल्या आठवडय़ात शिफा रुग्णालयातून जखमी रुग्णांना बाहेर काढणाऱ्या रुग्णवाहिकांच्या ताफ्यावर इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्यात १२ जण ठार झाले. मात्र इस्रायलचे म्हणणे असे, की रुग्णवाहिकांमध्ये हमासचे दहशतवादी सैनिक होते. इस्रायलचे मुख्य लष्करी प्रवक्ते डॅनियल हॅगारी यांनी सांगितले की, इस्रायली सैन्याने रुग्णालयाला वेढा घातलेला नाही, तर रुग्णालयाच्या पूर्वेकडील ठिकाणांहून रुग्णांना सुरक्षित बाहेर जाण्यासाठी परवानगी दिली आहे. इस्रायली लष्कर रुग्णालयाच्या संपर्कात असून येथे उपचार घेत असलेल्या बालकांना वेगळय़ा रुग्णालयात हलविण्यास मदत करणार आहे.

पॅलेस्टाईनचे म्हणणे काय?

अनेक विस्थापित पॅलेस्टिनी कुटुंबांनी रुग्णालये, वैद्यकीय केंद्रांमध्ये आश्रय घेतला आहे. युद्धामध्ये रुग्णालयांना विशेष संरक्षण देण्याचा नियम असल्याने पॅलेस्टिनी नागरिकांनी रुग्णालयांमध्ये आश्रय घेतला आहे. मात्र इस्रायलच्या सैन्याने या नियमाचे उल्लंघन केले असून रुग्णालयांवरही हल्ले केले असल्याचे पॅलेस्टाईनचे म्हणणे आहे. शिफा रुग्णालयात सुमारे १५०० रुग्ण, १५०० वैद्यकीय कर्मचारी आणि १५ हजार विस्थापित नागरिक अडकून पडले आहेत, असा दावा पॅलेस्टाईन प्रशासनाने केला आहे. एका हल्ल्यात वीजपुरवठा खंडित होऊन रुग्णालयातील अनेक वैद्यकीय उपकरणे बंद पडली. त्यात अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. ‘इनक्युबेटर’मधील अनेक नवजात बालकांनाही जीव गमवावा लागला. गाझामधील आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, युद्ध सुरू झाल्यापासून १९० वैद्यकीय कर्मचारी ठार झाले आहेत. इस्रायलच्या सैन्यांनी २० रुग्णालये आणि ३१ रुग्णवाहिकांवर हल्ले केले आहेत.

हेही वाचा >>> ‘अल शिफा’ रुग्णालयाचे युद्धभूमीत रूपांतर; गाझा शहरात नेमके काय घडतेय? जाणून घ्या….

आंतरराष्ट्रीय कायदा काय सांगतो?

आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा युद्धादरम्यान रुग्णालयांना विशेष संरक्षण प्रदान करतो. परंतु लढाऊ सैनिकांनी लपण्यासाठी किंवा शस्त्रे ठेवण्यासाठी त्यांचा वापर केल्यास रुग्णालये त्यांचे संरक्षण गमावू शकतात, असे रेड क्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीने (आयसीआरसी) म्हटले आहे. मात्र अशा हल्ल्यांपूर्वी अनेकदा इशारा व सूचना देणे आवश्यक आहे, असे आयसीआरसीच्या कायदा अधिकारी कॉर्डुला ड्रोगे यांनी सांगितले. ‘‘शिफा रुग्णालयात हमासचे दहशतवादी केंद्र असल्याचे सिद्ध करण्यात इस्रायल यशस्वी झाले तरी आंतरराष्ट्रीय कायद्याची चौकट कायम राहील,’’ असे ओहायो येथील केस वेस्टर्न रिझव्‍‌र्ह विद्यापीठाच्या लष्करी नीतिशास्त्रतज्ज्ञ जेसिका वोल्फेंडेल यांनी सांगितले. निष्पाप जीवितहानी लष्करी उद्दिष्टाच्या तुलनेत विषम असेल तर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार अशा हल्ल्यांना परवानगी नाही, असे त्यांनी सांगितले. रुग्णालये, शाळा किंवा प्रार्थनागृहे लष्करी उद्देशांसाठी वापरली जात असल्याने त्यांचा संरक्षित दर्जा गमावला जाऊ शकतो. मात्र त्यासाठी भरभक्कम पुरावे देणे आवश्यक असल्याचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे वकील करीम खान यांनी सांगितले.

sandeep.nalawade@expressindia.com