Causes of Heart attack in women हृदयविकाराच्या रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हृदयविकाराचा झटका येण्याची (हार्ट अटॅक) प्रकरणे मोठ्या संख्येने नोंदवण्यात आली आहेत. पूर्वी पुरुषांच्या तुलनेत महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण कमी होते, मात्र आता महिलांमध्येही वाढ नोंदवण्यात आली आहे. अनेक जबाबदाऱ्या आणि कामाचा ताण असल्यामुळे महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, असे करणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते, असे आरोग्यतज्ज्ञांचे सांगणे आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे ओळखणे कठीण आहे. मात्र, ही लक्षणे कशी ओळखायची? महिलांमध्ये का वाढत आहे हृदयरोगाचे प्रमाण? आपल्या दैनंदिन आयुष्यातील कोणत्या सवयी ठरतात कारणीभूत? या एकूण विषयासंदर्भात सविस्तर समजून घेऊयात…
हार्ट अटॅकशी संबंधित महिलेला आलेला अनुभव
५८ वर्षांच्या सविता राणा यांनी त्यांना आलेल्या अनुभवाविषयी सांगितले आहे. काही महिन्यांपूर्वी सविता राणा यांना पहाटे २ वाजता घाम फुटला, अस्वस्थ आणि चिंताग्रस्त वाटू लागले. त्यांचे हृदय जोरजोरात धडधडत होते; छातीत दुखत होते आणि त्यांना भोवळ येत होती. त्या सांगतात, “मला मळमळ होत होती, अतिसाराची लक्षणे दिसत होती. मला वाटले की हा ‘Anxiety attack’ असेल, परंतु, माझ्या हृदयात काहीतरी बिघाड झाला आहे हे दर्शवणारा तो पहिला संकेत होता.”

सविता यांची मुलगी स्वाती एक मानसशास्त्रज्ञ आहे, तिने नंतर त्यांचा रक्तदाब तपासला, जो सामान्य होता. त्यांच्या मुलीने सांगितले, “आई माझ्या आजारी वडिलांची काळजी घेत होती, ती खूप तणावाखाली होती, म्हणून मला वाटले की तिला ‘Anxiety attack’ आला असावा. माझ्या वडिलांना ब्रेन स्ट्रोक आणि किडनीचा आजार होता. तिच्या लक्षणांकडे आम्ही दुर्लक्ष केले.” तपासण्यांमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे उघड झाले. त्यांचे हृदय फक्त ३० टक्के क्षमतेवर काम करत होते. डॉक्टरांनी लगेच त्यांची अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी केली. (रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आहे का हे तपासण्याची एक इमेजिंग प्रक्रिया, त्यानंतर रक्तप्रवाह पूर्ववत करण्यासाठी धमनी रुंद करण्यासाठी स्टेन्ट किंवा जाळी बसवणे). या उपचारादरम्यान त्या आयसीयूमध्ये असताना त्यांच्या कुटुंबाला कळले की त्यांना मधुमेहदेखील आहे. त्यांनी यापूर्वी कधीही स्वतःची तपासणी करून घेतली नव्हती.
महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे काय?
हृदयविकाराचा झटका महिलांमध्ये सामान्य नाही असे बहुतेक लोकांना वाटते. परंतु, आता हे प्रमाण महिलांमध्ये वाढत आहे. अगदी ४० वर्षांखालील रजोनिवृत्तीपूर्वीच्या (Pre-menopausal) महिलांमध्येही हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे. दिल्लीच्या शालीमार बाग येथील मॅक्स हॉस्पिटलमधील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी विभागाचे संचालक आणि प्रमुख डॉ. नवीन भामरी म्हणतात, “मी दर महिन्याला ४० वर्षांखालील पाच आणि ५० वर्षांखालील सुमारे १५ महिलांची अँजिओप्लास्टी करतो.” ते म्हणतात की, या वाढत्या प्रमाणाला स्थूलपणा, उच्च रक्तदाब (Hypertension) आणि मधुमेह यांसारखे घटक तर कारणीभूत आहेतच, मात्र तणावदेखील कारणीभूत आहे.”
“काही लोक खूप व्यायाम करत आहेत, तर काही लोक अजिबात व्यायाम करत नाहीत. त्यात लोकांचा स्क्रीन टाइम वाढला आहे, त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. झोप न लागणे हादेखील एक धोकादायक घटक आहे,” असे ते म्हणतात. सर्वात मोठी समस्या म्हणजे बहुतेक महिलांना हृदयविकाराची लक्षणे दिसली तरी त्या अपचन (Indigestion) म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. हा अनेक महिलांच्या सवयीचा भाग झाला आहे. “पोट आणि छातीत कोणतीही अस्वस्थता जाणवल्यास हॉस्पिटलमध्ये जा,” असे नवीन भामरी पुढे सांगतात.
रजोनिवृत्तीनंतर (Menopause) इस्ट्रोजेनच्या पातळीत होणारी घट रक्तवाहिन्यांमध्ये बदल करते आणि हृदयविकाराचा धोका वाढवते. याव्यतिरिक्त महिलांमध्ये असे हृदयविकाराचे झटके येण्याची शक्यता पुरुषांपेक्षा जास्त असते. अशा परिस्थितीत मुख्य रक्तवाहिन्यांमध्ये मोठा अडथळा नसतो, परंतु लहान कोरोनरी धमन्यांमध्ये (Smaller coronary arteries) अडथळा येतो.
उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा संबंध काय?
पीजीआय चंदीगडच्या कार्डिओलॉजी विभागातील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट (Interventional Cardiologist) असलेले प्रोफेसर डॉ. राजेश विजयवर्गीया यांची हिमाचल प्रदेशमधील ४८ वर्षांची एक रुग्ण आहे. जून २०२२ मध्ये सोनालीला तीव्र डोकेदुखी, उलट्या आणि भोवळ येणे अशी लक्षणे दिसू लागली. तिला एन्युरिझम असल्याचे निदान झाले. ही अशी स्थिती आहे, जिथे मेंदूतील रक्तवाहिन्यांपैकी एका रक्तवाहिनीतील कमकुवत भाग फुटतो, ज्यामुळे रक्तस्त्राव होतो. तिच्यावर आपत्कालीन मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि दोन आठवड्यांनंतर ती घरी गेली. “माझा रक्तदाब जास्त होता, वजन थोडे जास्त होते आणि मी तणाव आणि जास्त विचारात होते. माझ्या जुळ्या मुलींची, घरकामाची आणि ब्युटी सलूनमधील माझ्या कामामुळे मी व्यस्त असल्याने माझा व्यायामाचा कोणताही नियमित क्रम नव्हता,” असे सोनाली सांगते.
पण, बरी झाल्यानंतर एका वर्षाच्या आतच ऑक्टोबर २०२३ मध्ये पतीबरोबर किराणा सामान खरेदी करताना तिला छातीत आणि डाव्या खांद्यावर तीव्र वेदना जाणवली. तिने त्याकडे स्नायूंचे दुखणे म्हणून दुर्लक्ष केले, पण घरी परतल्यावर तिला भोवळ आली. तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. तिला काही औषधे, एक ब्लड थिनर देऊन घरी सोडण्यात आले. त्यानंतरच्या दिवसांमध्ये सोनालीला थकवा जाणवू लागला, चालताना धाप लागत होती आणि एके दिवशी वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकताना तिला पुन्हा एकदा छातीत आणि डाव्या खांद्यावर असह्य वेदना झाली, तिला नीट श्वास घेता येत नव्हता.
“मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि अँजिओग्राफीमध्ये दिसले की हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांपैकी एका धमनीत ९५ टक्के अडथळा आहे. त्यानंतर आम्ही पीजीआयमध्ये आलो, जिथे तो रक्तवाहिन्यांमध्ये स्टेन्ट बसवण्यात आला. या प्रक्रियेनंतर आणि व्यायाम सुरू केल्यापासून मला छातीत दुखणे किंवा धाप लागणे जाणवले नाही,” असे ती सांगते. “आता योग, प्राणायाम आणि दररोज चालणे हा माझ्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. निर्विकार राहण्यासाठी मी प्रार्थना आणि ध्यान करते. आमचे जेवण घरी ताजे तयार केले जाते आणि आम्ही आमच्या आहारात प्रक्रिया केलेले अन्न वगळले आहे,” असे ती पुढे सांगते.
‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास वाढतो धोका
सोनालीची कहाणी एका मोठ्या चिंतेकडे लक्ष वेधते. “१५ ते ४९ वयोगटातील दर पाच भारतीय महिलांपैकी एका महिलेच्या उच्च रक्तदाबावर उपचार करण्यात आलेला नाही. जगभरात महिलांमध्ये स्तन कर्करोगापेक्षाही (Breast cancer) हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग हे मृत्यूचे मुख्य कारण आहेत. तरीही महिलांमधील लक्षणांचे अनेकदा चुकीचे निदान केले जाते. मळमळ, थकवा आणि घाम येणे हे बहुतेकदा जठरासंबंधी समस्यांची लक्षणे मानली जातात. हार्मोनल बदल, नैराश्य आणि अनियंत्रित कॉस्मेटिक हार्मोन उपचार हृदयाचा धोका वाढवू शकतात. त्यासाठी लवकर निदान आणि जागरूकता अत्यंत आवश्यक आहे,” असे डॉ. विजयवर्गीया म्हणतात.
डॉ. विजयवर्गीया यांनी विभागात केलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, ४० वर्षांखालील रजोनिवृत्तीपूर्व (pre-menopausal) तरुण महिलांनादेखील कोरोनरी धमनी रोग असल्याचे निदान होत आहे. डॉक्टर दर महिन्याला कार्डिओलॉजी क्लिनिकमध्ये अशा पाच तरुण महिला रुग्णांची नोंद करतात. त्यात मधुमेह, उच्च रक्तदाब आणि स्थूलपणा यांसारखे धोकादायक घटक भूमिका बजावतात. त्यासाठी ब्लड बायोमार्करसह (Blood biomarkers) तपासण्या करून लवकर निदान होणे महत्त्वाचे आहे असे ते सांगतात.
“तणाव, झोपेची कमतरता, धूम्रपान, अनियंत्रित उच्च रक्तदाब आणि निदान न झालेला मधुमेह यांसारखे जीवनशैली घटक, तरुण आणि वरवर पाहता निरोगी व्यक्तींमध्येही हृदयरोगाचे प्रमाण वाढवतात. प्रक्रिया केलेले अन्न, रात्री उशिरापर्यंत काम, जास्त स्क्रीन टाइम आणि अनियंत्रित व्यायाम पद्धती हृदयावर संचयी ताण निर्माण करू शकतात. बैठी जीवनशैली आणि दीर्घकाळ मानसिक ताण हृदयाची लय विस्कळीत करतात आणि सूज वाढवतात, ज्यामुळे हृदय कमकुवत होते आणि अचानक हृदयविकाराच्या मृत्यूचा धोका वाढतो,” असे डॉ. विजयवर्गीया सांगतात.
डॉ. विजयवर्गीया पुढे सांगतात की, ” हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी शरीरात अनेकदा भोवळ येण्यासारखी लक्षणे जाणवतात. विश्रांती घेताना किंवा काम करताना अचानक घाम येणे, छातीत अस्वस्थता किंवा दाटणे आणि हृदय धडधडणे हीदेखील याची लक्षणे असू शकतात. हा त्रास अनेकदा तणाव किंवा कामामुळे होत असल्याचे मानून याकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु, याकडे दुर्लक्ष करू नये,” असे डॉ. विजयवर्गीया म्हणतात. त्यांची रुग्ण सोनालीचा ब्रेन एन्युरिझमदेखील तिने रक्तदाबावर उपचार न घेतल्याने आणि तणावामुळे उद्भवल्याचे ते सांगतात. अशा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत जर वेळेवर उपचार मिळाले नाहीत, तर रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.