वसई-विरार व मिरा-भाईंदर शहरात मागील काही वर्षांपासून अमली पदार्थांची तस्करी सुरू असून गेल्या काही वर्षांपासून तस्करीचे प्रमाण वाढत असल्याचे समोर येऊ लागले आहे. यात प्रामुख्याने नायजेरियन मंडळींचा सहभाग दिसून येतो. आतापर्यंत केलेल्या कारवायांमध्ये कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत. विशेषतः वसई आणि भाईंदर शहरात अमली पदार्थ पुरवठ्याचा संबंध पाकिस्तानशीही असून देशातील सीमेलगत भागातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ भारतात येत असल्याचे समोर आले होते.
अमली पदार्थ येतात कुठून?
वसई-विरार व मिरा भाईंदर शहरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आढळून येत आहेत. देशभर पसरलेल्या अमली पदार्थांचे जाळ्याचा विस्तार वाढत असून राजस्थान सीमेलगत असलेल्या पाकिस्तानाच्या भागातून भारतात त्याचा पुरवठा होतो. दक्षिण आफ्रिकी देशांतूनही अमली पदार्थ नायजेरियन नागरिकांमार्फत येत आहेत. सीमेलगत असलेल्या राजस्थान, गुजरात, पंजाब अशा भागातून ही तस्करी होत आहे. याशिवाय तेलंगणातूनही वसई ,भाईंदर मधील भागात अमली पदार्थांची तस्करी होत आहे. सप्टेंबरमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत तेलंगणा राज्यातील चेरापल्ली येथे अमली पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यातून ५ हजार ९६८ किलो मॅफेड्रोन नावाचा अमली पदार्थ जप्त करून कारखाना उद्ध्वस्त केला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅफेड्रोनची किंमत १२ हजार कोटी रुपये इतकी होती, ही देशभरातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. या कारखान्यातून विविध राज्यात विशेषतः मुंबई आणि उपनगरात तसेच महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात अमली पदार्थ पुरविले जात असल्याचे निष्पन्न झाले होते.
तस्करीचे प्रमुख केंद्र कोणते?
पोलिसांनी आठ महिन्यांत छापेमारी करत ५६ कोटी ६८ लाख किमतीचे अमली पदार्थ जप्त करीत याबाबत नऊशेहून अधिक गुन्हे दाखल केले. नालासोपारा हे अमली पदार्थ तस्करीचे प्रमुख केंद्र होत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. तुळींज, संतोष भुवन, प्रगतीनगर अलकापुरी, आचोळे, डोंगरी, भीम डोंगरी, शिर्डीनगर. बिलालपाडा, मोरे गाव तलाव परिसर, अगरवाल नगर अशा भागातून अमली पदार्थ तस्करांवर कारवाई करण्यात आली होती. यात कारवाई करण्यात आलेले बहुतांश आरोपी हे नायजेरियन नागरिक असून पुरुषांसोबतच नायजेरियन महिलांचा सहभागही अनेक प्रकरणातून उघड झाला आहे. दाट वस्ती, चाळी आणि बैठ्या घरांचे साम्राज्य असलेल्या नालासोपाऱ्यात बेकायदा राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी करण्यात येते. तस्करीच्या साखळीत अनेकदा रिक्षाचालक, दुकानदार आदींचा सहभाग असतो.
नायजेरियन नागरिकांचा सहभाग का वाढतोय?
वसई-विरार व मिरारोड अशा ठिकाणच्या भागात मोठ्या संख्येने नायजेरियन नागरिकांना वास्तव्यास आले आहेत. वसई, विरारमधील विशेषतः नालासोपारा आणि नायगाव भागात मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यांच्या कृतीने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक अमली पदार्थविरोधी कारवायांमध्ये नायजेरियन नागरिकच प्रमुख आरोपी सापडले आहेत. हे नायजेरियन आफ्रिकन देशातून येत असल्याने तेथून याची छुप्या मार्गाने तस्करी होत असते. एक प्रकारे हे नायजेरियन या तस्करी व्यवसायातील मास्टर माईंड म्हणून ओळखले जात आहेत. कोकेन, एमडी, एफेड्रीन अशा प्रकारच्या अमली पदार्थ तस्करीत ते सक्रिय आहेत.
मॅफेड्रोनचा समावेश अधिक?
मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकडून गेल्या काही महिन्यात अमली पदार्थ विरोधी कारवाई तीव्र करण्यात आली आहे. एखाद्या प्रकरणात कारवाई केल्यानंतर त्या प्रकरणाशी संबंधित सर्व धागेदोरे शोधून काढले जात आहेत. यामुळे मागील काही महिन्यांपासून शहरात कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थांच्या जप्तीच्या कारवाया समोर येत आहेत. गेल्या काही महिन्यात हस्तगत करण्यात आलेल्या अमली पदार्थांपैकी सर्वाधिक मॅफेड्रोन (एमडी ) या अमली पदार्थाचा समावेश आहे. कोट्यवधी रुपयांचा एमडी साठा पोलिसांकडून जप्त केला जात आहे. मागच्या आठवड्यात आयुक्तालयाकडून जप्त करण्यात आलेले ३० कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहे.
अमली पदार्थांचे जाळे का पसरते?
चरस, गांजा, अफू अशा अमली पदार्थांची नावे सुरुवातीला मोठ्या प्रमाणात कानावर येत असत. मात्र बदलत्या काळात अमली पदार्थाचे आधुनिक रूप म्हणजे आता कोकेन, हेरॉईन, मेफेड्रोन अशा अमली पदार्थांची नावे समोर येत आहेत. कोकेन, हेरॉइनला उच्चभ्रू ग्राहक वर्गातून त्याला मागणी असते. त्यामुळे अशा अमली पदार्थांच्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय तस्करांचे जाळे विस्तारलेले आहे. विशेषतः मुंबई, वसई-विरार, हैदराबाद, चेन्नई यांसह अन्य भागांतून अमली पदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचतात. अमली पदार्थांच्या वाढत्या कारवाईमुळे ओळखीच्या ग्राहकांनाच त्यांची विक्री केली जाते व त्यानंतर त्याचा पुरवठा पुढे होत आहे. तर दुसरीकडे शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत आता असे अमली पदार्थ सहज पोहोचत आहेत. अमली पदार्थांची सेवन करणाऱ्यामध्ये तरुणांचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसून येत आहे.
तस्करी साखळी रोखण्याचे आव्हान……
बेकायदा राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांवर वेळीच कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र भारतातील वास्तव्याची मुदत संपल्यानंतरही अनेक काळ असे नायजेरियन नागरिक शहराच्या विविध भागात वास्तव्य करत असल्याचे उघड झाले आहे. हे नागरिक भाडे तत्त्वावर राहतात आणि अनेकदा राहत्या घरातच अमली पदार्थांची निर्मिती करत असतात. यात मुख्यतः स्थानिक नागरिकांचाही काही प्रमाणात पाठींबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. वसई-विरार शहरात स्थलांतरित नागरिकांची संख्या मोठी आहे. यात रिक्षाचालक, पानटपरी चालक, फळ आणि भाजीविक्रेते यांनी संख्या अधिक आहेत. अनेकदा नायजेरियन नागरिक अमली पदार्थांचा पुरवठा करताना या नागरिकांना हाताशी धरून अमली पदार्थांची तस्करी करतात. यामुळे नायजेरीयन नागरिकांची पुरवठा साखळी मोडीत काढणे हे सगळ्यात मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. तसेच रात्री उशिरापर्यंत सुरू असणारे कॅफे, बार, बेकायदा हुक्का पार्लर अशा ठिकाणीही अनेकदा छुप्या पद्धतीने अमली पदार्थाची विक्री होत असते यांवरील कारवाईदेखील तीव्र होण्याची गरज आहे.