Who discovered the Samadhi of Chhatrapati Shivaji Maharaj in Raigad? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत पुण्यातील एका भाषणात म्हणाले की, स्वातंत्र्यसेनानी बाळ गंगाधर टिळक यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. त्यांच्या या वक्तव्यानंतर एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. ओबीसी नेत्यांकडून या वक्तव्याचा निषेध केला आहे. समाजसुधारक ज्योतिराव फुले यांनी महाराजांच्या समाधीचा शोध लावला आणि त्याचे श्रेय हिरावून घेतले जात आहे, असाही आरोप करण्यात आला आहे. शिवाजी महाराजांचे स्मरण व्हावे म्हणून प्रबोधनाची चळवळ सुरू झाली आणि रायगडावर सोहळा सुरु झाला. हे टिळकांनी शोध घेतल्यामुळेच झाले असं भागवत म्हणाले. त्यानंतर सुरू झालेल्या या वादात केवळ इतिहासच नाही तर अनेक सामाजिक मुद्द्यांचे प्रतिबिंब पाहायला मिळते आहे.
शिवाजी महाराजांची समाधी कोठे आहे?
१६८० साली शिवाजी महाराजांच्या देहावसनानंतर, त्यांचे अंत्यसंस्कार हे रायगड किल्ल्यावर करण्यात आले. त्यांची समाधी नंतरच्या कालखंडात बांधण्यात आली होती. मराठा कालखंडात या समाधीवर एक दगडी रचना बांधण्यात आली होती. एका लहानश्या प्लॅटफॉर्मवर दगडी रचना उभारण्यात आली होती. परंतु तत्कालीन साहित्यात महाराजांच्या देहत्यागानंतर लगेचच समाधी उभारल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. कालांतराने हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. १६८९ ते १७३३ या कालखंडादरम्यान हा किल्ला मुघल आणि सिद्दीच्या ताब्यात होता. १७३३ साली पुन्हा एकदा मराठ्यांनी किल्ला ताब्यात घेतला. ब्रिटिशांनी ताब्यात घेईपर्यंत १८१८ सालापर्यंत तो मराठ्यांच्याच ताब्यात होता. ब्रिटिशांनी म्हटले आहे की, किल्ला ताब्यात घेतला तेंव्हा या किल्ल्याची अतोनात हानी झाली होती. किल्ल्यातील अनेक संरचना उध्वस्त अवस्थेत होत्या. यात समाधीचाही समावेश होता. समाधीचा सर्वात जुना संदर्भ हा लेफ्ट.कर्नल डेव्हिड प्रॉथर यांच्या लिखाणात सापडतो. त्यांनी विजयानंतर ब्रिटिश सैन्याचे रायगडावर नेतृत्त्व केले होते. यावेळी त्यांनी समाधीची पाहिलेली अवस्था लिहून ठेवली. किल्ल्यातील रचनांच्या भग्न अवस्थेवर त्यांनी प्रकाश टाकला, त्यानंतर ब्रिटिशांनी या किल्ल्यातील प्रवेशावर बंदी घातली होती.
अधिक वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj: सूरत लुटीचे ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात?
ब्रिटिशकालीन संदर्भ काय सांगतात?
असा दावा केला जातो की, पेशव्यांच्याही कालखंडात ही समाधी दुर्लक्षित होती. किंबहुना १८८३ साली जेम्स डग्लस याने या किल्ल्याला भेट दिली तेव्हाही या समाधीची अवस्था भग्नच होती. जेम्स डग्लस हे ‘अ बुक ऑफ बाँम्बे या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यांनी या किल्ल्याला दिलेल्या भेटी संदर्भात उल्लेख या पुस्तकात सापडतात. ते लिहितात, ‘महाराजांचा राज्याभिषेक, लग्न, आणि मृत्यू या किल्ल्यावर झाला. त्यांच्या समाधीभोवती तण वाढलेले आहेत. रानटी झाडं वाढलेली आहेत. मंदीर जीर्ण आणि उध्वस्त झालेलं आहे. कोणत्याही माणसाला सिवाजीची काळजी नाही.’नंतरच्या मराठा राजांनी या समाधीची का काळजी घेतली नाही या संदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणतात, कोल्हापूर, साताऱ्याच्या राजांनी आणि पुण्याच्या पेशव्यांनी समाधीच्या जिर्णोद्धारासाठी एकही छदाम खर्च केला नाही. आर्थर क्राफर्ड, तत्कालीन मुंबईचे कलेक्टर यांनी त्यांच्या अवर ट्रबल इन पूना अँड द डेक्कन अँड क्वेश्चन इट्स नेगलेक्ट या पुस्तकात समाधीच्या स्थितीबद्दल म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पेशवे गेल्या ३०० वर्षात शिवाजी महाराजांच्या समाधीचे संवर्धन करण्यास का विसरले? …त्यांनी समाधीचे वर्णन करताना म्हटले आहे की, त्यांनी एक प्लॅटफॉर्म पाहिला. एका वृद्ध व्यक्तीने या समाधीपर्यन्तचा मार्ग दाखवला. समाधी भग्न अवस्थेत होती.
ज्योतिबा फुले यांनी समाधीला भेट का दिली?
पुराव्यांच्या आधारे हे स्पष्ट होते की, या समाधीला वारंवार भेट दिली गेली नसली तरी समाधीविषयी ब्रिटिशांना माहीत होते. १८६९ साली, ज्योतिबा फुले यांनी भेट दिल्याचे म्हटले जाते. १९ व्या शतकात ज्योतिबा फुले यांचे सामाजिक व्यक्तिमत्त्व महत्त्वाचे होते. त्यांनी जात व्यवस्थेला विरोध केला. निम्न जातींच्या उन्नतीसाठी कार्य केलं. शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणले. त्यावर्षी त्यांनी रायगडाला भेट दिली त्याच वर्षी त्यांनी ‘छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा’ लिहिला. त्यांनी या पोवाड्यात सामान्य जनतेचा राजा असे महाराजांचे वर्णन केले. म्हणजेच जवळपास अर्धशतकभर ही समाधी दुर्लक्षित होती आणि रानटी झाडाझुडुपाने ग्रासली होती. ज्योतिबा फुले यांनी भेट देईपर्यंत त्या कालखंडात तिथे कोणीही भेट दिली नव्हती. हा प्रसंग दीनबंधू या वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आला होता. असे इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी त्यांच्या समाधी शोध व बोध या पुस्तकात म्हटले आहे.
टिळकांची भूमिका काय होती?
जेम्स डग्लस यांच्या पुस्तकातील वर्णनानंतर अनेक मराठी भाषकांनी या समाधीला भेट दिली. वसईच्या गोविंदराव बाळाजी जोशी यांनी ३ एप्रिल १८८५ रोजी रायगडाला भेट दिली होती. त्यांनी जवळपास ४५ हजार ०४६ रुपयांचा खर्च डागडुजीसाठी काढला होता. रचना साधी असल्याने या वास्तूच्या डागडुजीसाठी ब्रिटिशसरकारने ५० रुपये इतका खर्च केला आणि देखरेखीसाठी रुपये पाच प्रतिवर्ष अशी सोय केली. १८९५ साली लोकमान्य टिळकांनी या वास्तूच्या छत्रीच्या बांधकामासाठी निधीची व्यवस्था करण्यासाठी रायगडावर एक सभा बोलावली. त्या सभेत या समाधीच्या जीर्णोद्धार आणि बांधकामासाठी एक समिती नेमण्यात आली. पाच सदस्यीय समितीचे सचिव लोकमान्य टिळक होते. त्यांनी या समाधीच्या कामासाठी २५ हजारांचा निधी गोळा केला आणि डेक्कन बँकमध्ये जमा केला. परंतु १९१३ साली त्या बँकेचे दिवाळे निघाल्यामुळे तो निधी गमावला. तसेच १९२० साली टिळकांच्या मृत्यूनंतर ही मोहीम ही बारगळली. त्यानंतर १९२५ साली ब्रिटिश सरकारने समाधीच्या बांधकाम आणि जीर्णोद्धारासाठी परवानगी दिली होती.
अधिक वाचा: ३५७ वर्षे झाली, छत्रपती शिवरायांचा किल्ला मजबूत; पण पुतळा मात्र कोसळला…
राजकीय नेत्यांनी आक्षेप काय घेतला आहे?
सध्याचा वाद हा इतिहास बदलाचे कट-कारस्थान असल्याचा आक्षेप घेतला जात आहे. ‘हे सत्य आहे की ज्योतिबा फुलेंनी समाधी शोधली आणि त्यांनीच शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली. हे ऐतिहासिक सत्य आहे जे कोणीही बदलू शकत नाही असे ओबीसी नेते आणि राज्यमंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. अनेक इतिहासकारांनीही यावर प्रश्न विचारले आहेत. टिळकांनी समाधी शोधल्याचा कुठलाही पुरावा नसताना, त्यांचे नाव का गोवले जात आहे. किंबहुना समाधीच्या जीर्णोद्धारासाठी १८९५ पासून सुरू केलेल्या मोहिमेचे श्रेय टिळकांनाच जाते. परंतु बँकेचे दिवाळे निघाल्यामुळे तसेच टिळकांच्या मृत्यूनंतर ही मोहीम बारगळली, असा आक्षेप घेतला जात आहे.