गडचिरोली जिल्ह्यातील दोन महिलांनी आपल्या कुटुंबातील पाच जणांची हत्या केली. या हत्याकांडात ‘थॅलियम’ या धातूचा वापर केला. रंग, गंध, चव नसलेले थॅलियम हे जागतिक स्तरावर जहाल विष म्हणून ओळखले जाते. ‘स्लो पॉयझन’ म्हणून ओळखले जाणारे थॅलियम मानवी शरीरात गेले तर आधी त्याची प्रकृती बिघडते आणि त्यानंतर त्याचा मृत्यू होतो. थॅलियम नेमके काय आहे? ते कुठून मिळते? त्याचा नेमका वापर कुठे केला जातो? याविषयी…

गडचिरोलीत नेमके काय घडले?

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे एकाच कुटुंबातील पाच जणांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी या मृत्युसत्राचा उलगडा करून याच कुटुंबातील दोन महिलांना अटक केली. यापैकी एक महिला कृषी शास्त्रज्ञ असून कुटुंबातील पाच व्यक्तींची हत्या करण्यासाठी तिथे थॅलियम या रासायनिक पदार्थाचा वापर केला. सासरच्या छळाला कंटाळून आणि संपत्तीच्या वादातून त्यांनी हे हत्याकांड घडविले. या दोघींनी हे हत्याकांड घडविण्यापूर्वी इंटरनेटवर थॅलियमबाबतचा अभ्यास केला. यापैकी एका महिलेने तेलंगणातून थॅलियम मागविले आणि अन्नपदार्थात टाकले. रात्री जेवण झाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना डोकेदुखी व उलट्या होऊ लागल्या. त्यांना चंद्रपूर व नागपूरमधील रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. मृत झालेल्या या पाचही जणांच्या रक्तात मोठ्या प्रमाणावर थॅलियमचे अंश आढळल्याने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी हत्येचा उलगडा करून या दोनही महिलांना अटक केली. ‘स्लो पॉयझन’चा वापर करून कुटुंबातील सदस्यांना ठार केल्याची कबुली दोघींनी दिली.

Goa Police
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना
Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
Property worth lakhs was robbed in two house burglaries in nashik
नाशिक : जिल्ह्यात दोन घरफोडींमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास
A youth from Nalasopara committed suicide by consuming poison due to cyber fraud
सायबर भामट्यांनी घातला २ लाखांचा गंडा; वडील रागावतील म्हणून मुलाची आत्महत्या

हेही वाचा – ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरण काय? तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर काय आरोप आहेत? जाणून घ्या…

थॅलियम म्हणजे काय?

थॅलियम हा चांदीसारखा दिसणारा राखाडी रंगाचा धातू आहे. आवर्तसारणीत त्याचा अणुक्रमांक ८१ असून संकेतचिन्ह ‘TI’ आहे. थॅलियम निसर्गात मुक्त आढळत नाही, तर रासायनिक घटकांमध्ये तो आढळतो. विल्यम क्रोक्स आणि क्लॉड ऑगस्टे लॅमी यांनी १८६१ मध्ये सल्फ्युरिक आम्ल उत्पादनाच्या अवशेषांमध्ये स्वतंत्रपण थॅलियम शोधला. दोघांनी नवीन विकसित केलेल्या फ्लेम स्पेक्ट्रोस्कोपी पद्धतीचा वापर केला, ज्यामध्ये थॅलियम लक्षणीय हिरवी वर्णपट रेषा तयार करतो. थॅलियम हे नाव क्रोक्सने दिले, ज्याचा ग्रीक भाषेत अर्थ होतो, ‘हिरवी अंकुर’. व्यावसायिकदृष्ट्या थॅलियम सल्फाइड धातूंच्या शुद्धीकरणातून उपउत्पादन म्हणून तयार केले जाते. विरघळणाऱ्या थॅलियमला चव नसते, मात्र ते अत्यंत विषारी असते. त्यामुळे त्याच्या सहज उपलब्धतेवर बंदी आहे.

थॅलियम कुठे मिळते? त्याचा वापर कशासाठी केला जातो?

थॅलियम निसर्गात फार थोडे असते आणि केंद्रित नसते. जड आणि सल्फाइड धातूंच्या क्षारांच्या प्रक्रियेदरम्यान ते मिळविले जाते. शिशे आणि जस्त या धातूंच्या वितळण्यापासूनही थॅलियम मिळविता येते. प्रक्रिया करतानाही त्याचे उत्खनन केले जाते. थॅलियम हायड्रॉक्साइड, थॅलियम ऑक्साइड, थॅलियम नायट्रेट, थॅलियम क्लोराइड, थॅलियम सल्फेट, आयोडाइड या स्वरुपातच थॅलियम अस्तित्वात आहे. ‘युनायटेड स्टेट जिओलॉजिकल सर्व्हे’चा अंदाज आहे, की तांबे, जस्त आणि शिशे धातूंच्या गळतीतून थॅलियमचे वार्षिक उत्पादन १० मेट्रिक टन आहे. थॅलियमचा वापर विविध उद्योगांत केला जातो. पूर्वी उंदीर मारणारी औषधे आणि कीटकनाशकांमध्ये त्याचा वापर केला जात असे. मात्र त्याचा गैरवापर होऊ लागल्याने अनेक देशांमध्ये याच्या वापराला प्रतिबंध आहे. ६५ टक्के थॅलियम इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात वापरले जाते. औषधनिर्मिती उद्योग आणि काचेच्या उत्पादनातही त्याचा वापर केला जातो. इन्फ्रारेड डिटेक्टरमध्येही त्याचा वापर केला जातो. थॅलियमला जहाल विष आणि स्लो पॉयझन म्हणून ओळखले जात असल्याने त्याच्या सहज उपलब्धतेवर निर्बंध आहेत. उद्योगांमध्ये त्याचा वापर करताना त्याची नोंद ठेवली जाते आणि कोणालाही सहज उपलब्ध होऊ नये याची खबरदारी घेतली जाते.

हेही वाचा – विश्लेषण : सोयाबीनचे दर का घसरले?

थॅलियममुळे मानवी शरीरावर काय परिणाम होतात?

थॅलियमच्या संपर्कात आल्यानंतर त्वचेवर आणि केसांवर परिणाम होऊ शकतो. त्वचेशी संपर्क धोकादायक असल्याने हे धातू वितळवताना पुरेसे वायुविजन आवश्यक आहे. थॅलियमच्या संपर्कात आल्यानंतर केसगळतीही हाेऊ शकते. ‘स्लो पॉयझन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थॅलियमचा परिणाम तत्काळ होत नसून हळूहळू त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. पहिल्या तीन ते चार तासांमध्ये उलट्या, मळमळ, डोकेदुखी, शौचातून रक्तस्राव अशी लक्षणे दिसून येतात. पुढील सात दिवसांमध्ये मज्जासंस्थेवर परिणाम होतो. त्यानंतर धूसर दृष्टी, स्नायूंच्या उतींमध्ये वेदना, हात-पाय सुन्न होणे, तीव्र डोकेदुखी, अशक्तपणा, क्रॅनियल मज्जातंतू नुकसान, हालचाल करताना वेदना, चेहऱ्यासह अंगावर पुरळ उठणे आदी समस्या उद्भवतात. थॅलियम हायड्रॉक्साइडमुळे शरीराच्या सर्व यंत्रणांमध्ये कालांतराने अडथळा निर्माण होतो. लघवीला त्रास होणे, रक्ताभिसरण प्रणालीमध्ये युरियाची पातळी वाढणे, दृष्टीवर विपरीत परिणाम, त्वचेवर पांढरेशुभ्र डाग, त्वचेची जळजळ, केसगळती, हृदयात वेदना, रक्तदाब वाढणे, टाकीकार्डिया, फुप्फुसाला सूज, श्वसन स्नायू पक्षाघात आदी विकारांना सामोरे जावे लागते. जर थॅलियमचे प्रमाण अधिक असेल, तर हे विकार काही दिवसांतच दिसून येतात आणि ७ ते १० दिवसांत मृत्यू होतो. कधीकधी विषबाधेची लक्षणे अतिशय अस्पष्ट दिसतात आणि ती अखेरच्या टप्प्यात प्रकट हाेऊ शकतात.

थॅलियम विषप्रयोगाची प्रसिद्ध उदाहरणे…

विविध देशांच्या गुप्तहेरांनी थॅलियम या विषाचा वापर अनेकदा केलेला आहे. रशियन पत्रकार व मानवी हक्क कार्यकर्ती ॲना पॉलिटकोव्हस्कायाची २००६ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मात्र त्यापूर्वी २००४ मध्ये तिच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता. विमानामध्ये हवाई कर्मचाऱ्याने दिलेला चहा प्यायल्यानंतर ॲना आजारी पडली. या चहामध्ये सौम्य प्रमाणात थॅलियमचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. गेल्या वर्षी लंडनमध्ये माजी एफएसबी अधिकारी अलेक्झांडर लिटविनेन्को यांना विषबाधा झाली होती. त्या वेळी त्यांच्या रक्तात काही प्रमाणात थॅलियम आढळले. लंडनमध्ये बल्गेरियाचा बंडखोर जॉर्जी मार्कोव्हच्या पायावर छत्रीच्या टोकामध्ये लावण्यात आलेल्या सुईच्या साहाय्याने वार करण्यात आले. या सुईवर थॅलियम लावण्यात आले होते. त्यानंतर जाॅर्जी आजारी पडला आणि त्याचा मृत्यू झाला. क्युबाचे माजी अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांच्या हत्येच्या अनेक प्रयत्नांपैकी एकामध्ये थॅलियमचा वापर करण्यात आला होता. सीआयएचा रसायनशास्त्रज्ञ सिडनी गॉटलीब यांनी कॅस्ट्रोच्या बुटांमध्ये थॅलियम टाकून त्यांना विष देण्याचा कट रचला होता. मात्र तो अयशस्वी ठरला. इराकचा सद्दाम हुसेन यांनीही बदला घेण्यासाठी अनेकदा थॅलियमचा वापर केला आहे. ब्रिटनमधील ग्रॅहम यंग नावाच्या ‘सीरियल किलर’ने थॅलियमचा वापर करून अनेकांना ठार मारले आहे. आपली सावत्र आई, नातेवाईक, शालेय मित्र यांना चहा आणि खाद्यपदार्थातून थॅलियम देऊन यंगने त्यांना यमसदनी पाठविले. त्यानंतर त्याला कारावासाची शिक्षा झाली. १९७२ मध्ये त्याला चार जन्मठेपेच्या शिक्षा सुनावण्यात आल्या.

sandeep.nalawade@expressindia.com