अतिविचार केल्यानंतर लोकांना तंद्री येण्याऐवजी त्यांना मानसिकदृष्ट्या थकवा का येतो? याबाबत नुकतंच एक संशोधन करण्यात आलं आहे. मानसिक थकवा येण्याचे काही वैद्यकीय पुरावेदेखील समोर आले आहेत. करंट बायोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, जेव्हा लोकं बौद्धीकदृष्ट्या जड किंवा क्लिष्ट प्रकारचं काम अनेक तास करतात, तेव्हा त्यांच्या मेंदूतील प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या भागात काही संभाव्य विषारी उपउत्पादन तयार होतात.

यामुळे तुमचं निर्णय घेण्याच्या क्षमतेवरील नियंत्रण कमी होतं. परिणामी तुम्ही कमी महत्त्वाच्या कामांकडे वळता. ज्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करावे लागत नाहीत किंवा थकवा येतो म्हणून तुम्ही ब्रेक घेता, असं संशोधकांचं मत आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना फ्रान्समधील पिटी-साल्पेट्रीयर विद्यापीठातील संशोधक मॅथियास पेसिग्लिओन यांनी सांगितलं की, “काही प्रसिद्ध सिद्धांतांनुसार, थकवा हा एक प्रकारचा भ्रम असतो, जो मेंदूने तयार केलेला असतो. जेव्हा आपल्याला अशा प्रकारचा थकवा येतो, तेव्हा आपण जे काही करत असतो, ते काम थांबवतो आणि अधिक आनंद देणाऱ्या गोष्टीकडे वळतो. परंतु आमच्या निष्कर्षांवरून असे दिसून आलं आहे की, बौद्धिकदृष्ट्या क्लिष्ट काम केल्यामुळे माणसाच्या मेंदूत काही बदल घडतात. मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स भागात हानीकारक पदार्थ तयार होतात. याचा एकंदरीत परिणाम म्हणून आपल्याला थकवा जाणवत असल्याचा सिग्नल तयार होतो.”

हेही वाचा- विश्लेषण : करोनामुळे लहान मुलांमध्ये दृष्टीदोष? अभ्यासातून कोणती माहिती समोर आली आहे?

मानसिक थकवा नेमका काय असतो? एखादं यंत्र सतत आकडेमोड करू शकतं, मग मेंदू का करू शकत नाही? याची कारणं संशोधकांना शोधायची होती. लोकांना मानसिक थकवा येण्याचा संबंध मेंदूत तयार होणाऱ्या संभाव्य विषारी पदार्थांशी आणि त्याचा पुनर्वापर करण्याच्या गरजेचीशी असल्याचा संशयही संशोधकांना होता. याचा पुरावा शोधण्यासाठी आणि मेंदूतील रसायनशास्त्राचं निरीक्षण करण्यासाठी संसोधकांनी मॅग्नेटीक रिझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपीचा (MRS) वापर केला.

हेही वाचा- विश्लेषण: पोलिओ पुन्हा एकदा चर्चेत का? सांडपाण्यातून त्याचा फैलाव कसा होत आहे? कितपत धोका?

यासाठी संशोधकांनी दोन वेगवेगळ्या प्रकारचे काम करणाऱ्या लोकांचा ग्रुप निवडला. ज्यामध्ये बौधिकदृष्ट्या अतिविचार करावा लागणाऱ्या आणि तुलनेनं कमी विचार कराव्या लागणाऱ्या लोकांचा समावेश केला. या प्रयोगामध्ये जे लोकं अतिविचार करण्याचं किंवा मानसिकदृष्ट्या कठोर काम करत होते, त्यांच्यामध्ये थकवा येण्याची चिन्हे संशोधकांनी नोंदली. तसेच त्यांच्या मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सच्या सिनॅप्समध्ये ग्लूटामेटची पातळी वाढल्याचं दिसलं. मेंदूत ग्लूटामेट जमा होणं आरोग्यास हानीकारक असतं. तसेच मानसिकदृष्ट्या कठीण काम केल्यानंतर मानसिक नियंत्रण ठेवणं अधिक कठीण असतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेंदूच्या अतिविचार करण्याच्या क्षमतेच्या मर्यादेवर काही उपाय आहेत का?
संशोधक पेसिग्लिओन यांच्या मते, सध्या यावर कोणतेच उपाय नाहीत. विश्रांती आणि झोप घेणं, हेच यावरचे प्रभावी उपाय आहेत. मानसिक थकवा आलेली व्यक्ती झोपली असताना, त्यांच्या सिनॅप्समधून ग्लूटामेट काढून टाकल्याचे पुरावे संशोधनातून समोर आले आहेत. प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचं निरीक्षण केल्यामुळे गंभीर मानसिक थकवा शोधण्यास मदत होऊ शकते. अशा प्रकारचा थकवा आल्यानंतर महत्त्वाचे निर्णय घेणे टाळावे, असा सल्लाही संशोधकांनी दिला आहे.