वळवाचा पाऊस एखाददुसरा दिवस यायचा. या वर्षी त्याने मे महिन्यात १६ दिवस मुक्काम केला. दुष्काळी मराठवाड्यात पावसाचे स्वागत होतेच. पण मे महिन्यातील या पावसामुळे काही नवे प्रश्न निर्माण होतील. मे महिन्यातील पावसामुळे निर्माण झालेली सकारात्मक भावना खरीप हंगामात टिकून राहील?
मराठवाड्यात किती पाऊस पडला आणि त्यामुळे नुकसान किती?
राज्यभर पडत असणाऱ्या वळवाच्या पावसामुळे मराठवाड्यात मोठे नुकसान झाले. वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या २५ असून, २९ जण जखमी झाले आहेत. ४६५ लहान-मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला. मे महिन्यात पडणाऱ्या पावसामुळे वीज पडण्याचे प्रमाण अचानक वाढले. विभागात ४०३ एवढीच वीज अटकाव यंत्रे आहेत. त्यातील ३५० यंत्रे फक्त बीड जिल्ह्यात लावलेली आहेत. मात्र, या यंत्रांचा उपयोग होतो का, याचा अभ्यास झालेला नाही. आता बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांवर हे काम सोपवले आहे. अनेक बागायती पिके काढण्याआधीच अवकाळी पावसामुळे ८६३६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. जोरात पाऊस झाल्यावर कोठे पाऊस होऊ शकतो, याचे आढावे पूर्ण होण्याआधी नदीनाले दुथडी भरून वाहू लागले. पुरात नागरिक वाहून जाण्याच्या घटनाही नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि बीड जिल्ह्यात घडल्या. शहरी भागातील अनेक रस्त्यांना नदीचे रूप आले. दुचाकी वाहने वाहून गेली. वळवाच्या पावसाने फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक झाल्याचे चित्र आहे.
वळवाच्या पावसाचा लाभ किती?
वळवाच्या पावसाने पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे मराठवाड्यासारख्या दुष्काळी भगात धूळपेरणी करून पावसाची वाट बघावी लागली नाही. आता ओल असल्याने आणि वापसा झाला तर पेरणीस सुरुवात होऊ शकते. पण पुढे पाऊस कधी, याचा अंदाज घेण्यासाठी हवामान विभागातील अधिकारी कोणती सूचना देतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. करोनानंतर अनेक तरुण मुलेही शेतीमध्ये उतरली असल्याने पेरणी कधी करावी, याचे संदेश देण्याची यंत्रणा अधिक चांगली झाल्याचा दावा कृषी विभागातील अधिकारी करतात. पाण्याच्या पातळीत भर पडल्याने या पावसाचे नुकसान कमी आणि लाभ अधिक होईल, असे मानले जात आहे.
पीक पद्धतीवर परिणाम होईल?
मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील पिकांमध्ये फारसे बदल होणार नाहीत. गेल्या काही वर्षांत सोयाबीनचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. पूर्वीचे कापसाचे क्षेत्र या वर्षी आणखी घसरेल, असा दावा केला जात आहे. १३ लाख ७२ हजार हेक्टरवर कापूस आणि त्याच्या दुप्पट म्हणजे २६ लाख १९ हजार हेक्टरवर सोयाबीन असे या वेळी पेरा राहील, असा अंदाज आहे. या वळवाच्या पावसानंतर पीक पद्धतीमध्ये फारसा बदल होणार नाही. मात्र, पेरणी कधी होईल, याचे वेळापत्रक पुन्हा बिघडेल, असेच चित्र आहे. पूर्वी दुष्काळी स्थितीमुळे तर आता वळवाच्या पावसामुळे पेरणी लांबेल, असे सांगण्यात येते. वेळेआधी पाऊस झाल्याने उडीद आणि मूग या दोन्ही पिकांचा पेरा वाढेल असे सांगण्यात येते. त्याचबरोबर स्टार्च आणि इथेनॉलसाठी मका पिकांचा उपयोग होणार असल्याने या वर्षी छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांत मका पीक वाढेल. या वर्षी मका पिकास बाजारपेठेत चांगला भाव असल्याने मका पिकाचे क्षेत्र वाढू शकेल, असा अंदाज आहे. पण हे सारे समीकरण वेळेवर पेरण्या झाल्या तरचे आहे. या वर्षी पहिल्यांदाच कृषी विद्यापीठाच्या वतीने संशोधकांच्या परिषदेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांचे पतमानांकन न पाहता कर्ज देण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत. मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या पावसाने आशादायक सुरुवात केली आहे. फक्त ऐन पेरणीच्या काळात पावसाने दगा देऊ नये, अशी भीती मात्र वळवाच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मनात आहे.
खरीप हंगामात नावीन्यपूर्ण काय असेल?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात डाळिंब आणि धाराशिवमध्ये ऊस लागवडीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचे ठरविण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत उसाच्या वाढीसाठी विविध प्रयोगही करण्यात आले आहेत. कळंब तालुक्यातील रांजणी साखर कारखान्याने फवारणीसाठी ड्रोनचा उपयोगही केला होता. त्यामुळे या हंगामात पाण्याच्या योग्य नियोजनाचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.
या पावसाचा सिंचनासाठी उपयोग होईल?
तापमान वाढीमुळे आटलेल्या सिंचन प्रकल्पात पाण्याची मोठी भर नसली तरी जूनच्या मध्यापर्यंत कोरडेच राहणाऱ्या प्रकल्पांमध्ये आता काही अंशाने पाणी आले आहे. मान्सूनच्या पावसामुळे त्यात भर पडत राहील. मराठवाड्यात ८७५ मोठे, मध्यम, लघू प्रकल्प तसेच गोदावरी व मांजरा नदीवरील बंधारे आहेत. मे महिन्यात लातूर, नांदेड आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी पूरस्थितीला सामोरे जावे लागले. नांदेड, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत अनेक शेतांत पाणी साचले आहे. त्याचा निचरा झाल्याशिवाय पेरणी होणार नाही. त्यामुळे वळवाच्या पावसाचा दिलासा खरीप हंगामात शेती उत्पादनासाठी होईल का, याविषयी शंका व्यक्त केल्या जात आहेत. सर्वत्र बियाणे पोहोचले असले तरी रासायनिक खतांचे साठे कसे करावेत, याच्या सूचना पाठविल्या जात आहेत. सिल्लोड किंवा आष्टी-पाटोदा अशा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राशी जोडलेल्या तालुक्यातील खत उतरविण्याचे थांबे बदला, अशा सूचना रेल्वे विभागाला देण्यात आल्या आहेत. वळवाचा पाऊस पडताना खरिपाची लगबग सुरू असली तरी हा पाऊस ऐन पेरणीच्या काळात कायम राहील का, ही भीती आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष द्या, मगच पेरणीला सुरुवात करा, असे कृषी अधिकारी सांगत आहेत. २०१४ ते २०२४ या काळात पाच वर्षे सरासरीपेक्षा कमी तर पाच वर्षे सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. या वर्षी सकारात्मक संकेत असले तरी शेतकऱ्यांनी सावधपणे पावले उचलावीत, असेच सांगण्यात येत आहे. जूनमध्ये जमिनीमध्ये ओल असल्याने पेरण्या लवकर होतील, असे चित्र आहे.suhas.sardeshmukh@expressindia.com