Vaibhav Taneja America Party : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी अमेरिकेच्या राजकारणात सक्रिय प्रवेश करण्याची घोषणा रविवारी (तारीख ६ जुलै) केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर सुरू असलेल्या संघर्षादरम्यान त्यांनी ‘अमेरिका पार्टी’ हा नवीन पक्ष स्थापन केला. त्यासाठी लागणारी कायदेशीर कागदपत्रेही मस्क यांच्याकडून सादर करण्यात आली. विशेष बाब म्हणजे, या नवीन पक्षात मस्क यांनी भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे, त्यामुळे अमेरिकेत पुन्हा एकदा भारतीयांचीच चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान, कोण आहेत वैभव तनेजा ते जाणून घेऊ…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. ‘बिग ब्युटीफुल बिल’वरून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी आठवडाभरापूर्वी ट्रम्प यांनी मस्क यांना अमेरिकेतून हद्दपार करण्याचा इशारा दिला होता, तर अमेरिकेत नवीन पक्ष काढून आगामी निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीला पराभूत करणार, अशी पोस्ट मस्क यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून शेअर केली होती. त्यानुसार अमेरिका पार्टीची स्थापना करण्यात आली असून भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांच्याकडे पक्षाच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
कोण आहेत वैभव तनेजा?
- वैभव तनेजा यांनी अत्यंत अल्पावधीतच जागतिक पातळीवर उल्लेखनीय यश संपादन केलं.
- सध्या ते टेस्ला कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी (सीईओ) म्हणून काम पाहत आहेत.
- ऑगस्ट २०२३ मध्ये वैभव यांची टेस्ला कंपनीच्या सीईओपदी निवड करण्यात आली.
- याआधी वैभव तनेजा हे एलॉन मस्क यांच्या कंपनीत चिफ अकाउंटिंग ऑफिसर होते.
- मस्क यांच्या नेतृत्वाखालील कंपन्यांमध्ये वैभव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
- वैभव तनेजा यांचा जन्म आणि त्यांचे शिक्षण भारतामध्येच झाले आहे.
- दिल्ली विद्यापीठातून त्यांनी वाणिज्य शाखेतील पदवी प्राप्त केली होती.
- २००० मध्ये वैभव यांनी चार्टर्ड अकाउंटंट (CA) म्हणून पात्रता मिळवली.
- २००६ मध्ये त्यांनी अमेरिकेतून ‘सर्टिफाइड पब्लिक अकाउंटंट’ ही आर्थिक पदवी घेतली.
आणखी वाचा : सैफ अली खानची १५ हजार कोटींची मालमत्ता धोक्यात? उच्च न्यायालयाने काय निर्णय दिला?
वैभव तनेजा यांचा टेस्लामधील प्रवेश आणि कारकीर्द
अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर वैभव यांनी ‘PricewaterhouseCoopers’ या जागतिक आघाडीच्या आर्थिक सल्लागार कंपनीतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांनी भारत आणि अमेरिका येथील कार्यालयांमध्ये मिळून तब्बल १७ वर्ष सेवा दिली. यामध्ये त्यांनी Fortune 500 कंपन्यांना आर्थिक नियमन, आंतरिक आर्थिक नियंत्रण प्रणाली आणि IPO प्रक्रियेबाबत सल्ला दिला. २०१६ मध्ये वैभव तनेजा यांनी प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या नातेवाईकांनी स्थापन केलेल्या SolarCity या सौरऊर्जा क्षेत्रातील कंपनीत काम सुरू केले. त्याच वर्षी टेस्ला कंपनीने SolarCity विकत घेतली आणि तिथून तनेजा यांचा टेस्लामधील प्रवास सुरू झाला.
टेस्लामध्ये वैभव यांना पदोन्नती कशी मिळाली?
एलॉन मस्क यांनी २०१७ मध्ये वैभव यांची टेस्लामध्ये कॉर्पोरेट कंट्रोलर म्हणून नियुक्ती केली. २०१९ मध्ये त्यांच्याकडे मुख्य लेखा अधिकारी (Chief Accounting Officer) पदाची जबाबदारी देण्यात आली. ऑगस्ट २०२३ मध्ये वैभव हे टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले आणि त्यांनी झॅक किर्कहॉर्न यांची जागा घेतली. आज वैभव हे टेस्लाचे जागतिक आर्थिक व्यवहार, धोरणे आणि व्यवस्थापन पाहतात. वैभव हे सध्या अमेरिकेत स्थायिक असले तरी त्यांचे भारताशी घनिष्ठ व्यावसायिक संबंध आहेत.

वैभव तनेजा यांचे वार्षिक उत्पन्न किती?
जानेवारी २०२१ मध्ये त्यांची ‘Tesla India Motors and Energy Pvt Ltd’ या टेस्लाच्या भारतीय उपकंपनीतील संचालक पदावर नियुक्ती झाली आहे. भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील टेस्लाच्या योजनेसाठी वैभव हे एक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. एका आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये वैभव तनेजा यांचे दरडोई उत्पन्न १३९ दशलक्ष डॉलर्स (भारतीय चलनात ११५० कोटी रुपये इतके होते, ज्यामध्ये स्टॉक पर्याय आणि इक्विटी बोनस यांचा समावेश होता. ‘The Washington Post’च्या माहितीनुसार, ही कमाई मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला आणि गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या कमाईपेक्षाही जास्त आहे.
हेही वाचा : Maharashtra Politics : ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्यातील भाषिक संघर्षाला कशी चालना मिळाली?
वैभव तनेजा यांच्याकडे कोणती राजकीय जबाबदारी?
वित्त, लेखा आणि जागतिक नेतृत्व क्षेत्रात दोन दशकांहून अधिक अनुभव असलेले वैभव तनेजा हे एलॉन मस्क यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. आता त्यांचा प्रभाव राजकीय क्षेत्रातही झपाट्याने वाढताना दिसत आहे. अमेरिकेच्या ‘Federal Election Commission’ कडे सादर करण्यात आलेल्या अधिकृत कागदपत्रांनुसार अमेरिका पार्टीचे मुख्यालय १ रॉकेट रोड, हॉथथॉर्न येथे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पक्षात एलॉन मस्क हे एकमेव उमेदवार आहेत, तर वैभव तनेजा यांचे नाव ‘कोषाध्यक्ष म्हणून नोंदवण्यात आलेलं आहे. या नोंदींबरोबर तनेजा यांचा टेक्सास शहरामधील पत्ताही देण्यात आलेला आहे. अमेरिका पार्टीच्या आर्थिक व्यवस्थापनाची जबाबदारी तनेजा यांच्याकडे असेल. राजकीय देणग्या स्वीकारणे, वित्तीय कायद्यांचे पालन करणे, नियामक नोंदी ठेवणे आणि सर्व आर्थिक व्यवहारांचे अचूक लेखांकन व नोंद ठेवणे या त्यांच्या प्रमुख जबाबदाऱ्या असतील.
ट्रम्प यांनी उडवली मस्क यांची खिल्ली
रविवारी न्यू जर्सीच्या मॉरिस्टाउन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एलॉन मस्क यांच्या नवीन राजकीय पक्षाची खिल्ली उडवली. तिसरा पक्ष सुरू करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे, असे ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं. “अमेरिकेत तिसरा पक्ष सुरू केल्याने केवळ गोंधळ वाढेल आणि लोक या गोंधळाचा पुरेपूर आनंद घेतील. मला हे पूर्णपणे हास्यास्पद वाटत आहे,” असंही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले.