शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी आग्रह धरणारे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इतर देशांमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी नेहमीच आघाडीवर असतात. दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना सत्तेवरून हटविण्यासाठी ट्रम्प प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच या देशात गुप्त कारवाई करण्यासाठी त्यांनी अमेरिकी गुप्तचर संस्था असलेल्या ‘सीआयए’ला अधिकृत आदेश दिले आहेत. ही घटना अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील संभाव्य हल्ल्याची नांदी मानली जाते. ‘सीआयए’ या देशात काय कारवाई करणार, मादुरो यांना पदच्युत व्हावे लागणार का, याविषयी…

व्हेनेझुएलामध्ये ट्रम्प यांनी काय कारवाई?

अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘सीआयए’ने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना सत्तेवरून हटवण्यासाठी गोपनीय कारवाई सुरू केली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच व्हेनेझुएलामध्ये कारवाया करण्यासाठी सीआयएची अधिकृत नियुक्ती केल्याचे सांगितले. अमेरिकेच्या सैन्याने कॅरेबियन समुद्रकाठी असलेल्या व्हेनेझुएलाच्या किनाऱ्यावर काही बोटींवर नुकतेच हल्ले केले. त्यात २७ जण ठार झाले. या बोटींतून अमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याचा आरोप करत अमेरिकेने ही कारवाई केली. मात्र अमली पदार्थाच्या नावाखाली आमच्या देशात अशांतता निर्माण करण्याचा अमेरिकेचा डाव आहे, असे व्हेनेझुएलाचे म्हणणे आहे.

अमेरिका काय तयारी करत आहे?

ट्रम्प प्रशासनाने दिलेल्या आदेशामुळे सीआयएला व्हेनेझुएला आणि कॅरेबियन परिसरात गोपनीय कारवाई करण्याची परवानगी मिळाली आहे. अमली पदार्थांची तस्करीच्या नावाखाली व्हेनेझुएलाच्या किनारपट्टीवरील बोटींना लक्ष्य करण्यात येत आहे. गुप्त कारवायांसाठी सीआयएला नियुक्त केल्याने दक्षिण अमेरिकी राष्ट्रांनी अमेरिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. अमेरिकी हवाई दलाच्या बी-५२ बॉम्बर्सनी कॅरेबियन समुद्रावर काही तास फिरून प्रवास केला. या परिसरात टेहळणी करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप व्हेनेझुएलाने केला आहे. 

ट्रम्प काय म्हणाले?

दूरचित्रवाणीवरील भाषणात ट्रम्प यांनी अमेरिकी जनतेला संबोधित केले. हे युद्ध नाही तर शांतता आहे, असे त्यांनी सांगितले. दक्षिण अमेरिकी देशांमधील अमली पदार्थ तस्करीला आळा घालण्याचा प्रयत्न अमेरिका करत आहे. अमेरिकी सैन्यदलाची अमली पदार्थांविषयीची सागरी कारवाई नियंत्रणात असून ते आता जमिनीवरील कारवाईकडे लक्ष देत आहेत, असे ट्रम्प म्हणाले. मात्र अमली पदार्थ हे एक निमित्त असून मादुरो यांना पाडणे हेच ट्रम्प यांचे ध्येय असल्याचे काही अमेरिकी माध्यमे सांगतात. 

व्हेनेझुएलामध्ये हल्ल्याची भीती?

व्हेनेझुएलामध्ये वाढलेल्या अमेरिकी लष्करी उपस्थितीमुळे या देशात संभाव्य हल्ल्याची भीती निर्माण झाली आहे. या देशात सुमारे १० हजार अमेरिकी सैन्य तैनात करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांनी नियुक्त केलेल्या मानवाधिकारतज्ज्ञांनी या कारवाईचे वर्णन ‘न्यायबाह्य हत्या’ असे केले आहे. इराक व सीरियामधील संघर्षांदरम्यान वापर करण्यात आलेली ‘बी-५२’ विमानेही येथे तैनात करण्यात आल्याची पुष्टी काही माध्यमांनी केली. 

व्हेनेझुएलाची प्रतिक्रिया काय?

व्हेनेझुएलाने अमेरिकेवर आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. मादुरो यांनी लाखोंनी बंडखोर गट तैनात करण्याची घोषणाही केली आहे. देशभरातील २८४ युद्धभूमी जागांवर लष्कर, पोलीस आणि नागरी संरक्षण दल तैनात करेल, असे अध्यक्ष मादुरो यांनी सांगितले. आवश्यक असल्यास सशस्त्र लढाईसाठी तयार आहोत. अमेरिकी कारवाईचा उल्लेख ‘नाझी अतिरेकी चळवळ’ असा करून त्यांचे सरकार याविरोधात ठामपणे उभे राहील, असे मादुरो यांनी सांगितले. मादुरो यांनी राजधानी कराकसच्या पेटारे उपनगर आणि शेजारच्या मिरांडा राज्यात लष्करी सराव करण्याचे आदेश दिले.