पाकिस्तानचे नौदल व चीनची पीपल्स लिपरेशन आर्मीची (PLAN) नौसेना एकत्रितपणे उत्तर अरबी समुद्रात नौदल कसरती करीत आहेत. दोन्ही देशांच्या नौदलाने दिलेल्या माहितीनुसार ‘सी गार्डियन-३’ (Sea Guardian-3) या उपक्रमांतर्गत या कसरती आणि सराव शनिवारी (११ नोव्हेंबर) चालू झाला असून, शुक्रवारपर्यंत (१७ नोव्हेंबर) सराव व कसरती सुरू राहतील, असे चिनी नौदलातर्फे सांगण्यात आले आहे. दोन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी घडल्यानंतर पाकिस्तान आणि चीनच्या सागरी कसरती होत आहेत. एक म्हणजे, आठवडाभरापूर्वीच भारत आणि अमेरिका यांच्यात २ + २ (टू प्लस टू) बैठक झाली. या बैठकीत इंडो-पॅसिफिकमधील सागरी सुरक्षेवर विस्तृत चर्चा झाली. ‘दोन अधिक दोन’ बैठकीत दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री आणि संरक्षणमंत्री स्वतः उपस्थित होते. तसेच अगदी काही दिवसांपूर्वी रशिया आणि म्यानमार यांच्यादरम्यान अंदमान समुद्रात एकत्रित नौदल कसरती पार पडल्या.

चीन आणि पाकिस्तानच्या नौदल कसरतीदरम्यान दोन्ही देश पहिल्यांदाच संयुक्त सागरी गस्त घालणार आहेत. पीएलए नौदलाचे कमांडर आणि या संयुक्त सरावाचे संचालक लियांग यांग यांनी चिनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रकारच्या हवामानात सामरिक समन्वय व धोरणात्मक सहकार्य करणे आणि पाकिस्तानसह संरक्षण सहकार्य वाढविणे, असे या संयुक्त कसरती आणि सरावाचे उद्दिष्ट आहे.

israeli strikes on rafah kill 18 as gaza death toll tops 34000
इस्रायलच्या राफावरील हल्ल्यात १८  ठार
Loksatta explained Arab nations split after failed Iranian attack on Israel
जॉर्डनने इराणी ड्रोन, क्षेपणास्त्रे का पाडली? इस्रायलवरील फसलेल्या इराणी हल्ल्यानंतर अरब राष्ट्रांमध्ये फूट? 
Conflict between Iran and Israel Avoid traveling between both countries India advice to citizens
इराण- इस्रायलमध्ये तणाव: दोन्ही देशांतील प्रवास टाळा; भारताचा नागरिकांना सल्ला
iran attack israel
जग पुन्हा युद्धाच्या छायेत; इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करणार, भारताने नागरिकांना दिला इशारा…

हे वाचा >> विश्लेषण : चिनी, पाकिस्तानी नौदलांच्या वाढत्या शक्तीचे आव्हान किती गंभीर?

भारताच्या दोन शेजारी राष्ट्रांनी अरबी समुद्रात अशा प्रकारचा सराव केल्यामुळे भारतावर त्याचे काय परिणाम होतील? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

‘सी गार्डियन-३’ सराव काय आहे?

चीन आणि पाकिस्तान यांनी एकत्र येऊन अशा प्रकारचा नौदल सराव करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ‘सी गार्डियन’ उपक्रमांतर्गत २०२० साली पहिल्यांदा उत्तर अरबी समुद्र आणि २०२२ साली शांघाय येथील सागरी किनाऱ्यावर दुसऱ्यांदा अशा प्रकारचा सराव आणि कसरती करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्ष युद्धसराव, नाविक हालचाली, व्हीबीएसएस (Visit, Board, Search and Seizure), हेलिकॉप्टर एकमेकांच्या युद्धनौकांवर उतरविणे, शोधमोहीम व बचावकार्य करणे, पाणबुडीविरोधी संयुक्त कारवाई व मुख्य गन शूटिंग, सामरिक कौशल्यांची देवाण-घेवाण आणि परस्पर नौदलांना भेटी अशा प्रकारच्या कसरती या उपक्रमांतर्गत केल्या जातात.

चिनी लष्कराचे जाणकार वेई डोंगशू यांनी सांगितले की, चीन आणि पाकिस्तान यांची समान ध्येये आहेत. हिंदी महासागरातील ऊर्जा आणि सामानांच्या वाहतुकीला असलेला धोका दूर करणे, त्यावरील दहशतवाद आणि इतर जोखीम दूर करण्यासाठी सामरिकदृष्ट्या दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करीत आहेत. आणखी एका विश्लेषकाने चीनच्या द ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, चीन-पाकिस्तानच्या इकॉनॉमिक कॉरिडोरचे रक्षण करणे आणि हिंदी महासागरात शांतता व स्थिरता प्रदान करण्यासाठी हा संयुक्त सराव करण्यात येत आहे.

पाकिस्तानचे नौदल अधिकारी असीम सोहेल मलिक यांनी सांगितले की, पाकिस्तान आणि चीनमध्ये नेहमीच सामरिकदृष्ट्या जवळचे व चांगले संबंध राहिले आहेत. दोन्ही देशांतील दशकांपासून चालत आलेली मैत्री या सागरी सरावामुळे आणखी बळकट होण्यास मदत होईल. तसेच आगामी काळात महासागरात निर्माण होणाऱ्या अडीअडचणी लक्षात घेता, भविष्यातील सागरी सहकार्याचा नवा अध्याय सुरू करण्यासाठीही हे सराव खूप महत्त्वाचे ठरणार आहेत.

हे वाचा >> विश्लेषण : दक्षिण चीन समुद्राकडे लक्ष

नौदल सरावासाठी चीनकडून मोठा लवाजमा

कराची येथे चालेल्या ‘सी गार्डियन-३’ सरावासाठी चीनकडून एक विनाशिका, दोन सुसज्ज युद्धनौका, हल्ला करण्यास समर्थ असलेली पाणबुडी आणि पाणबुडी सहकार्य जहाज तैनात करण्यात आले आहे. चीनने २०२० साली झिबो (Zibo) ही विनाशिका नौदलात कार्यान्वित केली होती. या विनाशिकेत सुधारणा करून, ‘०५२डी’ हे नवे जहाज तयार करण्यात आले आहे. जगातील सर्वांत मोठी व शत्रूची जहाजे, तसेच हवाई वाहने निकामी करणारी सक्षम विनाशिका म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. या विनाशिकेद्वारे शत्रूची जहाजे, विमाने व पाण्याखालील पाणबुड्यांनाही लक्ष्य करता येते.

याशिवाय चीनने जिंग्झाउ व लिनी (Jingzhou and Linyi) या दोन युद्धनौका (frigate) सुद्धा या ठिकाणी सरावासाठी तैनात केल्या आहेत. दोन्ही युद्धनौका अत्याधुनिक शस्त्रे आणि सेन्सर तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. सर्वमावेशक पुरवठा करणारे चीनचे क्विंदाओहू (Qiandaohu) जहाजदेखील कराचीच्या किनाऱ्यावर उभे आहे. तसेच डिझेल-इलेक्ट्रिकवर चालणारी टाईप-०३९ ही पाणबुडीही या ठिकाणी सरावासाठी उपलब्ध आहे.

पाकिस्तानकडून नऊ जहाजे तैनात करण्यात आली आहेत; ज्यामध्ये ‘पीएनएस शाहजहान’ व ‘सैफ’ यांचा समावेश आहे. तसेच नौसेनेची तीन हेलिकॉप्टर्स, चार लढाऊ जेट विमाने, सागरी टेहळणी करणारे व पाणबुडीला लक्ष्य करू शकणारे एक विमान आणि डझनभर इतर बोटी या सरावात पाकिस्तानतर्फे सामील झालेल्या आहेत, अशी माहिती चीनच्या ग्लोबल टाइम्स दैनिकाने दिली.

भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबी काय?

चीनने अरबी समुद्रात युद्धनौका आणि पाणपुड्या तैनात करणे भारतासाठी काळजी करणारी बाब आहे. काही वर्षांपासून चीनने हिंदी महासागरात हात-पाय पसरायला सुरुवात केलेली दिसते. याच महिन्यात चीनचे संशोधन करणारे जहाज ‘शी यान ६’ कोलंबोच्या किनाऱ्याजवळ थांबलेय. याआधी चीनच्या जहाजांनी बंगालच्या उपसागरातून तमिळनाडूचा सागरी किनारा आणि अंदमान व निकोबार बेटाजवळून प्रवास केला. एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, २०१३ पासून चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी नौसेनेच्या (PLAN) जहाजांची भारतीय महासागरात प्रवास करण्याची ही आठवी वेळ आहे.

पाकिस्तानच्या कराचीमधील बंदरावर चीनने आपली पाणबुडी तैनात केल्यामुळे दूरवरील समुद्रकिनाऱ्यावर स्वतःची नौदल शक्ती अजमावण्याची क्षमता चीनने दाखवून दिली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हिंदी महासागरात पाणबुडीचे संचालन करण्यासाठी चीन बंगालच्या उपसागरापासून ते हिंदी महासागरापर्यंत पाण्याच्या खालच्या परिस्थितीचा अंदाज (मॅपिंग) घेत आहे.

आणखी वाचा >> विश्लेषण : भारतीय नौदलासाठी Project 17A प्रकल्पाचे काय महत्व आहे?

भारतीय नौसेनेचे व्हाइस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी सांगितले की, हिंदी महासागरात चिनी नौदलाच्या हालचालींवर आमचे बारीक लक्ष आहे. हिंदी महासागरात चीनचे संशोधक जहाज, हेरगिरी करणारे जहाज, उपग्रह ट्रॅकिंग जहाज व युद्धनौका कुठून कुठे प्रवास करतात याचा प्रत्येक तासाचा अहवाल आमच्याकडे आहे.

पाकिस्तान आणि चीन यांची वाढणारी सामरिक जवळीकही भारतासाठी काळजीची बाब ठरू शकते. पाकिस्तानी नौदलाला अद्ययावत करून, त्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी चीन सातत्याने मदत करीत आहे. २०२८ पर्यंत युआन क्लास टाप ०३९/०४१ डिझेल पाणबुडी तयार करण्यासाठी पाकिस्तानने २०१६ साली करार केला आहे. त्याशिवाय पाकिस्ताननेही त्यांच्या नौदलाची क्षमता वाढविण्यावर भर दिला आहे. चीनच्या टाईप ०५३एच३ या जहाजाच्या धर्तीवर पाकिस्तानने झुल्पिकार क्लास ही युद्धनौका तयार केली असून, ती कार्यान्वितही केली आहे. तसेच शांघाय येथे तयार करण्यात आलेली तुघरील ही युद्धनौकाही पाकिस्तानने कार्यान्वित केली आहे.

जाणकारांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानच्या नौदलाचे आधुनिकीकरण करण्याच्या बहाण्याने चीन हिंदी आणि अरबी महासागरात आपली उपस्थिती वाढवीत आहे. भारतीय उपखंडातील महासागरातील परिस्थिती स्वतःच्या नियंत्रणात आणण्याचा चीनचा प्रयत्न आहे. तसेच पाकिस्तानच्या नौदलाचे आधुनिकीकरण झाल्यानंतर ते भारताच्या नौदलाशी स्पर्धा करण्याइतके बळकट होईल, असेही जाणकारांचे मत असल्याचे फर्स्टपोस्ट संकेतस्थळाने त्यांच्या लेखात नमूद केले आहे.