scorecardresearch

विश्लेषण: फिफा वर्ल्ड कपमध्ये शेवटचे साखळी सामने एकाच वेळी का खेळवतात? काय होता १९८२मधील ‘लाजिरवाणा सामना’?

फिफाला नियम बदल करावा लागला तो सामना ‘डिसग्रेस ऑफ गिजाँ’ अर्थात गिजाँमधला लाजिरवाणा सामना म्हणून इतिहासात नोंदवला

विश्लेषण: फिफा वर्ल्ड कपमध्ये शेवटचे साखळी सामने एकाच वेळी का खेळवतात? काय होता १९८२मधील ‘लाजिरवाणा सामना’?
१९८२ वर्ल्ड कप स्पर्धेत या फिक्सिंगने आणखी खालची पातळी गाठली (फोटो सौजन्य – रॉयटर्स आणि एपीवरुन साभार)

फिफा वर्ल्ड कप कतार २०२२मध्ये पहिल्या फेरीचा टप्पा जवळपास संपत आला आहे. मोजके संघ दुसऱ्या फेरीत पोहोचलेले असले, तरी अजूनही अनेक संघ पुढील फेरीच्या प्रतीक्षेत आहेत. प्रत्येक गटामध्ये सर्व संघांचा तिसरा सामना एकाच दिवशीच नव्हे, तर एकाच वेळीही खेळवला जात आहे. असे का केले जाते आणि ही प्रथा कधीपासून सुरू झाली, याविषयी परामर्श.

प्रत्येक गटात शेवटचे साखळी सामने एकाच वेळी कसे?

याचे साधे उत्तर म्हणजे, एकाच गटातील दोन संघांना परस्पर संमतीने चलाखी करून तिसऱ्या संघाचा पत्ता कापण्याची संधी मिळत नाही. काही वेळा एखाद्या संघाला स्वतःच्या फायद्यासाठी एखादा निकाल अनुकूल ठरू शकतो. उदा. दुसऱ्या फेरीत वेगळ्याच गटातील प्रतिभावान संघाशी सामना टाळण्यासाठी एखादा संघाला आपल्या शेवटच्या सामन्यात आपले हितसंंबंध जपण्यासाठी खेळ करता येऊ शकतो. काही वेळा एखादा संघ आपल्याच गटातील एखाद्या परंपरागत प्रतिस्पर्ध्याचे आव्हान गट टप्प्यात संपुष्टात यावे, यासाठीही खेळू शकतो. 

पण मुळात हा बदल करण्याची वेळ फिफावर का आली?

भूतकाळात अनेकदा अगदी बड्या संघांनीही शेवटच्या सामन्यांमध्ये स्वतःच्या सोयीनुसार, गरजेनुसार, प्राधान्यानुसार खेळ करून शेवटच्या सामन्याची रंगत कमी केलेली उदाहरणे अनेक आहेत. अशा प्रकारचे फिक्सिंग प्रेक्षकांसाठी अन्यायकारक असते आणि फिफासाठी नामुष्कीजनक ठरू शकते. याउलट एकाच वेळी गटसामने सुरू झाल्यापासून अनिश्चितता आणि त्यातून रंगत निर्माण झाली. तसेच सर्व संघांना समान संधीचा नियमही पाळला जाऊ लागला. १९७८मध्ये अर्जेंटिनात झालेल्या वर्ल्ड कपमध्ये काही सामने या प्रकारे फिक्स झाल्याचा संशय होता. परंतु स्पेनमध्ये झालेल्या पुढील म्हणजे १९८२ वर्ल्ड कप स्पर्धेत या फिक्सिंगने आणखी खालची पातळी गाठली. 

वर्ल्ड कप १९८२मधील ‘लाजिरवाणा सामना’ कोणता?

फिफाला नियम बदल करावा लागला तो सामना ‘डिसग्रेस ऑफ गिजाँ’ अर्थात गिजाँमधला लाजिरवाणा सामना म्हणून इतिहासात नोंदवला गेला. स्पेनमध्ये झालेल्या त्या स्पर्धेत पश्चिम जर्मनी, ऑस्ट्रिया, चिली आणि अल्जीरिया एकाच गटात होते. सुरुवातीलाच अल्जीरियाने पश्चिम जर्मनीला २-१ असे हरवून धमाल उडवून दिली. पुढे या संघाने चिलीलाही हरवले आणि विश्वचषकात दोन सामने जिंकणारा अल्जीरिया पहिलाच आफ्रिकी संघ ठरला. एखाद्या युरोपिय संघाला हरवणाराही तो पहिलाच आफ्रिकी संघ. अल्जीरिया आणि चिली त्यांचा शेवटचा साखळी सामना परस्परांशी खेळले. त्या सामन्यातील विजयामुळे अल्जीरियाचे ४ गुण (त्या काळात विजयासाठी दोन गुण, बरोबरीसाठी एक गुण दिला जायचा) झाले. ते त्यावेळी गटात दुसरे होते. परंतु ऑस्ट्रिया आणि पश्चिम जर्मनी यांचा सामना नंतरच्या दिवशी होणार होता. या सामन्यात ऑस्ट्रियाने विजय अथवा बरोबरी साधल्यास ऑस्ट्रिया आणि अल्जीरिया पुढीत फेरीत पोहोचले असते. तीन गोलांच्या फरकाने पश्चिम जर्मनी जिंकल्यास, पश्चिम जर्मनी आणि अल्जीरिया पुढील फेरीत जाणार होते. पण… एक किंवा दोन गोलांच्या फरकांनी पश्चिम जर्मनीचा विजय पश्चिम जर्मनी आणि ऑस्ट्रिया या दोन संघांना पुढील फेरीत धाडणार होता आणि अल्जीरिया साखळीतच गारद होणार होता. घडलेही तसेच! त्या सामन्यात बाराव्या मिनिटाला पश्चिम जर्मनीने गोल करत १-० अशी आघाडी घेतली. त्यापुढे जे घडले, फुटबॉलसाठी लाजिरवाणे होते. पुढील सारा वेळ दोन्ही संघ निष्कारण पासेस पुरवत खेळत राहिले आणि वेळ काढत राहिले. गोल करण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नव्हते. दोन्ही संघ बहुतांश काळ आपापल्या हाफमध्येच टिकून राहिले.  कारण १ गोलच्या विजयामुळे पश्चिम जर्मनी, ऑस्ट्रिया आणि अल्जीरिया यांचे प्रत्येकी ४ गुण झाले. परंतु पश्चिम जर्मनीचा गोलफरक + ३, ऑस्ट्रियाचा गोलफरक + २ आणि अल्जीरियाचा गोलफरक ० राहिल्यामुळे जर्मनी आणि ऑस्ट्रिया पुढे सरकले. अशा प्रकारे हा सामना ‘फिक्स’ करून दोन संघ पुढे गेल्यामुळे फिफाचेदेखील हसे झाले.        

प्रतिक्रिया काय उमटल्या?

टीव्ही आणि रेडिओवर समालोचन करणाऱ्या समालोचकांनी दोन्ही संघांवर टीका केली. मैदानात उपस्थित प्रेक्षकांनीही – यात दोन्ही संघांचे समर्थक होते – खेळाडूंची हुर्यो उडवली. फिफाने मात्र कोणतीही कारवाई केली नाही. कारण दोन्ही संघांनी कोणताही नियमभंग केला नसल्याचा बुळचट बचाव फिफाकडून करण्यात आला. मात्र यापासून बोध घेऊन पुढील वर्ल्ड कपमध्ये शेवटच्या साखळी सामन्यांसाठीच्या नियमात बदल करण्यात आला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 12:25 IST

संबंधित बातम्या