Seizure of Captagon डिसेंबर २०२३ मध्ये जर्मनीमध्ये शेकडो किलो कॅप्टॅगॉन गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर बुधवारी आचेनमध्ये चार पुरुषांविरुद्ध खटला सुरू झाला. त्यांनी परदेशांत ५८ दशलक्ष युरोपेक्षा जास्त किमतीच्या गोळ्या विकल्याचा आरोप आहे. त्यानंतर कॅप्टॅगॉन गोळ्यांची चर्चा सुरू झाली. कॅप्टॅगॉन हे सामान्यत: गरिबांचे कोकेन म्हणून ओळखले जाते. मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील तरुणांमध्ये याच्या सेवनाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. १९८६ मध्ये बहुतेक देशांनी वैद्यकीय बाजारपेठांमध्ये ‘कॅप्टॅगॉन’च्या विक्रीवर बंदी आणली होती. परंतु, पूर्व युरोप आणि मध्य पूर्वेमध्ये २००० च्या दशकाच्या सुरुवातीला ‘कॅप्टॅगॉन’ची बेकायदा विक्री होत असल्याचे आढळून आले. सध्या हमास-इस्रायल यांच्यात संघर्ष सुरू आहे. हमासचे सैनिक युद्धादरम्यान ‘कॅप्टॅगॉन’च्या गोळ्या वापरत असल्याची माहितीही समोर आली आहे. कॅप्टॅगॉन नक्की काय आहे? आरोग्यावर याचा काय परिणाम होतो? याचे उत्पादन कोणकोणत्या देशात होते? याविषयी जाणून घेऊ.
कॅप्टॅगॉन म्हणजे काय?
कॅप्टॅगॉन हे एक कृत्रिम औषध आहे; जे मुळात १९६० आणि १९७० च्या दशकात जर्मनीमध्ये उपचार करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले. मध्य पूर्वेतील तरुणांमध्ये कॅप्टॅगॉनचा वापर प्रचलित आहे. सामान्यतः कॅप्टॅगॉन हे पार्टी ड्रग म्हणून वापरले जाते. अनेक वृत्तांनुसार, सीरियातील सैनिक लढाऊ कामगिरी वाढविण्यासाठी आणि थकवा कमी करण्यासाठी या ड्रगचा वापर करतात. या गोळीमध्ये फेनेथिलाइन, एक कृत्रिम ॲम्फेटामाइन, कॅफिन व इतर उत्तेजके असतात.
हेही वाचा : Independence Day 2024 : भारताचा राष्ट्रध्वज कसा तयार झाला? जाणून घ्या इतिहास…
‘कॅप्टॅगॉन’ची व्यसनाधीनता आणि आरोग्यावरील परिणाम
ॲम्फेटामाइन (ड्रगचा प्रकार)सारखाच याचाही मज्जासंस्थेवर परिणाम होतो. सायकोस्टिम्युलंट म्हणून कॅप्टॅगॉन शरीरातील उत्साह आणि शारीरिक व मानसिक कार्यक्षमता वाढवू शकते. परंतु, याच्या जास्त वापरामुळे शरीराच्या आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता असते. हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. सगळ्यात मोठी समस्या म्हणजे काही बेकायदा प्रयोगशाळांमध्ये तयार केल्या जाणाऱ्या कॅप्टॅगॉनच्या काही गोळ्यांमध्ये फेनिथिलाइनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्याचा घातक परिणाम होण्याची शक्यता आणखीनच वाढते.
कॅप्टॅगॉन कुठे तयार केले जाते?
सीरिया हा गेल्या दशकात कॅप्टॅगॉनचा सर्वांत मोठा उत्पादक आणि निर्यातदार ठरला आहे. तज्ज्ञांनी सीरियाला मध्य पूर्वेतील नार्को राज्य, असे नाव दिले आहे. ब्रिटन सरकारच्या विधानानुसार जगातील ८० टक्के कॅप्टॅगॉन सीरियामध्ये तयार होते. २०११ च्या अरब स्प्रिंगच्या निषेधानंतर कॅप्टॅगॉनची लोकप्रियता सीरियामध्ये प्रचंड वाढली. बीबीसीसारख्या प्रमुख प्रसारमाध्यमांच्या तपास अहवालांनीही हे उघड केले आहे. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर असद यांनी त्यांच्या सरकारने ड्रगमधून नफा मिळविण्यासाठी कोणतेही संघटित प्रयत्न केल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. २०२१ मध्ये सीरियन गृहयुद्ध सुरू झाल्यापासून आंतरराष्ट्रीय निर्बंध असूनही कॅप्टॅगॉनच्या व्यापाराने सीरियाच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावला आहे. एकट्या २०२१ मध्ये सीरियामध्ये कॅप्टॅगॉन ड्रग व्यापाराची अंदाजे किंमत ५.७ अब्ज डॉलर्स इतकी होती. हे ड्रग प्रामुख्याने आखाती देश आणि शेजारच्या इराक व जॉर्डनमध्ये निर्यात केले जाते. या ड्रगला बहुतेकदा धान्य आणि फळांसारख्या उत्पादनांमध्ये लपवले जाते. लेबनॉनमधील हिजबुल्लाहदेखील या ड्रगचा मोठा निर्माता आहे.
कॅप्टॅगॉन कुठे निर्यात केले जाते?
जॉर्डन, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या मध्य पूर्वेतील देशांसाठी कॅप्टॅगॉन हा एक प्रमुख चिंतेचा विषय ठरत आहे. आजूबाजूच्या सर्व देशांमध्ये अमली पदार्थविरोधी कायदे आहेत; जेथे बेकायदा हा व्यापार करणार्यांना कठोर शिक्षा आहेत. मात्र, अजूनही सीरिया आणि लेबनॉनमधून कॅप्टॅगॉनची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. बेकायदा व्यापार रोखण्यासाठी जॉर्डन अनेक पावले उचलताना दिसत आहे. देशाचे परराष्ट्रमंत्री अयमन सफादी यांनी जुलैमध्ये जाहीर केले की, मागील दोन वर्षांत ६५ दशलक्षांहून अधिक कॅप्टॅगॉन गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. जॉर्डनच्या सैन्याने सीरियाच्या सीमेवर ड्रग्ज तस्करांविरुद्ध ‘शूट टू किल’ धोरण स्थापित केले आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये सौदी अधिकाऱ्यांनी रियाध ड्राय पोर्टमधून जात असलेल्या जहाजामधून तस्करी केल्या जात असलेल्या ४६ दशलक्ष गोळ्या जप्त केल्या.
इतर देशातही कॅप्टॅगॉनचा वापर वाढत आहे का?
कॅप्टॅगॉनच्या वापराबद्दल अचूक आकडेवारी उपलब्ध नाही आणि जगभरात याचे प्रमाण किती व्यापक आहे, याची अधिकार्यांनाही कल्पना नाही. परंतु, महितीनुसार कॅप्टॅगॉन युरोपियन देशांसाठीदेखील एक समस्या ठरत आहे. त्यांनी अहवालात असे नमूद केले आहे की, २०१८ ते २०२३ पर्यंत युरोपियन युनियन सदस्य देशांनी सुमारे १२७ दशलक्ष गोळ्या (१,७७३ किलोग्रॅम) जप्त केल्या आहेत. २०२० मध्ये इटलीतील सालेर्नो येथे ८४ दशलक्ष गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. मुख्यतः नेदरलँड्समधील बेकायदा प्रयोगशाळांमध्ये कॅप्टॅगॉनचे बेकायदा उत्पादनदेखील केले जात आहे. सामान्यतः कॅप्टॅगॉन ॲम्फेटामाइन पावडरपासून तयार केले जाते.