टेलिव्हिजन क्षेत्रातला सर्वात नावाजलेला आणि कायम चर्चेत असणार प्रोग्राम म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. या कार्यक्रमाने केवळ लोकांचं मनोरंजनच केलं नाही तर मोठमोठ्या सुपरस्टार मंडळींना आपल्या कार्यक्रमात हजेरी लावायला भाग पाडलं. एका स्पर्धेतून कष्ट करून वर आलेल्या कपिल शर्मा या विनोदवीराने या कार्यक्रमातून स्वतःचं नाव प्रस्थापित केलं. या कार्यक्रमाची नंतर कित्येक चॅनल्सनी नक्कल केली. अर्थात कपिलच्या कार्यक्रमाचा हा फॉर्म्युला चांगलाच हिट ठरला. आता पुन्हा कपिल आणि त्याचा हा लोकप्रिय कार्यक्रम चर्चेत आहे पण एका वेगळ्या कारणासाठी.

कपिल शर्मा शोचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याच्या या नव्या कार्यक्रमात आता काही कलाकार आपल्याला पाहायला मिळणार नाही. कृष्णा अभिषेक या कॉमेडीयनने सर्वप्रथम या कार्यक्रमात काम करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या नवीन सीझनमध्ये कृष्णा दिसणार नसल्याचं कारण त्याच्या जवळच्या लोकांकडून स्पष्ट झालं.

कार्यक्रमाचे निर्माते आणि कृष्णा यांच्यात मानधनाच्या बाबतीत बोलणं झालं आणि कृष्णाला हवं तेवढं मानधन मिळत नसल्याने तो या पुढच्या सीझनमध्ये काम करणार नसल्याची गोष्ट समोर आली आहे. सपना हे पात्र साकारणारा कृष्णा हा काही दिवसांत प्रत्येक घरातल्या व्यक्तीचा लाडका झाला. लोकांनी त्याच्या पात्राला भरभरून प्रेम दिलं. कॉंट्रॅक्टवरून झालेल्या गैरसमजामुळे हा कार्यक्रम सोडायला लागल्याचं स्वतः कृष्णाने स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा : “मी गांधीवादी नाही, तर मी…” अभिनेत्री कंगना रणौत तिच्या बेधडक वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत

मध्यंतरी कपिल आणि कृष्णा यांच्यात काहीतरी मतभेद असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण काही लोकांनी त्या चर्चा खोट्या असल्याचा दावा केला आहे. कृष्णा आणि निर्माते यांच्यात मानधनामुळे गैरसमज झाला असून कृष्णाने त्यासाठीच हा कार्यक्रम सोडला आहे. कपिल आणि कृष्णा आजही चांगले मित्र आहेत असं काही लोकांनी स्पष्ट सांगितलं आहे.

कृष्णा पाठोपाठ आता चंदन प्रभाकर हा कॉमेडीयनदेखील या कार्यक्रमातून बाहेर पडणार असल्याची गोष्ट समोर आली आहे. चंदन बऱ्याच काळापासून कपिलबरोबर या कार्यक्रमात चंदू ही व्यक्तिरेखा साकारायचा. त्यालाही लोकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं होतं. आता त्यानेही या कार्यक्रमातून काढता पाय घ्यायचा विचार केल्याने कपिलच्या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. चंदन याने अजूनतरी कार्यक्रम सोडण्याचं ठोस असं कोणतंही कारण सांगितलं नाही.

पिंकव्हीला या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत चंदन याने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. तो म्हणाला की, “मी कपिल शर्मा शोच्या नवीन सीझनचा भाग नसेन. यामागे असं ठोस काही कारण नाहीये. मला काही दिवस या संगळ्यातून विश्रांती घ्यायची आहे म्हणून मी ब्रेक घेत आहे.” चंदनने जरी हे वक्तव्य दिलं असलं तरी त्याचा प्रॉब्लेमदेखील कृष्णासारखाच असल्याची बाहेर चर्चा आहे. २००७ च्या ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या स्पर्धेतून चंदनची कारकीर्द सुरू झाली. कपिल शर्मा शोवर त्याने हवालदार हरपाल सिंग, झंडा सिंग अशा वेगवेगळ्या भूमिका. त्याचा चंदू चायवाला अजूनही लोकांच्या अत्यंत आवडीचा आहे.

आणखी वाचा : Brahmastra Movie Review : ८ वर्षांची मेहनत, ४०० कोटींचं बजेट, प्राचीन भारतीय इतिहासाचा आधार घेऊनही उत्तरार्धात निराधार झालेला ‘ब्रह्मास्त्र’

याबरोबरच या कार्यक्रमातली आणखीन एक लोकप्रिय अभिनेत्री भारती सिंगसुद्धा या नवीन सीझनमध्ये क्वचित दिसेल. ती गरोदर असल्याने शूटिंग आणि तब्येत सांभाळणं कठीण असल्याने ती अधून मधून यामध्ये दिसेल असं भारतीने स्वतःच स्पष्ट केलं आहे. याआधी फक्त कलाकारच नव्हे तर ‘द कश्मीर फाईल्स’च्या कलाकारांना आपल्या कार्यक्रमाचं निमंत्रण न दिल्यानेसुद्धा कपिलवर प्रचंड टीका झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता या सगळ्या प्रकरणांमागची नेमकी कारणं अजूनतरी समोर आलेली नाहीत. हा कार्यक्रम जरी कपिलचा असला तरी तो याचा निर्माता नाही त्यामुळे काही निर्णय त्याच्याही हातात नसतात असं त्याच्या टीमने मध्यंतरी विधान केलं होतं.१० सप्टेंबरपासून ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा सोनी टेलिव्हिजनवर परत येत आहे. शिवाय सुमोना चक्रवर्ती, किकू शारदा हे काही कलाकार आपल्याला त्यांच्या नेहमीच्या अवतरात बघायला मिळणार आहेत.