महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात गुणतालिकेत अगदी शेवटच्या स्थानावर राहिलेल्या गुजरात जायंट संघाची यंदाच्या हंगामाची सुरुवातही खराब झाली आहे. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात गुजरात जायंटला पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने तर दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंर्स बंगळुरूने गुजरात जायंटचा पराभव केला.

गुजरात जायंटसाठी दिलासादायक बाब म्हणजे, त्यांना अंतिम अकरात पाच विदेशी खेळाडू खेळवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सुरुवात खराब झाली असली तरी गुजरात जायंट पुनराआगमन करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या हंगामात गुजरात जायंट हा एकमेव संघ आहे, ज्याला अंतिम अकरामध्ये पाच विदेशी खेळाडू खेळवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, महिला प्रीमियर लीगमधील बाकी संघाना अंतिम अकरात चार विदेशी खेळाडू खेळवण्याची परवानगी असताना एकट्या गुजरात जायंट्सला पाच विदेशी खेळाडू खेळवण्याची परवानगी का देण्यात आली? यामागे नेमकं कारण काय? आणि विदेशी खेळाडू खेळवण्यासंदर्भातील नियम काय सांगतो? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा – Shreevats Goswami : क्रिकेट जगतात खळबळ! बंगालच्या माजी क्रिकेटपटूने केला मॅच फिक्सिंगचा आरोप, वाचा नेमकं प्रकरण?

विदेशी खेळाडू खेळवण्यासंदर्भातील नियम काय सांगतो?

महिला प्रीमियर लीगच्या नियमानुसार, प्रत्येक संघाला त्यांच्या संघात ६ विदेशी खेळाडूंचा समावेश करण्याची परवानगी असते. तर त्यापैकी केवळ चार खेळाडूंना अंतिम अकरामध्ये खेळवण्याची परवानगी दिली जाते. मात्र, या नियमाला एक अपवाद आहे, तो म्हणजे, जर चार विदेशी खेळाडूंपैकी एक खेळाडू जर असोसिएट देशाचा म्हणजे संलग्न देशाचा असेल, तर त्या संघाला अंतिम अकरात पाच विदेशी खेळाडू खेळवण्याची परवानगी असते.

टेस्ट खेळणाऱ्या प्रमुख देशांच्या बरोबरीने आयसीसी संघांची असोसिएट आणि अॅफिलिएट सदस्य अशी प्रतवारी करतं. महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज हे प्रमुख संघ आहेत. कोणत्याही लीगमध्ये ज्या देशात लीग सुरू आहे तिथल्या खेळाडूंना अधिकाअधिक संधी मिळावी असा प्रयत्न असतो. म्हणूनच अंतिम अकरात विदेशी खेळाडूंची संख्या मर्यादित असते.

प्रमुख देशाच्या खेळाडूंव्यतिरिक्त असोसिएट आणि अॅफिलिएट संघांचे खेळाडूही असतात. त्यांनाही त्यांचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ मिळणं गरजेचं असतं. चार विदेशी खेळाडूंच्या नियमाची कठोरपणे अंमलबजावणी केल्यास असोसिएट आणि अॅफिलिएट संघातील खेळाडूंवर अन्याय होऊ शकतो. म्हणूनच वूमन्स प्रीमिअर लीगच्या नियमात अशी तरतूद करण्यात आली आहे.

असोसिएट किंवा अॅफिलिएट देशाच्या खेळाडूंची विदेशी खेळाडू म्हणून नोंद होत असली तरी त्यांना मिळणाऱ्या संधी मर्यादित असतात. यामुळे नियम थोडा शिथिल करुन गुजरात जायंट्स संघाला चारऐवजी पाच विदेशी खेळाडू खेळवण्याची मुभा देण्यात आली आहे.

हेही वाचा – Team India : ‘हे सर्वांना लागू होत नसेल, तर…’, इरफान पठाणकडून बीसीसीआयच्या केंद्रीय करारावर प्रश्न उपस्थित

गुजरात जायंट्समधील संलग्न देशाची खेळाडू कोण?

यंदाच्या महिला प्रीमियर लीगमध्ये सहा संघांपैकी केवळ एकट्या गुजरात जायंट्स संघातील कॅथरीन ब्राईस स्कॉटलंडची आहे. त्यामुळे गुजरात जायंट्स संघाने या नियमाचा वापर करत सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पाच विदेशी खेळाडू मैदानात उतरवले.

यापूर्वी २०२३ च्या हंगामात युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेची तारा नॉरिस ही संलग्न देशाची ऐकमेव खेळाडू होती. ती दिल्ली कॅपिटल्स संघात होती. महिला प्रीमियर लीगच्या इतिहास एका सामन्यात पाच बळी घेणाऱ्या तारा नॉरिसला दिल्लीच्या संघाने तारा नॉरिसला ताफ्यात कायम राखलं. विशेष म्हणजे या नियमाचा फायदा घेत दिल्लीने पहिल्या हंगामात बहुतेक सामान्यात पाच विदेश खेळाडू खेळवले. या हंगामात दिल्लीने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती.