इस्रायस-हमास यांच्यातील युद्ध लांबल्यानंतर जगभरात ज्यू आणि पॅलेस्टाईन यांचे समर्थक आणि विरोधकही तयार झाले. इस्रायलने गाझा पट्टीतील रुग्णालयांवर हल्ला केल्यानंतर त्यांच्यावरही टीका झाली. त्यातच एक्स (जुने ट्विटर) या माध्यमावरही ज्यूविरोधी (antisemitic) मजकूर पोस्ट करण्यात आला. या मजकुराला एक्स या सोशल नेटवर्किंगचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पाठिंबा दर्शविल्यामुळे त्यांना लाखो डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. शुक्रवारी (२४ नोव्हेंबर) द न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापून आलेल्या बातमीनुसार, अनेक लोकप्रिय ब्रॅण्ड्सनी एक्सवर करण्यात येणाऱ्या जाहिराती थांबविल्या आहेत. त्यामध्ये वॉल्ट डिस्ने आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी अशा मोठ्या ब्रॅण्ड्सचाही समावेश आहे. एक्सवर अशा प्रकारे बहिष्कार टाकल्यास या वर्षाच्या अखेरीस एक्सला ७५ दशलक्ष डॉलर्सचा जाहिरात महसूल गमवावा लागणार असल्याचे या बातमीत म्हटले आहे. मस्क यांनी ही परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न केला असून, थेट इस्रायलच्या युद्धभूमीवर पाऊल ठेवून पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी संवाद साधला. या प्रकरणात काय काय झाले? याचा घेतलेला हा आढावा …
एक्सवरून मोठ्या जाहिरातदारांची माघार
द न्यूयॉर्क टाइम्सने एक्स कंपनीमधील अंतर्गत सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, मागच्या आठवड्यात जवळपास २०० कंपन्यांनी एक्सवर चालू असलेल्या त्यांच्या जाहिराती थांबविल्या आहेत. (सोशल मीडियावर काही दिवसांसाठी सलग ॲड कॅम्पेन राबविण्यात येते, असे कॅम्पेन मध्येच थांबविण्यात आले आहेत) एआरबीएनबी, ॲमेझॉन, कोका-कोला व मायक्रोसॉफ्ट यांसारख्या कंपन्यांनी त्यांच्या जाहिराती मागे घेतल्या आहेत किंवा थांबविल्या आहेत.
हे वाचा >> इस्रायलच्या जन्माची कथा : ‘ज्यू’ पॅलेस्टाईनच्या भूमीत का आले?
“एक्सचा सुमारे ११ दशलक्ष डॉलर्सचा महसूल धोक्यात आहे. काही जाहिरातदारांनी एक्सवर जाहिराती थांबविल्या आहेत; तर काही नवे जाहिरातदारही मिळाले आहेत. नव्या कंपन्यांनी जाहिराती वाढविल्यामुळे चढ-उतार झाल्यामुळे महसुलाचा अचूक आकडा सध्या सांगता येत नाही”, अशी माहिती न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीत देण्यात आली होती.
विशेष म्हणजे मस्क यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये एक्स सोशल मीडिया साइट ताब्यात घेतल्यापासून अनेक जाहिरातदारांनी येथून काढता पाय घेतला. मस्क यांनी मजकुरावर नियंत्रण ठेवणारे मनुष्यबळ कमी केल्यानंतर एक्सवर द्वेषयुक्त मजकुरात वाढ झाली आहे, असे नागरी हक्कांसाठी काम करणाऱ्या गटांचे म्हणणे आहे. मस्क यांनी एक्स ताब्यात घेतल्यापासून एकट्या अमेरिकेतील महसूल ५५ टक्क्यांनी घटला आहे आणि वर्षागणिक घसरणीत वाढ होत असल्याचे रॉयटर्सने मध्यंतरी बातमीत नमूद केले होते.
नेमका वाद काय झाला?
एक्सने अमेरिकेतील मीडिया मॅटर्स या संघटनेवर खटला भरून, त्यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. मीडिया मॅटर्स ही अमेरिकेतील माध्यमांवर देखरेख ठेवणारी, त्यांच्या कामाचे विश्लेषण करणारी स्वयंसेवी संस्था असून, ती डाव्या विचारसरणीकडे झुकलेली असल्याचे संस्थेचे प्रमुख सांगतात. मीडिया मॅटर्सने आरोप केला होता की, मक्स यांच्या एक्स या मायक्रोब्लॉगिंग साइटवर ॲपल, आयबीएम, ओरॅकल व ब्राव्हो यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या जाहिरातींसमवेत ज्यूविरोधी आणि हिटलरसमर्थक मजकूर दाखविला गेला. एक्सने हे दावे फेटाळून लावलेच, तसेच मीडिया मॅटर्सवर खटलाही दाखल केला.
डिस्ने, पॅरामाऊंट, एनबीसीयुनिव्हर्सल, ॲपल, कॉमकास्ट व आयबीएम यांसारख्या बड्या ब्रॅण्ड्सनी जाहिराती थांबविल्यानंतर एक्सकडून कायदेशीर कारवाई करण्याचे पाऊल उचलण्यात आल्याचे सीएनएनने त्यांच्या बातमीत नमूद केले आहे.
हे ही वाचा >> महात्मा गांधी यांनी पॅलेस्टाईनमधील ज्यू लोकांच्या देशाला विरोध का केला होता?
मस्क यांनीही एक्स या सोशल मायक्रोब्लॉगिंग साइटवर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. मी ज्यूविरोधी नाही. माध्यमांवर देखरेख ठेवणारी स्वयंसेवी संस्थाच (मीडिया मॅटर्स) दृष्ट आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
द इंडिपेंडंटच्या बातमीनुसार, मस्क आणि एक्सच्या इतर अधिकाऱ्यांनी सांगितले की, मीडिया मॅटर्सने जाहिरातींशी निगडित सामग्री तपासण्यासाठी जी अभ्यास पद्धत वापरली, ती साईटवरील वापरकर्ते कसे संवाद साधतात? याचे अचूकपणे वर्णन करीत नाही.
अमेरिकेमधील टेक्सास जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यात एक्सने दावा केला की, मीडिया मॅटर्सने मायक्रोब्लॉगिंग साइटशी छेडछाड करून, त्यांचा अहवाल तयार केला आहे. त्यांनी आपल्या एक्स खात्यावरून मोठमोठे ब्रॅण्ड्स आणि ज्यूविरोधी मजकूर टाकणाऱ्या खात्यांना फॉलो केले. ज्या खात्यांवरून ज्यूविरोधी मजकूर टाकण्यात आला आहे, त्यावर जाऊन त्यांनी वारंवार रिफ्रेश करून आणि खालपर्यंत स्क्रोल करून जाहिराती दिसण्याची वाट पाहिली. जेव्हा संवेदनशील मजकुरासमोर जाहिराती दिसल्या, तेव्हा त्याचे स्क्रीनशॉट घेतले आहेत.
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, टेक्सासच्या महाधिवक्त्यांनी सोमवारी मीडिया मॅटर्सची या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. मीडिया मॅटर्सचे अध्यक्ष अँजेलो कारुसोन यांनी ई-मेलवरून आपले निवेदन जाहीर केले. ते म्हणाले की, सदर खटला अतिशय क्षुल्लक असून, एक्सच्या टीकाकारांना धमकावून शांत करण्यासाठी दाखल करण्यात आलेला आहे.
“मीडिया मॅटर्स आपल्या मुद्द्यावर आणि पत्रकारितेवर ठाम असून, आम्ही न्यायालयातही विजय प्राप्त करू”, असा विश्वास अँजेलो यांनी व्यक्त केला.
आणखी वाचा >> Israel-Hamas War : युद्धग्रस्त गाझाला एलॉन मस्क यांचा मदतीचा हात, ‘एक्स’चा महसूल दान करणार
एलॉन मस्क यांची ज्यूविरोधातील पोस्ट
नोव्हेंबर महिन्यात एलॉन मस्क यांनी एका ज्यूविरोधी पोस्टला समर्थन दिले होते. “ज्यू धर्मीय लोक श्वेतवर्णीयांविरोधात द्वेष पसरवीत आहेत”, अशी पोस्ट एका खातेधारकाने केली होती. या पोस्टला रिपोस्ट करून मस्क यांनी पाठिंबा दिला होता. तसेच ही व्यक्ती खरे बोलत असल्याची कॅप्शनही त्यांनी दिली होती. मस्क यांच्या या भूमिकेनंतर त्यांच्यावर ज्यूविरोधी असल्याचा ठपका ठेवून टीका करण्यात आली. अगदी व्हाइट हाऊसनेही याबद्दल नाराजी व्यक्त केली.
व्हाइट हाऊसचे प्रवक्ते ॲण्ड्रयू बेट्स यांनी म्हटले की, ज्यू लोकांवर एक नृशंस हल्ला होऊन अद्याप एक महिन्याचा कालावधी लोटला असताना अशा प्रकारची ज्यूविरोधी टिप्पणी करून, असत्याची मांडणी पुन्हा करणे हे अस्वीकारार्ह आहे.
मस्क यांनीही या टीकेला उत्तर दिले. ते म्हणाले की, सत्याच्या पुढे काहीही असू शकत नाही. मानवतेसाठी जे योग्य आहे आणि सर्वांचे आयुष्य ज्यामुळे समृद्ध होऊ शकते, अशा भविष्यासाठी मी सर्वांनाच शुभेच्छा देऊ इच्छितो.
मस्क यांचा इस्रायल दौरा
दरम्यान, एलॉन मस्कवर ज्यूविरोधी असल्याचा ठपका लागल्यानंतर सोमवारी (२७ नोव्हेंबर) एलॉन मस्क हे थेट इस्रायलमध्ये पोहोचले. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह त्यांनी हमासने हल्ला केलेल्या किबुत्ज शहराची पाहणी केली. हमासने केलेल्या नृशंस हल्ल्यात येथील अनेक इस्रायली नागरिकांना प्राणास मुकावे लागले. त्याची संहारकता नेतान्याहू यांनी मस्क यांना दाखवून दिली. त्यामुळे जरी आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आता एक्सवर बहिष्कार टाकला असला तरी मस्क यांच्या ताज्या दौऱ्यामुळे तो कालांतराने मागे घेण्याचीही शक्यता आहे. इस्रायलच्या दौऱ्यात मस्क यांनी गाझा पट्टीचे पुनर्वसन करण्यासाठी मदत करू, असे आश्वासन दिले; पण त्यासाठी येथील कट्टरतावाद समूळ नष्ट झाला पाहिजे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. नेतान्याहू यांनी या भेटीचे काही फोटो आणि व्हिडीओ एक्सवर पोस्ट केले आहेत.