११ सप्टेंबरला सकाळी Mazagon Dock Shipbuilders Ltd (MDL) – माझगाव गोदीमध्ये तारागिरी या ( Taragiri) या युद्धनौकेचे जलावतरण करण्यात आले, म्हणजेच युद्धनौकेच्या बांधणी प्रक्रियेत या युद्धनौकेने पहिल्यांदा पाण्याला स्पर्श केला. आता यापुढील काळात या युद्धनौकांवर विविध उपकरणे, श्स्त्रास्त्रे बसवली जातील, नौसैनिकांसाठी आवश्यक सुविधा उभारल्या जातील, त्यानंतर या युद्धनौकेच्या चाचण्यांना सुरुवात होईल आणि मग ही युद्धनौका ऑगस्ट २०२५ मध्ये नौदलात दाखल होण्याचे नियोजन आहे.
Project 17A प्रकल्प काय आहे?
Project 17A प्रकल्पातंर्गत फ्रिगेट (Frigate) प्रकारातील एकुण सात युद्धनौका या २०१९ पासून भारतीय नौदलासाठी बांधल्या जात आहेत. या प्रकल्पाचा एकुण खर्च २५ हजार ७०० कोटी एवढा आहे. या युद्धनौकांना नीलगिरी ( Nilgiri Class Warship ) या नावाने ओळखले जाते. तारागिरी ही या वर्गातील पाचवी युद्धनौका आहे. सातपैकी चार युद्धनौका या माझगाव गोदीमध्ये तर तीन कोलकता इथल्या Garden Reach Shipbuilders & Engineers या गोदीत बांधल्या जात आहेत.
या आधी भारताने फ्रिगेट प्रकारातील शिवलिक वर्गातील तीन युद्धनौका स्वबळावर बांधल्या होत्या. त्या अनुभवावर आधारीत आता या Project 17A प्रकल्पात युद्धनौकांची उभारणी केली जात आहे. त्यामुळे या नीलगिरी वर्गातील युद्धनौका या आणखी अत्याधुनिक असणार आहेत.
या प्रकल्पात नीलगिरी युद्धनौका या स्टेल्थ प्रकारातील असणार आहेत. म्हणजे या युद्धनौकांचा आकार, युद्धनौकांवर असणारी उपकरणे यांची रचना अशी असेल की यामुळे या युद्धनौका शत्रु पक्षाच्या रडारवर चटकन दिसणार नाहीत. या युद्धनौकांचा वजन हे सहा हजार ६०० टनापर्यंत असणार आहे. जमिनीवर जमिनीवर-पाण्यावरील युद्धनौकांवर , जमिनीवरुन हवेत मारा करता येणारी क्षेपणास्त्रे युद्धनौकेंवर असतील,ब्रह्मोस हे क्रुझ क्षेपणास्त्र तैनात असेल.तसंच शक्तीशाली रडारमुळे पाण्याच्या पृष्ठभागावरील, हवेतील तसंच पाण्याखाली लक्ष्य चटकन शोधणे शक्य होणार आहे.
या युद्धनौकांच्या बांधणीसाठी वापरलेले स्टील हे अत्युच्च दर्जाचे असल्याने ही युद्धनौका नौदलाच्या सेवेत दीर्घकाळ राहू शकणार आहे. पाण्यावर जास्तीत जास्त ५९ किलोमीटर वेगाने संचार करण्याची या युद्धनौकांची क्षमता असणार आहे.
तारागिरी
नीलगिरी वर्गातील सातही युद्धनौकांची बांधणी सुरु असून जलावतरण झालेली तारागिरी ही पाचवी युद्धनौका आहे. निलगिरी, उदयगिरी, हिमगिरी, दूनगिरी या चार युद्धनौकांच्या समुद्रातील चाचण्या सुरु आहेत. तारागिरी या युद्धनौकेची लांबी साधारण १४९ मीटर असून जलावतरणच्या वेळी वजन हे सुमारे तीन हजार ५०० टन एवढे होते.
अशा विविध प्रकारच्या ३० पेक्षा जास्त युद्धनौकांची बांधणी ही देशातल्या विविध गोदींमध्ये सुरु आहे.येत्या काही वर्षात या युद्धनौका दाखल होणार असून भारतीय नौदलाची ताकद शतपटीने वाढणार आहे.