Why America is obsessed with guns: चार्ली किर्क यांचा मृत्यू जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. शस्त्र बाळगण्याचा अधिकार मिळावा यासाठी लढणारा कार्यकर्ता अशी त्यांची ख्याती होती. बुधवारी युटा व्हॅली विद्यापीठात भाषण देत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांपैकी ते एक होते. ३१ वर्षीय किर्क यांच्या अशा मृत्यूमूळे अमेरिकेतील सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वतःकडे बंदूक बाळगणं ही अमेरिकेत एक सामान्य गोष्ट मानली जाते. अमेरिकेत लोकसंख्येपेक्षा बंदुकींचीच संख्या अधिक आहे. इतर देशांमध्ये या गोष्टीसाठी कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या. परंतु, अमेरिकेत मात्र नियम अधिकच शिथिल करण्यात आले आहेत.
अमेरिकनांची वेडगळ प्रवृत्ती
२०२३ मध्ये, चार्ली किर्क यांनी म्हटले होते की, दरवर्षी काही लोकांचा जीव गेला तरी चालेल पण अमेरिकेच्या संविधानातली दुसरी दुरुस्ती (Second Amendment) महत्त्वाची आहे. ती शस्त्र बाळगण्याचा अधिकार देते. या दुरुस्तीमुळेच देवाने दिलेल्या इतर हक्कांचे रक्षण होते. असं म्हणणाऱ्या चार्ली किर्क यांचाच मानेवर एका स्नायपरची गोळी लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पुन्हा एकदा अमेरिकेतील भीषण वास्तव समोर आलं आहे. अमेरिकनांना असलेला शस्त्रांचा मोह आणि त्यातून समोर येणारी वेडगळ प्रवृत्ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.
अमेरिकेत बंदुकीचे मालक सर्वाधिक
२०१८ साली प्रसिद्ध झालेल्या Small Arms Survey च्या अहवालात म्हटलं आहे की, अमेरिकेत बंदुकांचं प्रमाण प्रति व्यक्ती १.२ असं आहे. हा दर जगात सर्वाधिक आहे. यादवी युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या आणि बंदुकांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या येमेनपेक्षाही हा आकडा दुपटीने जास्त आहे. याचा थेट अर्थ असा की, अमेरिकेत लोकसंख्येपेक्षा जास्त बंदुका आहेत. म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडे सरासरी एकापेक्षा जास्त शस्त्रं आहेत. जागतिक लोकसंख्येच्या ५ टक्क्यांपेक्षा कमी लोक अमेरिकेत राहतात, पण जगातील सर्वसामान्य लोकांकडे असलेल्या बंदुकांपैकी तब्बल ४५ टक्के बंदुका अमेरिकन नागरिकांच्या ताब्यात आहेत. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व व्यापार विभागाच्या मदतीने केलेल्या संशोधनातून ही धक्कादायक वस्तुस्थिती उघड झाली आहे.
….याची किंमत मोजावी लागते
- अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर बंदुका बाळगल्या जातात, शिवाय अमेरिकेतील नागरिकांना लष्करी दर्जाच्या शस्त्रांपर्यंत पोहोचणं अगदी सहज आहे. “याची किंमत मोजावीच लागते,” असंही चार्ली किर्कने २०२३ मधील आपल्या भाषणात म्हटलं होतं.
- २०२३ साली अमेरिकेत बंदुकांमुळे ४६,७२८ जणांचा मृत्यू झाला, असं अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या (CDC) आकडेवारीत दिसतं. म्हणजेच दररोज १२८ मृत्यू आणि प्रति १ लाख लोकसंख्येमागे १४ मृत्यू झाले. या मृत्यूंपैकी निम्म्याहून अधिक प्रकरणं ही आत्महत्येची होती.
- जगातील श्रीमंत देशांच्या यादीतही अमेरिकेतच सर्वाधिक खून
- अमेरिकेत बंदुकीमुळे होणाऱ्या खुनांचा दर प्रति १ लाख लोकसंख्येमागे ४.३८ इतका आहे. एव्हरीटाउन रिसर्च अँड पॉलिसी या शस्त्रनियंत्रणासाठी काम करणाऱ्या संस्थेने २०२२ मध्ये केलेल्या संशोधनानुसार हा दर इतर उच्च उत्पन्न असलेल्या देशांपेक्षा तब्बल २६ पट जास्त आहे. ब्रिटनमध्ये हा दर ०.०५ पेक्षाही कमी आहे, तर जपानमध्ये ०.००१ म्हणजे प्रत्यक्षात शून्यच आहे.

स्वातंत्र्याच्या नावाखाली…
१९७० साली प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधात परंपरावादी इतिहासकार रिचर्ड हॉफस्टॅडर यांनी म्हटलं आहे की, “बुद्धिमान समजल्या जाणाऱ्या अनेक अमेरिकनांचा आजही असा हट्ट आहे की, शस्त्र बाळगण्याचा अधिकार हा त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा सर्वोच्च रक्षक आहे आणि हा अधिकार लोकशाही टिकवून ठेवण्याची हमी आहे.” (अमेरिका अॅज अ गन कल्चर; अमेरिकन हेरिटेज मासिक, १९७०)
हॉफस्टॅडर यांनी म्हटलं आहे की, अमेरिकनांचा शस्त्रांवरील विश्वास हा “शस्त्रांच्या संरक्षणात्मक मूल्याबद्दलच्या ऐतिहासिक पौराणिक कथांशी” निगडित आहे. त्यांच्या दृष्टीने बंदूक ही केवळ शस्त्र नव्हती, तर अत्याचाराविरुद्ध उभं राहण्यासाठीचं साधन होती. अमेरिकन क्रांतीत (१७७५–८३) विस्कळीत मिलिशियांनी ब्रिटिश साम्राज्याच्या ताकदीला सामोरं जाण्याचं धाडस याच बंदुकांच्या जोरावर केलं. त्यानंतर याच शस्त्रांनी अमेरिकनांना ‘वाइल्ड वेस्ट’ जिंकण्यात मदत केली. अमेरिकन संविधानाच्या दुसऱ्या दुरुस्तीत (१७९१) शस्त्र बाळगण्याचा अधिकार संरक्षित करण्यात आला आहे. त्यात म्हटलं आहे की, “सुयोग्यरीत्या संघटित मिलिशिया हे स्वतंत्र राज्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहेत; त्यामुळे जनतेचा शस्त्र बाळगण्याचा आणि वापरण्याचा हक्क अबाधित राहील.”
अमेरिकेच्या संस्थापकांपैकी एक आणि अमेरिकेचे चौथे अध्यक्ष (१८०९–१७) जेम्स मॅडिसन यांनी १७८८ साली लिहिलं होतं की, “युरोपातील राजेशाहींना लोक शस्त्र बाळगतील याची भीती वाटते; कारण जर त्यांनी जनतेवर विश्वास ठेवला, तर त्यांच्या भोवती कितीही सैन्य असलं तरी त्या राजेशाही लवकरच कोसळतील.”(द फेडरलिस्ट पेपर्स : क्रमांक ४६)
१९७० साली हॉफस्टॅडर यांनी नमूद केलं होतं की, अमेरिकनांच्या दृष्टीने सशस्त्र जनता हीच “लष्करीवाद आणि स्वातंत्र्य यांमधील कायमस्वरूपी संघर्षाचं एकमेव उत्तर” आहे. चार्ली किर्कनेही २०२३ मधील आपल्या भाषणात असाच युक्तिवाद केला होता की, दुसरी दुरुस्ती (Second Amendment) ही “हुकूमशाही सरकारविरुद्ध स्वतःचा बचाव करण्याची गुरुकिल्ली” आहे.
‘गन कंट्री’ची निर्मिती
अमेरिकेच्या न्याय विभागाने १९६९ साली राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांना सादर केलेल्या अहवालात नमूद केलं होतं की, युद्धोत्तर काळात (१९४५ ते १९६९) अमेरिकेची लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा कमी दराने वाढली, पण १९४५ साली सुमारे ४५ दशलक्ष असलेली बंदुकांची संख्या मात्र दुपटीने वाढली. २०१८ पर्यंत हीच संख्या १९४५ च्या तुलनेत दहा पट झाली, तर लोकसंख्या फक्त अडीच पट वाढली होती.
आधुनिक बंदूक संस्कृतीमागे वर्णद्वेष
अमेरिकेत आजची बंदूक संस्कृती का निर्माण झाली, याचं एक उत्तर अमेरिकेच्या वर्णद्वेषी इतिहासात सापडतं. “अमेरिकन गन कल्चर…हे हिंसाचाराच्या संस्कृतीने कब्जा केलेल्या संविधानाची कहाणी आहे. यातली पहिली परंपरा म्हणजे गुलामगिरी…,” असं इतिहासकार डॉमिनिक एर्डोझेन यांनी वन नेशन अंडर गन (२०२४) मध्ये लिहिलं आहे. शेतजमिनींवर कृष्णवर्णीय गुलामांना वश ठेवण्यासाठी गोऱ्या मालकांना शस्त्रं आवश्यक होती. यादवी युद्धानंतर (१८६१–६५) दक्षिणेत गुलामगिरीची प्रथा संपुष्टात आली, पण कृष्णवर्णीय लोकांकडून सूड उगवला जाईल या भीतीमुळे गोऱ्यांमध्ये शस्त्रधारणेचं प्रमाण वाढलं आणि कू क्लक्स क्लॅनसारख्या संघटनांचा जन्म झाला.
शतकानुशतकं वाढत गेलेली शस्त्रांची भूक…
२० व्या शतकात अमेरिकेत शस्त्र बाळगण्याची प्रवृत्ती आणखी वेगाने वाढली. गुन्हेगारी, कायद्यांकडे होणारं दुर्लक्ष आणि ऐतिहासिक दृष्ट्या ‘इतर’ गटांच्या राजकीय सक्षमीकरणाबद्दलच्या भीतींनी ही मानसिकता अधिकच भडकवली. शीतयुद्धकाळातील स्थलांतर आणि कम्युनिझमविरोधी प्रचारामुळे ही प्रवृत्ती अजून घट्ट रूजली.
या वाढत्या मागणीला दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटानंतर उपलब्ध झालेल्या शस्त्रसाठ्याने चालना दिली. इतिहासकार अँड्र्यू सी. मॅकेविट यांनी गन कंट्री (२०२३) या पुस्तकात म्हटलं आहे की, “युरोपमधल्या दीर्घ युद्धांमधून तयार झालेली शस्त्रं, ही अनेक वर्षांच्या रक्तपाताचं फलित होती. ही शस्त्र दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकन बाजारात अगदी स्वस्तात भरभरून येऊ लागली.” लवकरच ‘गन कॅपिटॅलिस्टांनी’ याच पुरवठ्याचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर बंदुकांचा व्यापारी बाजार उभारला.
एक अमेरिकन ‘रोमॅन्स’
- आज अमेरिकेतील बंदुकधारणा हा फक्त व्यापार नाही, तर एक प्रकारचं सांस्कृतिक भान ठरतं आहे. नॅशनल रायफल असोसिएशन (NRA) सारख्या प्रभावी संघटनांनी या संस्कृतीत तेल ओतलं आहे. त्यामुळे शस्त्रांनी भरलेल्या अमेरिकेचे वास्तव जणू नैसर्गिक आणि अपरिहार्य असल्यासारखे वाटू लागले आहे. बंदुकांना आता त्यांच्या भौतिक स्वरूपापलीकडे जाऊन प्रतिकात्मक अर्थ प्राप्त झाला आहे.
- “मार्क्सवादी भाषेत याला ‘वस्तूपूजा’ (commodity fetishism) म्हणतात. यात त्या वस्तूची निर्मिती कशी झाली, तिच्याशी जोडलेले सामाजिक संबंध आणि संदर्भ हे सगळं मागे पडतात आणि त्या वस्तूला विशिष्ट प्रकारचं जादूई आकर्षक वलय प्राप्त होतं.”
- १९ व्या शतकातील गन कॅपिटॅलिस्टांना हे चांगलंच ठाऊक होतं की, बंदुका विकायच्या असतील तर बंदुकांच्या कथा विकाव्या लागतील. अशा कथा बंदुकांना सांस्कृतिक अर्थ देतात आणि त्या केवळ लोखंडाचा तुकडा न राहता एक प्रतीक ठरतात. इतिहासकार अँड्र्यू सी. मॅकेविट यांनी टाइम मॅगझिनमध्ये म्हटलं होतं की, “बंदुक विकणं म्हणजे बंदुकांबद्दल कथा विकणं आणि त्या शस्त्रांना सांस्कृतिक अर्थ देणं.”
इतर देश पुढे, अमेरिका मागे…
इतर देशांनी व्यवहार्य पावलं उचलून शस्त्रधारणा कमी केली आणि शस्त्रांमुळे होणारे मृत्यूही घटवले. १९८० आणि १९९० च्या दशकातील गोळीबारांच्या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाने शस्त्रांवर नियंत्रण आणलं. त्याचा परिणाम असा झाला की, १९९६ साली दर १ लाख लोकसंख्येमागे २.९ इतके मृत्यू होत होते, ते २०१८ मध्ये त्याची घट होऊन फक्त ०.८८ झाले (ऑस्ट्रेलियन गन सेफ्टी अलायन्सच्या आकडेवारीनुसार). अमेरिकेने मात्र अगदी उलट वाट धरली. शस्त्रांवर नियंत्रण आणण्याऐवजी नियम अधिकच सैल केले. २००८ मध्ये अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने वॉशिंग्टन डीसीतील हँडगनवरील बंदीच असंवैधानिक ठरवली आणि प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या सुरक्षेसाठी शस्त्र बाळगण्याचा हक्क आहे, असं स्पष्ट केलं (कोलंबिया विरुद्ध हेलर प्रकरण). या निर्णयानंतर शस्त्रधारणेवरील थोड्याफार मर्यादित कायद्यांविरोधातही मोठ्या प्रमाणावर कायदेशीर आव्हान दिली गेली.
जास्त बंदुका, जास्त मृत्यू
NRA सारख्या संघटनांचे नेते नेहमी म्हणतात की, “वाईट माणसाला बंदुकीसकट रोखायचं असेल तर चांगल्या माणसाकडेही बंदूक असली पाहिजे.” पण इतिहासकार डॉ. डॉमिनिक एर्डोझेन यांच्या मते खरी अडचण अशी आहे की चांगले लोकसुद्धा कधी तरी वाईट दिवस अनुभवतात. शिवाय शस्त्रधारणेवर विश्वास ठेवणाऱ्यांचा अति आत्मविश्वास आक्रमकतेला परवानगी देणारी मानसिकता तयार करतो. अमेरिकेत बंदुकीमुळे होणारे बहुतांश मृत्यू हे ‘चांगला माणूस विरुद्ध वाईट माणूस’ या सोप्या चौकटीत बसत नाहीत, हे आकडेवारीवरून स्पष्ट दिसतं.

डॉ. आर्थर केलरमन यांनी १९८०-९० च्या दशकात केलेल्या अभ्यासांत दाखवून दिलं की, बहुतेक खून हे मद्यधुंद अवस्थेत असताना किंवा मित्र किंवा पत्नीबरोबर झालेल्या भांडणांतून होतात. त्यांनी असंही ठाम सांगितलं की, घरात बंदूक ठेवणं हे खून होण्याचा धोका आणखी वाढवतं. केलरमन यांनी २००८ मध्ये म्हटलं होतं की, “लोकांना तेव्हा कळलं नव्हतं आणि आजही कळलेलं नाही. आपल्या जीवाला सगळ्यात मोठा धोका आपल्या घराची चावी ज्या माणसाच्या हातात आहे, त्याच्यापासूनच आहे.