सचिन रोहेकर

मागील काही दिवसांत अनेकवार प्रयत्न करूनही हुकत आलेल्या सार्वकालिक उच्चांकाला अखेर निफ्टीने गाठले आणि या निर्देशांकाने बुधवारच्या व्यवहारात १९ हजारांपुढेही लीलया मजल मारली. भीती, अनिश्चितता, नकारात्मकता यांनी दाटलेल्या आसपासच्या आव्हानात्मक वातावरणातील ही कामगिरी जगावेगळी नक्कीच ठरते. पण विश्लेषकांच्या मते निर्देशांकांची ही शिखर-झेप म्हणजे सूज नव्हे तर ती आश्वासक आणि टिकाऊही ठरेल…

fruad in mumbai
“दाऊद इब्राहिम माझा काका आहे”, ऑनलाईन फसवणूक करणाऱ्याचा हुशारीने केला पर्दाफाश; ‘असा’ प्रकार तुमच्याबरोबरही घडू शकतो!
sensex again at the level of 74 thousand print eco news
तेजीवाल्यांची पकड मजबूत; सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर
sensex, 75000 points , share market news loksatta,
‘सेन्सेक्स’ची ऐतिहासिक ७५ हजारांच्या शिखरावरून माघार
Government decision not to increase read reckoner for elections
रेडीरेकनर वाढीला निवडणुकीची वेसण; घरांच्या किमती घटणार? रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीवर काय परिणाम?

निर्देशांक मुसंडीला बळ कशाचे?

निफ्टीने निर्देशांकाने १८,९७२ हा नवीन सार्वकालिक उच्चांक नोंदवून, गत वर्षी डिसेंबरमध्ये स्थापित १८,८८७ च्या शिखर पातळीचा विक्रम बुधवारी मोडला. सेन्सेक्सने यापूर्वीच ऐतिहासिक उच्चांक पार करून आता ६४ हजारांची वेस ओलांडण्याकडे कूच केले आहे. गत काही महिन्यांतील बाजारतेजीचे हे फलित आहे. देशांतर्गत अर्थव्यवस्था सुदृढता मिळवत असल्याचे संकेत देणारे ताजी अर्थनिदर्शक आकडेवारी आणि त्याचे प्रतिबिंब म्हणता येईल असे प्रमुख कंपन्यांच्या तिमाहीगणिक मिळकत कामगिरीत दिसत असलेली लक्षणीय वाढ यांनी बाजाराला नक्कीच उत्तम गती मिळवून दिली आहे. विशेषतः एप्रिलपासून बाजाराचा पालटलेला कल हे दाखवून देतो. मूळात जगातील विकसित हिश्श्यातील अर्थव्यवस्थांची अवस्था पिचलेली आहे. अनेकांचा विकासदर शून्याखाली अथवा मंदीच्या कोंडमाऱ्याने अनेकांची अर्थव्यवस्था गुदमरण्याचे संकट आहे. या स्थितीत अलीकडेच कर्जपेचावर तोडगा काढण्यात यशस्वी ठरलेल्या अमेरिकेने हे संकट तूर्त टाळले किंवा लांबणीवर टाकले ही बाबदेखील बाजारासाठी तात्पुरती का होईना दिलासादायी ठरली. जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा भागीदार असलेल्या चीनमधील परिस्थितीमध्येदेखील सुधारणेचे संकेत मिळत आहेत. तर भारताकडून चालू वर्षात सहा टक्क्यांच्या विकासदर साधला जाण्याचे भाकीत एस अँड पी, फिच, जागतिक बँकेच्या अर्थतज्ज्ञांनी केले आहे. भारताच्या गत दीड दशकांतील विकासदर सरासरीच्या खूप खाली असा हा दर असला तरी तो विद्यमान जागतिक स्थितीत सर्वाधिक गतीने वाढ दर्शविणारा आहे. त्यामुळे जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्थेच्या आकर्षणातून होत असलेल्या देशी-विदेशी गुंतवणुकीचे प्रतिबिंब हे सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांच्या मुसंडीत दिसून येत आहे.

विदेशी गुंतवणूकदारांचा कल पालटण्यामागे कारण काय ?

भारताकडे पाठ करून गुंतवणूक काढून घेत वाऱ्याच्या वेगाने माघारी जात असलेल्या विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचे पाय भारताकडे पुन्हा वळू लागल्याचे सरलेल्या एप्रिपासून दिसून आले. एप्रिल ते जून तिमाहीत त्यांच्याकडून आलेला १,००० कोटी डॉलरहून (८२,००० कोटी रुपये) अधिक गुंतवणुकीचा ओघ याची प्रचीती देतो. हा अलिकडच्या तीन वर्षांच्या काळातील कोणत्याही तिमाहीत विदेशी गुंतवणूकदारांकडून झालेला डॉलर-पौंडांचा सर्वोत्तम ओघ आहे. या महत्त्वपूर्ण बदलासाठी अर्थातच रिझर्व्ह बँकेने पतधोरणात, व्याजदर वाढीच्या चक्राला दिलेला विराम हा सर्वात प्रभावी घटक ठरला. त्या आधी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मात्र परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून ३४,००० कोटी रुपये काढून घेतले होते.

उच्चांकी शिखर चढून गेलेल्या निर्देशांकांचा तोल ढळण्याची भीती कितपत?

जितके उंचच उंच चढत जाऊ तितके त्या उंचीवरून कोसळण्याने होऊ शकणाऱ्या इजेची भीतीही मनात वाढत जाते. निर्देशांक जेव्हा विक्रमी उच्चांकापर्यंत झेपावतो तेव्हा अशा चर्चा आणि विश्लेषणे झडतच असतात. अर्थात अशा समयी बाजारात गुंतवणुकीचा निर्णय अतीव काळजीने घेतला जावा, हे यामागे गृहितक असते. तथापि निर्देशांकांचे सध्याचे मूल्यांकन पाहिल्यास, ही सूज किंवा ताणत आलेला बुडबुडा वाटत नाही. मूळात बाहेर पाऊस धुवांधार सुरू होऊन त्याने सबंध देश व्यापल्याची सुवार्ता आल्यानंतर हे घडले आहे, हे ध्यानात घेतले जावे, असे ज्येष्ठ तांत्रिक विश्लेषक आशीष ठाकूर म्हणाले. त्यांच्या मते, सेन्सेक्स आणि निफ्टीचे मूल्यांकन हे अनुक्रमे १९ पट आणि १८.५ पटीचे किंमत/उत्पन्न गुणोत्तर दर्शविणारे आहे. जे या निर्देशांकांच्या १० वर्षांच्या सरासरी मूल्यांकनाशी बरोबरी साधणारेच आहे. त्यामुळे पाऊसपाण्याची अशीच साथ पूर्ण हंगामभर राहिल्यास निर्देशांकांनी आणखी मोठ्या शिखरापर्यंत चढाई केल्याचेही अनुभवता येईल, असे त्यांनी मत व्यक्त केले.

गुंतवणूकदारांनी कोणत्या नकारात्मक घटकांकडे सावधगिरीने पाहावे?

देशात मान्सूनच्या प्रगतीबद्दल चिंता कायम आहे आणि एल निनोचा प्रभाव हा पर्जन्यमानाच्या स्थितीत एक मोठा व्यत्यय ठरून पुढे येण्याचा धोका कायम आहे. जागतिक भू-राजकीय घटकांचे आव्हान देखील केव्हाही डोके वर काढताना दिसेल. अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हकडून पुन्हा व्याजदर वाढ केली जाण्याची शक्यता आहे. तथापि देशांतर्गत कंपन्यांच्या मिळकतीत दमदार वाढ आणि देशा-परदेशांतून गुंतवणुकीचा निरंतर प्रवाह हेच सध्याच्या बाजारतेजीचे मुख्य आधारस्तंभ असून, वरील नकारात्मक घटकांच्या प्रभावांना बाजाराने गृहित धरूनच घोडदौड सुरू असल्याचे विश्लेषक सांगतात. त्यामुळे हे नकारात्मक शक्यता वास्तवात जरी आल्या तरी तात्कालिक घसरणीच्या प्रतिक्रियेव्यतिरिक्त त्यांचा बाजारावर फार मोठा प्रभाव दिसून येणार नाही, असे बहुतांश विश्लेषक ठामपणे सांगत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी थेट समभाग आणि म्युच्युअल फंडाद्वारे सुरू असलेल्या ‘एसआयपी’ गुंतवणुकीतील सातत्यात खंड पाडू नये असा ठाकूर यांचाही सल्ला आहे.

sachin.rohekar@expressindia.com