US President Donald Trump assassination Attempt : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर वर्षभरापूर्वी एका प्रचारसभेत जीवघेणा हल्ला झाला होता. या घटनेचा तपास आता पूर्ण झाला असून अमेरिकेच्या संसदीय समितीने त्यासंदर्भातील अहवाल सादर केला आहे. विशेष बाब म्हणजे- या अहवालात अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणांच्या कार्यपद्धतींवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी शिफारसही त्यात करण्यात आली आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार कुणी केला होता? आणि संसदीय समितीने सादर केलेल्या अहवालात गुप्तचर यंत्रणेवर कोणकोणते प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले? त्यासंदर्भातील घेतलेला हा आढावा…

१३ जुलै २०२४ रोजी पेनसिल्वेनियातील बटलर शहरातील एका प्रचारसभेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला होता. या हल्ल्यातून ते थोडक्यात वाचले होते आणि हल्लेखोराने धाडलेली गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली होती. त्यानंतर पोलिसांनी २० वर्षीय थॉमस क्रूक्स या हल्लेखोराला ठार मारले होते. या घटनेत एका अमेरिकन नागरिकाचा मृत्यूही झाला होता. दरम्यान, या प्रकरणावर अमेरिकेतील सीनेटच्या होमलँड सिक्युरिटी अँड गव्हर्नमेंटल अफेअर्स कमिटीने एक अहवाल सादर केला आहे.

ट्रम्प यांच्या सुरक्षेतील चूक अत्यंत गंभीर होती आणि त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असं या अहवालात म्हटलं आहे. दरम्यान, गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराला नवसंजीवनी मिळाली होती. या हल्ल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. रिपब्लिकन पार्टीने हेच फोटो त्यांच्या प्रचारात वापरले आणि अमेरिकेतील मतदारांना प्रभावित केले. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना मोठी लोकप्रियता मिळाली आणि त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अगदी सहजपणे जिंकली.

आणखी वाचा : जम्मू-काश्मीरमध्ये ‘शहीद दिन’ साजरा करण्यावर बंदी; अनेकांना नजरकैदेत ठेवलं; कारण काय?

सिनेटच्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?

  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारसभेतील जीवघेण्या हल्ल्याच्या तपासावर अमेरिकेच्या संसदीय समितीने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
  • हल्लेखोराच्या हेतूबाबत काहीही नवीन माहिती उघड न होताच अहवालात टाळता येण्यासारख्या चुकांची मालिका झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
  • गुप्तचर यंत्रणेच्या या चुकांमुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा जीव धोक्यात आला होता, असं अमेरिकेच्या संसदीय समितीने अहवालात म्हटलं आहे.
  • अमेरिकेच्या सीनेट होमलँड सिक्युरिटी व गव्हर्नमेंटल अफेअर्स कमिटीचे रिपब्लिकन अध्यक्ष रँड पॉल यांनीही यावर भाष्य केलं आहे.
  • गुप्तचर यंत्रणेनं विश्वासार्ह माहितीच्या आधारावर कारवाई केली नाही. तसेच त्यांना स्थानिक पोलिस यंत्रणांशी समन्वय साधण्यात अपयश आले, असं त्यांनी म्हटलं आहे.
  • ते म्हणाले की, या अपयशानंतरही कोणालाही नोकरीवरून काढून टाकण्यात आलं नाही. विशेष म्हणजे- या घटनेत संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचं अपयश दिसून आलं होतं.
  • प्रशासकीय उदासीनता, स्पष्ट धोरणांचा अभाव व डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणाऱ्या धमक्यांवर गुप्तचर यंत्रणेनं थेटपणे दुर्लक्ष केल्यामुळे ही स्थिती ओढवली होती.
  • जबाबदार व्यक्तींवर कारवाई झालीच पाहिजे आणि यापुढे असं पुन्हा होऊ नये यासाठी ठोस सुधारणा अंमलात आणल्या पाहिजे, असंही पॉल यांनी स्पष्ट केलं.

चुका झाल्याच होत्या– गुप्तचर यंत्रणांचा खुलासा

अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणांनी देखील आपली चूक मान्य केली आहे. एका अधिकाऱ्याने या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, या प्रकरणात तांत्रिक व मानवी चुका झाल्या असून, त्यावर उपाययोजना सुरू आहेत. यामध्ये विविध सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय वाढवणे व हवाई पाळत ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणे यांचा समावेश आहे. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सहा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. त्यांना १० ते ४२ दिवसांपर्यंत वेतनाविना निलंबनाची शिक्षा देण्यात आली असून, सर्व कर्मचाऱ्यांची कनिष्ठ पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे.

US Senate Report reveals about assassination attempt on Donald Trump Did Secret Service
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाल्याची घटना १३ जुलै २०२४ रोजी घडली होती.

हेही वाचा : ‘या’ देशाने मुख्य नदीवरील ३०० धरणं पाडली, वैज्ञानिकांच्या सांगण्यावरून जलविद्युत केंद्रेही केली बंद; कारण काय?

डोनाल्ड ट्रम्प नेमके काय म्हणाले?

या आठवड्यात फॉक्स न्यूजवरील ‘My View with Lara Trump’ या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याबाबत भाष्य केले. “गुप्तचर यंत्रणेकडून चुका झाल्या होत्या; पण तपासाबाबत मी समाधानी आहे. पोलिसांनी दूरवरून एकाच गोळीत हल्लेखोराचा खात्मा केला, जर तो मारला गेला नसता तर परिस्थिती आणखीच गंभीर झाली असती.ते क्षण मी कधीच विसरू शकणार नाही. त्यावेळी नेमकं काय घडतंय हे मलाही समजत नव्हतं. माझ्यावर हल्ला झाला, यात काहीच शंका नाही; पण सुदैवाने मी पटकन खाली वाकल्याने माझा जीव वाचला,” असं ट्रम्प म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कसा झाला हल्ला?

दरम्यान, या हल्ल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे माध्यमांशी बोलताना म्हणाले, “ईश्वर माझं नेहमी रक्षण करतो आणि करीत राहील. माझ्यावर झालेल्या हल्ल्याबाबत मी फारसा विचार करीत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद सांभाळणे इतके सोपे नाही आणि त्याबद्दल जास्त विचार करणं मला आवडत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाल्याची घटना १३ जुलै २०२४ रोजी घडली होती. एका हल्लेखोराने झाडलेली गोळी त्यांच्या कानाला चाटून केली होती. या हल्ल्यात एक अमेरिकन नागरिक ठार झाला होता, तर ट्रम्पसह आणखी दोन जण जखमी झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी अचूक लक्ष्य साधत हल्लेखोराला ठार केलं होतं. ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याची संपूर्ण जगभरात चर्चा रंगली होती. आता या हल्ल्यावरून अमेरिकेच्या संसदीय समितीने गुप्तचर यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.