दरवर्षी उन्हाळा सुरु झाला की आवर्जून वाचायला मिळणारी बातमी म्हणजे उष्माघातामुळे झालेले मृत्यू. या वर्षीही आतापर्यंत राज्यात उष्माघातामुळे आठ जणांचा मृत्यू झाला असून ९२ जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. जळगाव जिल्ह्यात तीन, तर नागपूरमध्ये दोन आणि अकोला, अमरावती आणि उस्मानाबाद येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मात्र उष्माघात म्हणजे नेमकं काय? हा त्रास कशामुळे होतो? याची लक्षणं काय हे अनेकांना ठाऊक नसतं. याचवर टाकलेली ही नजर…

यंदा का होतोय उष्माघाताचा त्रास?
राज्यात उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढले असून विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यात याचा परिणाम मोठय़ा प्रमाणात जाणवत आहे.  या भागात दिवसाचे कमाल तापमान गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सरासरीपेक्षा अधिक आणि ४० अंश सेल्सिअसच्या पुढेच आहे.  नागपूर विभागात ६२ तर अकोला विभागात १५ जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. नाशिकमध्ये नऊ जणांना तर लातूरमध्ये एका व्यक्तीला उष्माघातामुळे त्रास होत असल्याने उपचार करावे लागले आहेत.

उष्माघाताच्या मृत्यूसंदर्भात असते जिल्हानिहाय समिती…
मध्य महाराष्ट्रातील काही भागात तापमानचा पारा ४० ते ४१ अंश सेल्सिअसवर गेला आहे. पुणे विभागात पाच जण उष्माघातामुळे आजारी पडले आहेत. रुग्णांचा मृत्यू उष्माघातानेच झाला आहे का, याची पडताळणी करण्यासाठी जिल्हानिहाय समिती असते. या समितीने मंजूर केल्यानंतरच ही नोंद केली जाते. गेल्या काही दिवसांत उष्णतेच्या लाटा वाढल्यामुळे यावर्षी एप्रिलमध्येच उन्हाची तीव्रता जास्त वाढली आहे. परिणामी मृत्यू आणि रुग्णांच्या संख्येवरही याचा परिणाम झाला आहे, असे राज्याचे साथसर्वेक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

उष्माघात म्हणजे काय?
वातावरणातील तापमान खूप वाढल्यावर शरीरातील पाणी कमी होऊन उद्भवणारा गंभीर आजार. आपल्या शरीराचे सर्वसाधारण तापमान ३७ अंश सेल्सिअस (९८.६ अंश फॅरनहाईट) असते. हे तापमान खूप वाढल्याने किंवा कमी झाल्याने मेंदूवर, रक्ताभिसरणावर आणि शरीरातल्या रसांवर (एन्झाइम्सवर) प्राणघातक दुष्परिणाम होऊ  शकतात. ते टाळण्यासाठी शरीराचे तापमान नियंत्रित करणारी एक वातानुकूलन प्रणाली कार्यरत असते. पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने ही यंत्रणा पूर्ण कोलमडते. परिणामत: त्या व्यक्तीला घाम येणे, मळमळ, उलटयम, घबराट आणि जास्त प्रमाणात थकवा, त्वचा निळी पडणे, शरीराचे तपमान अचानक कमी होणे, चक्कर येणे, रक्तदाब आणि नाडीचे ठोके कमी होणे अशी लक्षणे दिसतात. वेळेत उपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होते.

डॉक्टर काय सांगतात?
“उष्माघात म्हणजे वातावरणातील तापमान खूप वाढल्यावर शरीरातील पाणी कमी होऊन उद्भवणारा गंभीर आजार. शरीरातील पाणी जसजसे कमी होते, तसतसे वेगवेगळे परिणाम यात दिसून येतात. त्यानुसार याचे काही उपप्रकार पडतात; पण याला सरसकटपणे उष्माघात असेच म्हटले जाते,” असं डॉ. अविनाश भोंडवे लोकसत्तामध्ये लिहिलेल्या लेखात म्हटलंय.

तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी चार पद्धती…
आपल्या शरीराचे तापमान खूप वाढल्याने किंवा कमी झाल्याने होणारे टाळण्यासाठी शरीराचे तापमान नियंत्रित करणारी एक वातानुकूलन प्रणाली कार्यरत असते. ती चार पद्धतीने शरीराचे तापमान कायम राखण्याचा प्रयत्न करते.

१. उत्सर्जन (रेडिएशन)- उन्हातून सावलीत आल्यावर शरीरातील उष्णता बाहेर पडते, तर थंडीत गरम शेकोटीने उबदार वाटते.

२. संक्रमण (कंडक्शन) – उन्हाळ्यात गार पाण्याने आंघोळ केल्यास पाण्याचा गारवा शरीराला मिळतो, तर हिवाळ्यात उबदार स्वेटरने थंडी कमी होते.

३. प्रवाही अभिसरण (कन्व्हेक्शन) -शरीरातील रक्तप्रवाहाद्वारे उष्णता मेंदूपासून दूर नेली जाते.

४. बाष्पीभवन (इव्हॅपोरेशन)- शरीरातील पाणी घामाच्या स्वरूपात बाहेर पडून त्याचे बाष्पीभवन होऊन आपल्याला गार वाटते.

तापमान नियंत्रण कार्यप्रणाली
शरीराचे अंतर्गत तापमान मेंदूतील हायपोथॅलॅमस नावाच्या भागाद्वारे होते. थंडीमध्ये हायपोथॅलॅमसकडून जाणाऱ्या संदेशामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्वचेची घर्मरंध्रे बंद होतात, काकडणे आणि कुडकुडणे सुरू होते आणि शरीरातील उष्णता कायम राखली जाते. याउलट उन्हाळ्यात वातावरणाचे तापमान वाढल्यावर शरीराचे बाह्य़ तापमानही वाढते. या वेळेस हायपोथॅलॅमसकडून रासायनिक संदेश पाठवले जाऊन रक्तवाहिन्या प्रसरण पावू लागतात आणि बाह्य़ त्वचेखाली असलेल्या घर्मग्रंथी उत्तेजित होतात. त्यामुळे रक्तप्रवाहातील द्रव पदार्थ आणि क्षार वापरून घाम तयार होतो. या घामाचे बाष्पीभवन होऊन शरीराला थंडावा येतो. घाम येण्याच्या या प्रक्रियेत शरीरातील द्रव पदार्थ आणि पाणी तापमानानुसार अधिकाधिक वापरले जाऊन त्यांचा साठा कमी होत जातो. बाह्य़ उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होण्याच्या क्रियेला ‘हीट स्ट्रेस’ किंवा उष्णता तणाव म्हणतात.

हीट स्ट्रेसचे मुख्य प्रकार

* हीट रॅशेस- घामोळ्या येणे.
* हीट क्रॅम्पस- स्नायूंमध्ये चमक, लचक भरणे.
* चक्कर/बेशुद्धी- घाम खूप येऊन शरीरातील पाणी आणि क्षार कमी झाल्याने रक्तदाब खाली उतरून चक्कर येते किंवा शुद्ध हरपते
* ऱ्हॅब्डोमायोलायसिस- तीव्र उन्हात सतत काम करत राहिल्याने आणि आवश्यक पाणी न प्यायल्याने, स्नायूंच्या पेशी नष्ट होऊन त्यांचे विघटन होऊन ते मृत होतात. परिणामत: हृदयाचे स्पंदन अनियमित होते, मूत्रपिंडांचे कार्य मंदावते.
* उष्माघात (हीट स्ट्रोक)- ज्या वेळेस शरीरातील पाण्याचे प्रमाण अगदी नगण्य होते, तेव्हा होणाऱ्या प्राणघातक त्रासाला उष्माघात म्हणतात.

उष्माघाताची लक्षणे काय?
संपूर्ण शरीरच उष्माघाताचे परिणाम विविध लक्षणांद्वारे दाखवण्यास सुरुवात करते. थकवा, चक्कर, निरुत्साही वाटणे, अस्वस्थता येणे ही सुरुवातीची लक्षणे. ही लक्षणे लवकर ओळखून उपाय केले नाहीत तर तीव्र लक्षणे दिसू लागतात. त्वचा कोरडी पडते, जीभ आत ओढली जाते. रक्तदाब वाढतो. मानसिक बैचेनी वाढते, शरीराचे तापमान वाढते. काही वेळा शुद्धही हरपू शकते.

उपचार काय करावेत?
* एखाद्याला उष्माघातामुळे किंवा अति उन्हामुळे चक्कर आल्यास त्याला सावलीत आणावे. मोकळी हवा पोहोचू द्यावी.
* ताप वाढत असल्यास गार पाण्याने अंग पुसावे. तहान लागल्यासारखे वाटत नसले तरी पाणी, नारळपाणी थोडय़ा थोडय़ा वेळाने घोट घोट प्यावे. यामुळे अनेकदा बरे वाटते.
* उन्हाळ्यात चहा, कॉफी ही पेय शक्यतो टाळावीत. कोणत्याही स्वरुपातील मद्य टाळावे. अतिथंड पाणी, सरबत टाळावे. त्यामुळे पोटात मुरडा पडतो.
* शरीराचे तापमान १०४ फॅरनहाइट किंवा ४० अंश से. पेक्षा वाढले की स्नायू, मूत्रपिंड, मेंदू किंवा हृदयावर परिणाम होण्यास सुरुवात होते. त्यामुळे मूत्राचा रंग गडद पिवळा झाला, डोकेदुखी वाढली किंवा भोवळ आली तर तातडीने जवळच्या रुग्णालयात जा.
प्रतिबंधात्मक उपाय
* शरीरातील पाण्याचा साठा कमी होऊ न देणे ही मुलभूत बाब आहे. उष्मा वाढला की सतत पाणी पिणे आवश्यक आहे. यावेळी शरीराला ग्लुकोज व क्षारांचा पुरवठा होणे गरजेचे असते. सरकारी जाहिरातींमधून दाखवले जाणारे, एक ग्लास पाण्यात एक चमचा साखर व चिमूटभर मीठ टाकून केलेले- जलसंजीवनी पेय यासाठी उत्तम असते. मात्र अतिसाखरयुक्त सरबत टाळा.
* हलक्या रंगाचे, सैल व सुती कपडे घाला. उन्हात जाताना गॉगल, टोपी, छत्री वापरा.
* घाम अंगावर सुकू देऊ नका.
* बर्फाच्या पाण्याने आंघोळ करणे.
* कपाळावर थंड पाण्याच्या पट्टय़ा, आइसपॅक ठेवणे.
* दिवसभरात ५ ते ६ लिटर ओआरएसचे पाणी द्यावे.
* उन्हात कष्टाचे काम करू नका, व्यायाम करणे टाळा.
* दुपारच्या वेळेत काम करण्याऐवजी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा बाहेरच्या कामांची आखणी करावी.
* काही कारणाने उन्हात थांबावे लागले तर भरपूर पाणी प्या.
डोक्यावर जाड कापड गुंडाळा. अधूनमधून सावलीत जा.

मृत्यूचं प्रमाण किती?
राज्यात २०२०-२१ मध्ये उष्माघातामुळे एकही मृत्यू झालेला नाही. २०१६ मध्ये १९ तर  २०१७ मध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. २०१८ नंतर मात्र हे प्रमाण कमी झाले होते. २०१८ आणि २०१९  मध्ये अनुक्रमे दोन आणि नऊ रुग्णांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.