विनायक डिगे

मागील काही दिवसांपासून मुंबईसह देशभरात आय फ्लूची साथ मोठ्या प्रमाणात पसरत आहे. दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (एम्स) दररोज अंदाजे १०० रुग्ण सापडत आहेत, तर मुंबईतील जे. जे. रुग्णालयामध्ये दररोज साधारणपणे २० ते २५ रुग्ण सापडत आहेत. त्याचप्रमाणे नागपूरमधील जिल्हा रुग्णालयातही दररोज जवळपास २५ रुग्ण येत आहेत. त्यामुळे जुलैत राज्यासह देशात आय फ्लूची साथ मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहे.

आय फ्लू होण्याचे कारण ?

आय फ्लू म्हणजेच एक प्रकारे डोळे येणे. साधारणपणे दरवर्षी पावसाळ्यात डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात पसरते. पावसाळ्याव्यतिरिक्त वातावरणात होणारे बदल, वाढलेली आर्द्रता यामुळे ही साथ झपाट्याने पसरताना दिसते. डोळे येणे म्हणजेच आय फ्लूमध्ये डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा दाह होतो. आर्द्रता आणि दूषित पाण्यामुळे या हंगामात बरेच जीवाणू आणि विषाणू वाढतात, त्यामुळे या रुग्णांच्या संख्येत वाढ होते. त्याचा सामान्यतः प्रौढांपेक्षा लहान मुलांवर अधिक परिणाम होतो.

प्रादुर्भाव झाल्यास काय करावे?

वेदना, लालसरपणा, अंधुक दृष्टी, डोळे सूजणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, पापणी चिकट होणे, डोळ्यातून चिकट द्रव्य स्रवणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. कधीकधी अंधूक दिसते. हा आजार साधारणपणे पाच ते सात दिवसांत बरा होत असला तरी डोळे येतात त्यावेळी होणारा त्रास हा अत्यंत वेदनादायक असतो. त्यामुळे त्यावर स्वत:च्या मनाने कोणतीही औषधे घेऊ नयेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करावेत. डोळ्यांच्या डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर चिन्हे आणि लक्षणांच्या आधारे त्याचे निदान केले जाते. ज्यामध्ये प्रतिजैविक, दाहक-विरोधी आणि स्नेहक आयड्रॉप्स आणि मलमांचा समावेश आहे.

छोटासा किडा चावल्यामुळे होतोय भयानक आजार; अमेरिकेत वेगाने पसरणारा अल्फा-गॅल सिंड्रोम काय आहे? 

आय फ्लू कसा पसरतो ?

आय फ्लूचा प्रतिबंध आणि प्रसार रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वच्छतेच्या चांगल्या सवयी. संक्रमित व्यक्ती वापरत असलेल्या कोणत्याही वस्तू न वापरणे. हा आजार थेट संपर्कात आल्याने किंवा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णाच्या वस्तूंच्या संपर्कात आल्याने होते. साधारणपणे टॉवेल, उशाचे अभ्रे, नळ, दाराच्या कड्या इत्यादी वस्तूंच्या स्पर्शाने हा आजार पसरतो. संसर्गजन्य व्यक्ती जेव्हा संपर्कात येते तेव्हा संक्रमण होते. संक्रमित हात डोळ्यांना लागल्यास संसर्ग होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रतिबंधासाठी उपाय काय?

एखाद्या संक्रमित व्यक्तीची काळजी घेत असाल, तर नेहमी निर्जंतुक केलेला कापूस किंवा रेशीम, मलमल याचे तलम पारदर्शक कापड वापरून डोळ्यातून येणारा स्त्राव योग्यरित्या स्वच्छ करावा. त्यानंतर साबण आणि पाण्याने हात नेहमी आणि स्वच्छ धुवावेत. सौंदर्यप्रसाधने, विशेषत: आयलाइनर किंवा मस्करा दुसऱ्या कुणाची वापरू नयेत. डोळ्यांना हात लावू नये. तसेच दुसऱ्याच्या वस्तू वापरू नयेत. डोळ्यात पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पोहायला जाणे टाळावे. बाधित मुलांना डोळे लाल दिसत असेपर्यंत किंवा मुले पूर्णपणे बरी होईपर्यंत शाळेत पाठवू नये. शक्य असल्यास आवर्जून चश्मा वापरावा. जेणेकरून डोळ्यांना होणारा अनावश्यक स्पर्श टाळता येईल. डोळे स्वच्छ ठेवणे आणि हात वारंवार धुणे महत्त्वाचे आहे. संसर्ग झालेल्या रुग्णांनी घरातच राहावे.