अर्जदाराच्या समाजमाध्यमांवरील पोस्टच्या आधारे त्यांचे ‘ऑनलाइन व्यक्तिमत्त्व’ तयार करण्यात येते. त्यात अर्जदाराने कट्टर विचारसरणी किंवा दहशतवादी संघटनांच्या समर्थनार्थ पोस्ट, कॉमेंट्स किंवा लाइक्स दिले असल्यास त्याचा अर्ज रद्द केला जातो.
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये डेटा जर्नलिझम (विदा पत्रकारिता) या विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी एक लाख डॉलर अर्थात ८९ लाख रुपयांची स्कॉलरशिप मिळालेल्या कौशिक राज या २७ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याला अमेरिकेने व्हिसा नाकारला आहे. समाजमाध्यमांवर पोस्ट केलेल्या बातम्यांच्या दुव्यांमुळे (लिंक) आपला व्हिसा नाकारण्यात आल्याचे कौशिकचे म्हणणे आहे. मात्र, अमेरिकेने व्हिसा नाकारताना दिलेल्या कारणांमध्ये ‘मायदेशी परतण्याचा हेतू नसणे’ हेही कारण दिले आहे. हा नकार का, त्यामागची कारणे काय आणि असा नकार टाळण्यासाठी तज्ज्ञांकडून दिल्या जाणाऱ्या सूचना यांचा हा आढावा
कोर्सच्या आदल्या दिवशी नकार!
कौशिक राज हा भारतातील मुक्त पत्रकार आहे. भारतात त्याने केलेल्या वार्तांकनाच्या आधारे कोलंबिया विद्यापीठातील ‘डेटा जर्नलिझम’ अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवीच्या शिष्यवृत्तीकरिता त्याची निवड करण्यात आली. यासाठी त्याला एक लाख अमेरिकी डॉलर इतकी रक्कम देण्यात येणार होती. अमेरिकेत जाण्यासाठी कौशिकने अर्ज केल्यानंतर कागदपत्र पडताळणी करण्यात आली. त्यानंतर २९ जुलै रोजी त्याची मुलाखतही घेण्यात आली. मात्र, अचानक १४ ऑगस्ट रोजी त्याचा व्हिसाचा अर्ज फेटाळण्यात आला. विशेष म्हणजे १५ ऑगस्टपासूनच कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाची सुरुवात होणार होती.
अमेरिकेने दिलेली कारणे
कौशिकला व्हिसा नाकारताना देण्यात आलेल्या पत्रात नकाराचे स्पष्ट कारण देण्यात आलेले नाही. मात्र, ‘अमेरिकेतील तुमच्या उद्देशित कृती अस्थलांतरित व्हिसाशी संबंधित नियमांशी सुसंगत असतील, हे तुम्ही सिद्ध करू शकला नाहीत….अमेरिकेत आल्यानंतर तुम्हाला आपल्या मायदेशी परतण्यास भाग पाडतील, असे नातेबंध (भारताशी) असल्याचेही तुम्ही सिद्ध करू शकला नाहीत,’ असे या पत्रात म्हटले आहे.
समाजमाध्यमांवरील ‘शेअरिंग’मुळे नकार?
आपण समाजमाध्यमांवर शेअर करत असलेल्या बातम्यांच्या लिंकमुळे व्हिसा नाकारण्यात आल्याचे कौशिकचे म्हणणे आहे. ‘मी समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे काहीही पोस्ट करत नाही. मात्र, भारतातील द्वेषमूलक गुन्हे आणि मुस्लिमांबाबतचे वर्तन यासंदर्भात केलेल्या बातम्यांच्या लिंकमुळे मला व्हिसा नाकारण्यात आला,’ असा कौशिकचा दावा आहे. व्हिसासाठी घेतलेल्या मुलाखतीदरम्यानच काैशिककडून त्याच्या समाजमाध्यम खात्यांचा तपशील घेण्यात आला होता.
‘समाजमाध्यम पडताळणी’ अतिमहत्त्वाचीच
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेनंतर याचवर्षी एप्रिलपासून अमेरिकेत येणाऱ्यांसाठी व्हिसा मंजूर करताना समाजमाध्यम पडताळणीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. विद्यार्थी, कर्मचारी आणि पर्यटक यांना व्हिसासाठीच्या मुलाखतीदरम्यान गेल्या पाच वर्षांतील सर्व समाजमाध्यम खात्यांचा तपशील व्हिसा अधिकाऱ्यांना द्यावा लागतो. तसेच ही सगळी खाती अधिकाऱ्यांची पडताळणी पूर्ण होईपर्यंत ‘सार्वजनिक’ ठेवणे बंधनकारक असते. अर्जदाराच्या समाजमाध्यमांवरील पोस्टच्या आधारे त्यांचे ‘ऑनलाइन व्यक्तिमत्त्व’ तयार करण्यात येते. त्यात अर्जदाराने कट्टर विचारसरणी किंवा दहशतवादी संघटनांच्या समर्थनार्थ पोस्ट, कॉमेंट्स किंवा लाइक्स दिले असल्यास त्याचा अर्ज रद्द केला जातो. अमेरिकेच्या सुरक्षेस धक्का पोहोचवतील असा राजकीय हिंसाचार, हिंसक उठाव, विद्वेषी विचार, गुन्हेगारी संघटनांशी संबंध, यहुदींविषयी विखारी मते व्यक्त केल्याचे आढळल्यासही अर्जदाराचा व्हिसा नाकारण्यात येतो.
‘मातृभूमीची ओढ’ का महत्त्वाची?
अमेरिकेच्या स्थलांतरित कायद्याच्या कलम २१४ (ब) नुसार, केवळ अमेरिकेत येण्याचे योग्य कारण असणेच पुरेसे नाही. तर, अमेरिकेतून मायदेशी परतण्याचे सबळ कारणही अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे. तसे नसल्यास व्हिसा रद्द होऊ शकतो. तात्पुरत्या व्हिसाच्या आधारे किंवा विद्यार्थी, कर्मचारी व्हिसाच्या आधारे अमेरिकेत येऊन नंतर या ना त्या मार्गाने कायमस्वरूपी वास्तव्य करू पाहणाऱ्यांना रोखण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी अर्जदाराची मायदेशातील कौटुंबिक आणि आर्थिक पार्श्वभूमी तपासण्यात येते. तसेच त्याच्या भविष्यातील योजनांचे तपशीलही विचारात घेतले जातात. अर्जदाराच्या नावे मायदेशात मालमत्ता नसल्यास किंवा त्याचे नजीकचे कुटुंबीय नसल्यास त्याचा व्हिसा नाकारण्यात येऊ शकतो.
नकार कसा टाळाल?
अमेरिकेचा व्हिसा अर्ज करताना समाजमाध्यम पडताळणी ही महत्त्वाची आणि न टाळता येण्यासारखी प्रक्रिया आहे, हे अर्जदाराने सर्वप्रथम लक्षात घ्यावे लागते. त्यासाठी त्याने आपल्या सर्व समाजमाध्यम खात्यांचा तपशील अधिकाऱ्यांना देणे आवश्यक आहे. या सर्व खात्यांवरील सर्व मजकूर ‘सार्वजनिक’ करणेही बंधनकारक आहे. अधिकाऱ्यांना एखादी पोस्ट ‘प्रायव्हसी सेटिंग’मुळे पाहता आली नाही तरी, ती ‘लपवाछपवी’ समजून व्हिसाचा अर्ज रद्द करण्यात येतो. अमेरिकेच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या पोस्ट, विनोद, मिम्स आपल्या खात्यांवरून आधीच हटवून टाकणेही आवश्यक ठरते. हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या कम्युनिटी ग्रुप्समधून् बाहेर पडण्याची खबरदारीही मुलाखतीपूर्वी घ्यावी लागते. वेगवेगळ्या समाजमाध्यम खात्यांवरील प्रोफाइल फोटो आणि वैयक्तिक तपशील यांच्यात तफावत ठेवता कामा नये.
कौशिकसमोरील पर्याय
सर्वसामान्य प्रक्रियेनुसार कौशिक राजला अमेरिकेच्या व्हिसासाठी पुन्हा अर्ज करता येईल. मात्र, ही संपूर्ण प्रक्रिया त्याला नव्याने पार पाडावी लागेल. तसेच या अर्जावर विचार करण्यासाठीचे सबळ कारणही त्याला द्यावे लागेल. ते कारण पटल्यासच त्याला व्हिसा देण्यात येऊ शकतो.