आतापर्यंत तुम्ही कोणत्या ना कोणत्या आजारामुळे एकदा तरी इंजेक्शन घेतलेच असेल. तेव्हा तुमच्या लक्षात आले असेल की, डॉक्टर रुग्णाला कुठेही इंजेक्शन न देता, शरीरावरील निवडक जागीच ते देतात. परंतु, इंजेक्शन कुठे घ्यायचे ते निवडण्याचे स्वातंत्र्य रुग्णाला दिले जात नाही.काही वेळा डॉक्टर हातावर इंजेक्शन देतात आणि काही वेळा कंबरेवर; तर लहान बाळांना मांडीवर इंजेक्शन दिले जाते. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की, डॉक्टर इंजेक्शन देण्यासाठी फक्त हाताचा दंड, मांडी किंवा कंबर याच जागांची निवड का करतात? तसेच डॉक्टर कोणते इंजेक्शन कुठे द्यायचे हे कसे ठरवतात? याबाबतची सविस्तर उत्तरे सीनियर जनरल फिजिशियन डॉ. विदुला बेल्लुबी आणि डॉ. शरद कुलकर्णी यांनी लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना दिली आहेत.
कोणत इंजेक्शन कुठे द्यायचे कसे ठरते?
इंजेक्शन हातावर द्यायचे की कंबरेवर याची निवड रुग्णाला झालेल्या आजार वा रोगावरून नाही; तर इंजेक्शनमध्ये असलेल्या औषधावरून ठरते. तसेच इंजेक्शनचे काही प्रकार असतात; त्यानुसारही ते कसे द्यायचे ते ठरवले जाते. वैद्यकीय भाषेत इंजेक्शनच्या या प्रकारांमध्ये सामन्यात: इंट्राव्हेनस, इंट्रामस्क्युलर, सबक्युटेनियस व इंट्राडर्मल यांसारख्या इंजेक्शन्सचा समावेश होतो.
इंजेक्शनचे काही प्रकार खालीलप्रमाणे :
१) इंट्राव्हेन्स इंजेक्शन
रक्तवाहिनीत औषध थेट पोहोचावे यासाठी हे इंजेक्शन वापरले जाते. हे इंजेक्शन सामान्यत: हातावर दिले जाते. काही औषधे ही शरीरात पोहोचणे गरजेची असतात; ज्यामुळे त्याचा परिणाम जलद होतो. उदा. ब्रेथलेसनेस, अस्थमा यांसारख्या आजारांवर या प्रकारचे इंजेक्शन दिले जाते.
श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या रुग्णाच्या फुप्फुसापर्यंत लवकर औषध पोहोचावे यासाठी त्याला इंट्राव्हेन्स इंजेक्शन दिले जाते. त्यातही दोन प्रकार आहेत. त्यातील एक कॉन्सन्ट्रेटेड इंजेक्शन असते; जे शिरेमधून दिले जाते. दुसऱ्या प्रकारातील काही इंजेक्शन्स अशी असतात; जी डायल्युट करून सलाइनद्वारे दिली जातात. ही सलाईन अनेकदा अर्धा तास किंवा काही वेळा २४ तास चालू राहतात. पण, अशी इंजेक्शन्स रुग्णाचा आजार आणि शारीरिक क्षमता पाहून मगच दिली जातात.आंतररुग्ण विभागात याचा वापर होतो.
२) इंट्रामस्क्युलर इंजेक्शन
काही इंजेक्शने अशी असतात की, जी शरीरात खोलवर द्यावी लागतात; ज्याला डीप इंट्रामस्क्युरल इंजेक्शन असे म्हणतात. उदा. व्हिटॅमिन्स, ऑईल बेस इंजेक्शन. अशा स्वरूपाची इंजेक्शने कंबरेवर दिली जातात. कोणते इंजेक्शन शरीरावर नेमके कुठे द्यायचे ते ठरलेले असते.
३) सबक्युटेनियस इंजेक्शन
त्वचेच्या लगेच खाली दिल्या जाणाऱ्या इंजेक्शन्सना सबक्युटेनियस इंजेक्शन असे म्हटले जाते. अशा प्रकारचे इंजेक्शन हातावर, मांडीच्या वरच्या भागावर किंवा ओटीपोटात दिली जातात. उदा. इन्सुलिन व रक्त पातळ करणारी औषधे, लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पेंटाव्हॅक, एमएमआर लसी.
…म्हणून इंजेक्शन देण्यासाठी शरीरावरील ‘या’ तीन जागा केल्या निश्चित
रुग्णाला लवकर आराम मिळण्यासाठी इंजेक्शनमधील औषध लवकर रक्तप्रवाहात मिसळणे आवश्यक असते. शरीराच्या ज्या भागात रक्तवाहिन्यांचे खूप मोठे जाळे नसते, तसेच ज्या जागी इंजेक्शन दिल्यानंतर त्यातील औषधी द्रव लवकरात लवकर रक्तप्रवाहात मिसळू शकेल अशा शरीरावरील तीन जागा वैद्यकीय संशोधनानुसार निश्चित करण्यात आल्या आहेत. दंड (हात), कंबर व मांडी अशा या निश्चित केलेल्या तीन जागा आहेत. ज्याठिकाणी मोठ्या रक्तवाहिन्या किंवा नसांना इजा न होता इंजेक्शन देता येते. इंजेक्शन देताना जगभरातील बहुतांशी डॉक्टर हाच नियम पाळतात. परंतु, काही गंभीर आजारांमध्ये इंजेक्शन देण्यासाठी काही वेळा वेगळ्या नियमांचाही अवलंब केला जातो.
पण, लहान मुलांचे दंड आणि कंबरेवरील स्नायू चांगल्या प्रकारे विकसित झालेले नसतात. त्या कारणाने त्यांना मांडीवर इंजेक्शन दिले जाते. अंगकाठीने बारीक असणाऱ्या रुग्णांनाही काही वेळा लहान मुलांप्रमाणेत मांडीवर इंजेक्शन दिले जाते.
पण, विशिष्ट कारणासाठी दिली जाणारी लस ही नेहमी दंडावरच दिली जाते. उदा. रेबिजची (श्वानदंशावर दिली जाणारी) लस. पूर्वी यासाठी पोटावर १४ इंजेक्शन्स दिली जायची; परंतु त्याबाबत अधिक वैद्यकीय संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी रेबिजची लस तयार केली. आता रेबिज आजारावर या लसीचे पाच डोस वेगवेगळ्या दंडावर आलटून-पालटून दिले जातात.
इंजेक्शन दिल्यानंतर ती जागा का सुजते?
इंजेक्शन योग्य प्रकारे दिले गेल्यास इंजेक्शन जिथे दिले गेले, ती जागा सुजत नाही. उदा. इन्सुलिन. अशा प्रकारे इंजेक्शन दिल्यानंतर त्वचेची ती जागा सुजते; पण काही वेळात ती होती तशी पुन्हा दिसते.
इंजेक्शन दिल्यानंतर शरीरावरची ती जागा सुजण्याची समस्या पूर्वीप्रमाणे आता जाणवत नाही. पूर्वी सुया इतक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे वापरलेल्याच सुया उकळवून पुन्हा वापरल्या जायच्या. अशा परिस्थितीत सुया योग्य प्रकारे उकळून निर्जंतुक न केल्यास इन्फेक्शन व्हायचे. त्यामुळे इंजेक्शन दिलेली जागा सुजायची किंवा त्रास व्हायचा. पण, ही समस्या आता फार नगण्य आहे. परंतु, काही रुग्णांचे स्नायू अगदीच नाजूक असतील, तर त्यांना मात्र अशा प्रकारचा त्रास जाणवू शकतो.
इंजेक्शन दिल्यानंतर ताप किंवा इतर लक्षणे दिसण्यामागची कारणे काय?
इंजेक्शनमधील औषध शरीरात गेल्यानंतर त्यावर आपले शरीर प्रतिक्रिया व्यक्त करीत असते. त्यामुळे ताप येणे आणि इतर लक्षणे दिसतात, असे डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
काही ठरावीक लसी दिल्यानंतर ताप येणे आणि इतर लक्षणे दिसतात. कारण- लस ही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दिली जाते. अशा वेळी लसीमधील औषधे शरीराशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात; ज्यामुळे ताप आणि इतर लक्षणे दिसून येतात. पण, सामान्यत: इंजेक्शन्समुळे त्रास होत नाही.
काही वेळा इंजेक्शन घेतल्यानंतर ताप आणि इतर दुष्परिणाम कमी करण्यासाठी डॉक्टरांकडून काही औषधांची शिफारस केली जाते; जी घेतल्याने इंजेक्शननंतर सहसा हात दुखणे, सुजणे आदी त्रासांपासून आराम मिळतो.
इंजेक्शन दिल्यानंतर बर्फाचा शेक घेण्यास का सांगितले जाते?
हार्मोन्स किंवा लस घेतल्यानंतर ती जागा गरम पाण्याने शेकायची नसते; पण काही इंजेक्शन्सनंतर थंड पाण्याने किंवा बर्फाने शेकण्याचा सल्ला दिला जातो. कारण- त्यामुळे वेदना कमी होतात. स्नायूंमधील रक्ताभिसरण व्यवस्थित व्हावे, तसेच रक्त साकळण्याची समस्या उदभवू नये यासाठीही बर्फाने शेकण्याचा सल्ला दिला जातो. पण ही स्थिती गंभीर नसून, ती काही वेळाने वा काही दिवसांनी बरी होत असल्याने त्याची काळजी न करता, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इंजेक्शन घ्यावे.
इंजेक्शनसंदर्भातील वरील माहिती डॉक्टरांच्या जनरल प्रॅक्टिसवर आधारित आहे. त्यामुळे कॅन्सरमधील केमोथेरपी ट्रीटमेंटमधील इंजेक्शनचे प्रकार आणि त्या देण्याच्या पद्धतींचा उल्लेख या माहितीत केला गेलेला नाही. तसेच टीबी, मणक्याचे आजार आणि इतर गंभीर आजारांमध्येही इंजेक्शन देण्यासंदर्भात काही वेगळे प्रकार आणि पद्धती वापरल्या जातात; ज्या यात सांगण्यात आलेल्या नाहीत.