Ashley Tellis arrest अमेरिकेचे दीर्घकाळ सल्लागार राहिलेले भारतीय वंशाचे परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक तथा संरक्षण रणनीतीकार अॅश्ले टेलिस यांना चीनसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अॅश्ले टेलिस यांनी अमेरिकन प्रशासनाचे सल्लागार म्हणून दीर्घकाळ काम पाहिलेले आहे. मात्र, आता त्यांच्यावर अमेरिकन प्रशासनाने हेरगिरी केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यावर गोपनीय नोंदी स्वतःकडे ठेवल्याचा आणि चिनी अधिकाऱ्यांशी भेट घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कोण आहेत अॅश्ले टेलिस? त्यांच्यावर नक्की काय आरोप करण्यात आले? भारताशी त्यांचा संबंध काय? जाणून घेऊयात…
अॅश्ले टेलिस यांना अटक
- अमेरिकेत भारतविषयक तज्ज्ञांमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेले आणि परराष्ट्र विभागात वरिष्ठ सल्लागार असलेले अॅश्ले टेलिस यांच्यावर राष्ट्रीय संरक्षणविषयक माहिती बेकायदा पद्धतीने स्वतःकडे ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
- ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मिळालेल्या न्यायालयीन कागदपत्रांनुसार, टेलिस यांच्यावर राष्ट्रीय संरक्षणाशी संबंधित गोपनीय सामग्री बेकायदा स्वतःकडे ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
- तसेच त्यांच्यावर चिनी सरकारच्या अधिकाऱ्यांबरोबर अनेक बैठका घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

अॅश्ले टेलिस कोण आहेत?
अॅशले टेलिस यांचा जन्म भारतात झाला आहे. ६४ वर्षीय अॅश्ले जे. टेलिस हे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागात एका महत्त्वाच्या पदावर आहेत. ते २००१ पासून सल्लागार म्हणून काम करीत आहेत. २००६ च्या आसपास झालेल्या अमेरिका-भारत अणुकराराच्या (US-India civil nuclear deal) वाटाघाटींमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे सांगितले जाते.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्यापासून ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळापर्यंत टेलिस यांनी वरिष्ठ पदांवर काम केले आहे. वृत्तसंस्था ‘एएफपी’ ने दिलेल्या वृत्तानुसार, २००८ मध्ये बुश प्रशासनाच्या भारताबरोबरच्या ऐतिहासिक नागरी अणुकराराच्या वाटाघाटींमध्ये अॅश्ले टेलिस यांची भूमिका निर्णायक होती. या करारामुळे जगातील दोन मोठ्या देशांमधील संबंध अधिक मजबूत होण्यास मोठी कलाटणी मिळाली, असे मानले जाते.
भारत-अमेरिकेतील टॅरिफ तणावावर अॅश्ले टेलिस यांचे मत
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लागू केल्यानंतर, अमेरिकेचे अनेक सरकारी अधिकारी आणि परराष्ट्र विभागाशी संबंधित धोरणात्मक तज्ज्ञांनी या घडामोडीवर आपली मते व्यक्त केली होती. त्यांच्यापैकी अॅश्ले जे. टेलिस यांनी या निर्णयामागील कारण काय असू शकते, याबद्दल आपले मत मांडले. मे महिन्यात झालेला भारत-पाकिस्तान संघर्ष मिटवल्याबद्दल आपल्याला श्रेय मिळाले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे ट्रम्प यांना वाटले असावे, असे टेलिस यांनी सुचवले.
‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत अॅश्ले टेलिस म्हणाले, “मे २०२५ मध्ये झालेले भारत-पाकिस्तानमधील तणाव सोडवल्याबद्दल आपल्याला जे श्रेय मिळायला हवे होते, ते मिळाले नाही, असे त्यांना वाटत आहे. माझा संशय असा आहे की, पंतप्रधान मोदींनी त्यांना परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी जो फोन केला, त्याने परिस्थिती सुधारण्याऐवजी ती आणखीन चिघळली.” डोनाल्ड ट्रम्प यांनी वेळोवेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी घडवून आणल्याचा दावा केला आहे, जो दावा भारताने नेहमीच फेटाळून लावला आहे.
अॅश्ले टेलिस यांच्यावरील आरोप
व्हर्जिनिया येथील न्यायालयात अॅश्ले टेलिस यांच्याविरोधात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात अनेक आरोपांचा समावेश आहे. त्यामध्ये राष्ट्रीय संरक्षणाशी संबंधित माहिती बेकायदा स्वतःकडे ठेवल्याप्रकरणी केंद्रीय कायद्यांचे उल्लंघन केल्याचे नमूद करण्यात आले आहे. सप्टेंबर २०२२ ते सप्टेंबर २०२५ या काळात त्यांनी व्हर्जिनियाच्या फेअरफॅक्स येथील रेस्टॉरंट्समध्ये चिनी सरकारच्या अधिकाऱ्यांबरोबर अनेक बैठका घेतल्याचेही यामध्ये नमूद आहे.
१५ सप्टेंबर २०२२ च्या रात्रीच्या जेवणाचा उल्लेख करीत या कागदपत्रांत म्हटले आहे, “टेलिस एका मॅनिला पाकिटासह (Manila envelope) रेस्टॉरंटमध्ये गेले. मात्र, बाहेर पडताना ते पाकीट त्यांच्याजवळ दिसले नाही.” प्रतिज्ञापत्रानुसार, अॅश्ले टेलिस आणि चिनी अधिकारी यांच्यात इतर गोष्टींबरोबरच इराण-चीन संबंध आणि अमेरिका-पाकिस्तान संबंधांवर चर्चा झाली, असे कथितरीत्या ऐकण्यात आले आणि टेलिस यांना अधिकाऱ्यांकडून एक लाल रंगाची भेटवस्तूंची पिशवीही मिळाली होती.
आरोप सिद्ध झाल्यास काय कारवाई होणार?
अमेरिकेचे ॲटर्नी लिंडसे हॅलिगन यांनी सांगितले, “या प्रकरणात टेलिस यांच्यावर केले गेलेले आरोप आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका असल्याचे दर्शवतात,” असे वृत्त ‘एएफपी’ वृत्तसंस्थेने दिले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या माहितीनुसार, गोपनीय कागदपत्रे बेकायदा पद्धतीने स्वतःकडे ठेवल्याच्या आरोपाखाली अॅश्ले टेलिस दोषी आढळल्यास त्यांना जास्तीत जास्त १० वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि २,५०,००० डॉलर्सपर्यंतचा दंड होऊ शकतो.