Delhi Police Commissioner appointment दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी (२० ऑगस्ट) एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान हल्ला झाला. मुख्यमंत्री आवासामधील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री रेखा गुप्ता साप्ताहिक जनसुनावणी (जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी सुरू केलेला साप्ताहिक उपक्रम) करत होत्या. त्याचवेळी एक तरुण त्याची तक्रार घेऊन तिथे दाखल झाला. तक्रार सांगत असतानाच या तरुणाने मुख्यमंत्री गुप्ता यांच्या कानशिलात लगावली. यानंतर दिल्ली पोलिसींनी राजेश खिमजी साक्रिया याला ताब्यात घेतले आहे.

रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला झाल्यानंतर आता नवीन पोलिस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठ आयपीएस अधिकारी शशी भूषण कुमार सिंग यांच्या जागी सतीश गोलचा यांची दिल्ली पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर हा बदल करण्यात आला आहे. बुधवारी हा हल्ला झाल्यानंतर मुख्यमंत्री गुप्ता यांची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. कोण आहेत सतीश गोलचा? मुख्यमंत्र्यांवरील हल्ल्याचे नेमके प्रकरण काय आहे? त्याविषयी जाणून घेऊयात.

प्रकरण काय?

बुधवारी सकाळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या ‘सिव्हिल लाइन्स कॅम्प’ कार्यालयात ‘जन सुनावणी’ सुरू असताना, एका व्यक्तीने त्यांच्या कानशि‍लात लगावली. भाजपाच्या दिल्लीतील काही सूत्रांनुसार, आरोपीने आधी मुख्यमंत्र्यांना काही कागदपत्रे दिली आणि नंतर त्यांच्यावर हल्ला केला. गुप्ता यांना रुग्णालयात नेण्यात आले असून, त्यांच्या हाताला, खांद्याला आणि डोक्याला दुखापत झाल्याची महिती आहे. हल्ला करणाऱ्या व्यक्तीची ओळख राजेश खिमजी साक्रिया म्हणून झाली आहे. तो आपली पत्नी, मुलगा आणि पालकांबरोबर गुजरातमधील राजकोट शहरात राहतो. त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या आई भानुबेन साक्रिया यांनी माध्यमांना सांगितले की, त्यांचा मुलगा एक प्राणीप्रेमी आहे आणि दिल्लीच्या रस्त्यांवरून सर्व मोकाट कुत्र्यांना निवारागृहांमध्ये हलवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा निषेध करण्यासाठी तो दिल्लीला गेला होता.

गुरुवारी गृह मंत्रालयाने सतीश गोलचा यांची दिल्लीचे नवे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती केली. (छायाचित्र-पीटीआय)

दिल्लीचे नवे पोलिस आयुक्त कोण आहेत?

गुरुवारी गृह मंत्रालयाने सतीश गोलचा यांची दिल्लीचे नवे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती केली. ते १९९२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून, एजीएमयूटी (अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोरम आणि केंद्रशासित प्रदेश) केडरमधून आहेत. सध्या ते तुरुंग विभागाचे महासंचालक (Director General of Prisons) म्हणून कार्यरत आहेत. मंत्रालयाने एका अधिसूचनेत म्हटले आहे, “सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीने सतीश गोलचा यांची दिल्ली पोलिस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पुढील आदेश येईपर्यंत लागू असेल,” असेही मंत्रालयाने म्हटले आहे. गोलचा यांचा जन्म ३० एप्रिल, १९६७ रोजी झाला. त्यांनी दिल्ली पोलिसमध्ये विशेष आयुक्त (गुप्तचर) आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पोलिस महासंचालक (डीजीपी) म्हणूनही काम केले आहे.

२०२० मध्ये ईशान्य दिल्लीत झालेल्या दंगलींच्या वेळी ते विशेष पोलिस आयुक्त होते. गेल्या वर्षी त्यांची तुरुंग विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, दिल्लीच्या नव्या पोलिस प्रमुखांना दोन मुले आहेत. त्यापैकी एका मुलाचा स्वतःचा स्टार्टअप व्यवसाय आहे. गोलचा यांची शशी भूषण कुमार सिंग यांच्या जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे. संजय अरोरा यांच्या निवृत्तीनंतर १ ऑगस्ट रोजी गृह रक्षक दलाचे महासंचालक असलेले सिंग यांची दिल्ली पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. सिंग हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत आणि ते सुद्धा एजीएमयूटी केडरमधून आहेत.

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ

हल्ल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) दिल्ली पोलिसांकडून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था ताब्यात घेतली. त्यांना ‘झेड’ (Z) श्रेणीची सुरक्षा पुरवली जात आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या एका सूत्रांनुसार, सुरुवातीच्या तपासणीत बुधवारी झालेल्या घटनेमागे मोठ्या सुरक्षा त्रुटी आढळल्याने सीआरपीएफकडे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची सुरक्षा सोपवण्यात आली. मुख्यमंत्री गुप्ता यांनी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली असून, अशा घटना लोकांसाठी काम करण्याचा त्यांचा संकल्प तोडू शकत नाहीत, असे म्हटले आहे.

त्यांनी ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये लिहिले, “या हल्ल्यामुळे मला स्वाभाविकपणे धक्का बसला, पण आता मी ठीक आहे. मी माझ्या शुभचिंतकांना हे सांगू इच्छिते की, मला भेटण्यासाठी आतूर होऊ नका. मी लवकरच तुमच्या सगळ्यांसह काम करताना दिसेन. अशा प्रकारचे हल्ले माझी हिंमत आणि जनतेची सेवा करण्याचा माझा संकल्प हे दोन्हीही तोडू शकत नाहीत.” त्या पुढे म्हणाल्या, “मी आता अधिक ऊर्जेने काम करणार आहे, लवकरच मी तुमच्याबरोबर जनतेच्या सेवेसाठी उपस्थित राहणार आहे. जनतेच्या समस्या जाणून त्यावर उपाययोजना यावर मी भर देईन. तुम्हा सगळ्या दिल्लीकरांनी दाखवलेला विश्वास हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे. तुम्हा सगळ्यांचे प्रेम, आपुलकी, स्नेह आणि शुभेच्छा याबाबत मी तुमची आभारी आहे.”

पत्रकारांशी बोलताना कॉर्पोरेट व्यवहार आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी घटनेपूर्वी कोणत्याही सुरक्षा त्रुटी असल्याबद्दल नकार दिला. “त्या ठीक आहेत. आज किंवा उद्यापासून त्या त्यांचे नियोजित कार्यक्रम पुन्हा सुरू करतील. कोणतीही सुरक्षा त्रुटी नव्हती. सुरक्षा कर्मचारी आपले काम पूर्णपणे करतात. सार्वजनिक प्रतिनिधी म्हणून आम्हीदेखील आमच्या कर्मचाऱ्यांना लोकांना आणि कार्यकर्त्यांना आम्हाला भेटू देण्यास सांगतो,” असे ते म्हणाले.

आरोपीने मुख्यमंत्र्यांवर हल्ला का केला?

मुलाने मुख्यमंत्री गुप्ता यांना का कानशिलात लगावली असे विचारले असता राजेशची आई म्हणाल्या, “त्याचे मन तसेच आहे. तो कोणालाही मारेल. त्याने मलाही मारले आहे आणि त्याच्या पत्नीलाही मारले आहे. त्याला मानसिक आजार आहेत, पण तो कोणतेही औषध घेत नाही. श्वानांचा मुद्दा ऐकून त्याला इतका संताप आला की त्याने रागाच्या भरात बेडवर आदळाआपट करून तो बेड मोडला. राजकोट शहराचे डीसीपी जगदीश बांगरवा यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “त्याच्या आईच्या मते राजेश साक्रिया हा प्राणीप्रेमी असल्याचे दिसून येते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने तो व्यथित होता. तो राजकोटमध्येच राहतो, परंतु कुत्र्यांच्या प्रकरणामुळे तो दिल्लीला गेला.”