Iran’s Most Powerful Man : इराण आणि इस्रायलमधील तणाव शिगेला पोहोचलेला असतानाच तेहरानचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी हे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. इस्रायलबरोबरच्या युद्धात इराणने ‘विनाअट संपूर्ण शरणगती’पत्करावी असा सल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. मात्र, त्यांचा हा सल्ला खामेनी यांनी धुडकावून लावला आहे. इतकंच नाही तर, इस्रायलशी हातमिळवणी करून अमेरिकेने इराणवर कुठलीही कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कधीही न भरून निघणारे नुकसान सहन करावे लागेल, असा इशाराही खामेनी यांनी दिला आहे. दरम्यान, कोण आहेत अयातुल्ला अली खामेनी? ते इराणचे सर्वोच्च नेते कसे झाले? याबाबत जाणून घेऊ…
८६ वर्षीय अयातुल्ला अली खामेनी हे इराणचे सर्वोच्च नेते आहेत. देशाचे परराष्ट्र धोरण असो की ऊर्जा धोरण यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार खामेनी यांच्याकडेच आहे. १९८९ मध्ये अयातोल्ला रुहोल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांनी इराणच्या सर्वोच्च नेतेपदाची सूत्रे स्वीकारली. जवळपास तीन दशकांपासून खामेनी हे इराणवर एकहाती वर्चस्व गाजवित आहेत. इराणमधील एक अख्खी पिढी त्यांच्या नेतृत्वाशिवाय देशाच्या विकासाची कल्पनाही करीत नाही. खामेनी हे इराणचे प्रमुख आहेतच, पण त्याचबरोबर ते इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कोअरचे (आयआरजीसी) कमांडर-इन-चीफही आहेत, या सर्व अधिकारांमुळे खामेनी हे इराणचे सर्वात शक्तिशाली नेते झाले आहेत.
‘धर्मगुरू ते शक्तिशाली नेता’
- १९३९ मध्ये इराणच्या मशहद या शहरातील एका धार्मिक कुटुंबात खामेनी यांचा जन्म झाला.
- त्यांनी मशहदमधील मदरशांमध्ये धार्मिक शिक्षण घेतले आणि नंतर ते पुढील शिक्षणासाठी कोम शहरात गेले.
- १९६२ पासून खामेनी यांनी इराणचे तत्कालीन सम्राट मोहम्मद रझा पहलवी (शहा) यांच्या विरोधात राजकीय हालचाली सुरू केल्या.
- अयातुल्ला अली खामेनी यांना इराणच्या इस्लामी क्रांतीच्या आधी अनेकदा तुरुंगवासही भोगावा लागला.
- १९६० च्या दशकात ते काही काळ देशाबाहेर हद्दपारही झाले होते, पण १९७९ च्या क्रांतीनंतर ते पुन्हा इराणमध्ये परतले.
- इराणच्या क्रांतीनंतर खामेनी यांना सत्तेच्या केंद्रस्थानी आले. त्यांनी इराणच्या क्रांतिकारी परिषदेवर काम केले.
- इराणच्या संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर खामेनी यांनी देशात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअरची स्थापना करण्यातही भाग घेतला.
- एका भीषण स्फोटात गंभीर जखमी झाल्यानंतर खामेनी यांचा उजवा हात कायमस्वरुपी अकार्यक्षम झाला.
आणखी वाचा : अमेरिकेने १९५३ मध्ये इराणमधील सत्ता कशी उलथवून टाकली होती? ४ दिवसांत काय घडलं होतं?
खामेनी यांच्या सर्वोच्च नेतेपदासाठी इराणच्या घटनेत बदल
१९८१ मध्ये इराणचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद-अली रजाई यांची हत्या झाल्यानंतर खामेनी यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. त्यांची नियुक्ती इराणमधील तेव्हाच्या घटनात्मक संरचनेत औपचारिक स्वरूपाची होती. त्यावेळी पंतप्रधान मीर होसैन मूसावी यांच्याशी त्यांचे अनेकदा वाद झाले, कारण खामेनी यांना ते अत्यंत सुधारणावादी वाटत होते. १९८९ मध्ये इराणच्या ८८ जणांच्या ‘असेम्ब्ली ऑफ एक्स्पर्ट्स’ने अयातुल्ला अली खामेनी यांची सर्वोच्च नेते म्हणून निवड केली. विशेष बाब म्हणजे, त्यावेळी खामेनी यांच्याकडे आवश्यक धार्मिक पदवी नव्हती, असे असतानाही इराणच्या घटनेत बदल करून त्यांना सर्वोच्च नेतेपद देण्यात आले. त्यानंतरच इराणमधील पंतप्रधानपद रद्द करण्यात आले आणि देशाचे संपूर्ण अधिकार हे सर्वोच्च नेत्याकडे देण्यात आले.

इस्रायल आणि अमेरिकेविरोधात खामेनी यांची भूमिका
अयातुल्ला अली खामेनी यांनी अनेकदा इस्रायल आणि अमेरिकेवर कठोर शब्दात टीका केली आहे. त्यांनी इस्रायलचा उल्लेख ‘कर्करोगासारखा ट्युमर’ म्हणून केलेला आहे. गेल्या काही दशकांमध्ये इराणमध्ये अनेक राष्ट्राध्यक्ष आले आणि गेले, पण खामेनी हे सत्तेचे अंतिम केंद्रबिंदू राहिले आहेत. त्यांच्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते कोण होणार? हा प्रश्न अनेक वर्षांपासून अनुत्तरित आहे. एकेकाळी ईब्राहीम रायसी हे खामेनी यांचे संभाव्य उत्तराधिकारी मानले जात होते. रायसी हे माजी राष्ट्राध्यक्ष आणि माजी न्यायप्रमुख होते. पण मे २०२४ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने ही शक्यता मावळली. आता अनेकांचे मत आहे की खामेनेई यांचा मुलगा पुढे सर्वोच्च नेते म्हणून पुढे येऊ शकतो.
हेही वाचा : पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची अमेरिका दौऱ्यात नाचक्की; असीम मुनीर यांना कोण करतंय लक्ष्य?
खामेनी यांनी इस्रायलला काय इशारा दिला?
इस्रालयने तेहरानमधील आण्विक तळांना लक्ष्य केल्यानंतर खामेनी यांनी संताप व्यक्त केला आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना इराणकडून चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. “इराणी सशस्त्र दल संपूर्ण ताकदीनं इस्रालयच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देईल आणि त्यांना गुडघे टेकायला लावेल,” असं खामेनी यांनी म्हटलं आहे. इस्रायलबरोबरच्या युद्धात इराणने ‘विनाअट संपूर्ण शरणगती’पत्करावी असा सल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. मात्र खामेनी यांनी त्यांचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. ट्रम्प यांनी मंगळवारी शरण येण्याबाबत भाष्य केल्यानंतर इराणच्या सरकारी वाहिनीवरून खामेनी यांचा संदेश बुधवारी प्रक्षेपित करण्यात आला.
“इराण कधीही शरण येणार नाही”
खामेनी यांनी त्यांच्या संदेशात ट्रम्प यांचा विनाअट शरण येण्याच्या प्रस्तावाची खिल्ली उडविली. “इराण शरण येणार नाही. ज्या बुद्धिमान लोकांना इराणचा इतिहास माहीत आहे, ते अशा भाषेत बोलणार नाहीत. इराण शरण येणाऱ्यातला नाही. इस्रायलबरोबर सुरू असलेल्या युद्धात कुठलाही लष्करी सहभाग अमेरिकेचे कधीही भरून न येणारे नुकसान करेल”, असा इशाराही खामेनी यांनी दिला आहे. इस्रायल व इराण यांच्यातील संघर्षादरम्यान अशीही माहिती समोर आली होती की, इस्रायलने युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यात खामेनी यांना लक्ष्य करून ठार मारण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, हा प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळून लावला. ही ‘चांगली कल्पना नाही’ असं सांगून ट्रम्प यांनी इस्रायलचा हा प्रस्ताव नाकारल्याचं सांगितलं जातं.