भारतीय नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोलंकी यांची ९ मे रोजी भारताच्या राष्ट्रपतींच्या एड-डी-कॅम्प (एडीसी) म्हणून नियुक्ती करण्यात आली. या पदावर नियुक्ती होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. राष्ट्रपती सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर असतात. पहिल्यांदाच एका महिला नौदल अधिकाऱ्याला सर्वोच्च कमांडरचे एड-डी-कॅम्प हे पद देण्यात आले आहे. राष्ट्रपतींना पाच एडीसी दिले जातात. त्यात तीन सैन्य दलातील, एक हवाई दलातील आणि एका नौदलातील अधिकाऱ्याचा समावेश असतो. एडीसी हे पद नक्की काय आहे? कोण आहेत यशस्वी सोलंकी? जाणून घेऊयात. राष्ट्रपतींचे लष्करी सचिव मेजर जनरल व्ही. परिदा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “हा विचार स्वतः सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.” परिदा यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “राष्ट्रपती स्वतः महिला सक्षमीकरण, लिंग समानता आणि समावेशकतेबद्दल खूप बोलतात, त्यामुळेच त्यांचा हा विचार आहे, जो अमलात आणला गेला आहे,” असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपती सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर असतात. (छायाचित्र-पीटीआय)

यशस्वी सोलंकी यांची निवड कशी करण्यात आली?

  • यशस्वी सोलंकी यांची एप्रिलमध्ये निवड झाली.
  • महिनाभर त्यांचे मार्गदर्शन करण्यात आले.
  • तीन नौदल अधिकाऱ्यांच्या पॅनेलला निवडीसाठी बोलावण्यात आले होते. या पॅनेलमध्ये सर्व महिला अधिकारी होत्या.
  • हे तिन्ही अधिकारी १५ दिवस राष्ट्रपती भवनात राहिले.
  • त्या दरम्यान त्यांचे मूल्यांकन करण्यात आले.
  • त्यांची स्वतः राष्ट्रपतींबरोबर मुलाखत घेण्यात आली.
  • शारीरिक निकषांसह त्यांची मूलभूत बुद्धिमत्ता आणि अनुकूलतादेखील तपासण्यात आली.

या पदासाठी निकष काय?

  • १७३ सेमी उंची
  • शारीरिक तंदुरुस्ती
  • कायमस्वरूपी कमिशन नसलेल्या म्हणजेच निवृत्तीपर्यंत सैन्यात सेवेची संधी नसलेल्या महिला अधिकारीदेखील या पदासाठी अर्ज करू शकतात.

या पदावरील अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या काय?

  • राष्ट्रपतींच्या एडीसी या राष्ट्रपतींशी संपर्क साधण्याचे काम करतात. त्यांच्या भेटींबाबत निर्णय घेतात.
  • एडीसी राष्ट्रपतींना त्यांच्या औपचारिक, राजनैतिक आणि ऑपरेशनल कर्तव्यांमध्येदेखील मदत करतात.
  • एडीसी सर्व राष्ट्रपती समारंभ आणि कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपतींबरोबर उपस्थित असतात.
  • ते सरकार आणि लष्कराच्या विविध शाखांशी संवाद साधण्यास मदत करतात.
  • त्यांना राष्ट्रपतींच्या दालनाच्या शेजारी एक ड्युटी रूम दिली जाते, जिथे त्यांना नेहमीच उपलब्ध राहावे लागते.
  • यशस्वी सोलंकी यांची अडीच ते तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

यशस्वी सोलंकी काय म्हणाल्या?

सोलंकी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, आम्ही सर्व कामांची तयारी करतो आणि राष्ट्रपतींना भेटण्यासाठी कोण येत आहे याची अद्ययावत माहिती घेतो. आम्हाला प्रत्येक कामाच्या आधी त्यांना माहिती द्यावी लागते आणि त्याविषयी त्या काहीही प्रश्न करू शकतात. राष्ट्रपतींच्या एडीसी म्हणून निवड होण्याचा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. हे माझ्या बकेट लिस्टमध्ये कधीच नव्हते, कारण मला वाटले नव्हते की हे शक्य होईल.”

सोलंकी यांना आधी हैदराबादमधील नौदल शस्त्रास्त्र (संरक्षण उत्पादन) मध्ये तैनात करण्यात आले होते. त्या म्हणाल्या, “मी एक तांत्रिक अधिकारी आहे आणि सुरुवातीला माझ्या जवळील ज्ञान खूपच मर्यादित होते. मला सामान्य ज्ञान होते, पण आता मला नेहमीच अपडेट राहण्याची गरज आहे. जसे की, प्रत्येक तासाला, प्रत्येक मिनिटाला; तुम्हाला दर सेकंदाला अपडेट राहावे लागेल. याचे कारण म्हणजे कधीही, कोणीही मला कोणताही प्रश्न विचारू शकतात आणि मला तयार राहावे लागेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

यशस्वी सोलंकी कोण आहेत?

यशस्वी सोलंकी यांना शॉर्ट सर्व्हिसमध्ये कमिशन मिळाल्यानंतर भारतीय नौदलात नियुक्त करण्यात आले. त्यांच्या व्यावसायिक कारकि‍र्दीत त्यांनी आपल्या कर्तव्यांप्रती समर्पण दाखवले आहे. ज्यांची एडीसी म्हणून निवड केली जाते त्यांच्याकडे किमान पाच ते सात वर्षे सेवा पुरवण्याची संधी असते. राष्ट्रपतींकडे अधिकृतपणे पाच एडीसी आहेत, जे तिन्ही सशस्त्र दलांमधून निवडले जातात. मुख्य म्हणजे राष्ट्रपतींना त्यांच्या इच्छेनुसार या सशस्त्र दलांमधून अधिकारी निवडण्याचा अधिकार आहे.

भारताच्या एकूण संरक्षण आणि सुरक्षेत महत्त्वाच्या लष्करी भूमिका आणि विविध भूमिका बजावणाऱ्या महिलांच्या लांबलचक यादीत यशस्वी यांचे नाव जोडले गेले आहे. भारतीय सशस्त्र दलात काही महिला अग्रणी राहिल्या आहेत. पुनिता अरोरा या भारतीय सैन्यातील पहिल्या भारतीय महिला लेफ्टनंट जनरल आहेत आणि त्या भारतीय नौदलात व्हाइस अॅडमिरलदेखील आहेत. पद्मावती बंदोपाध्याय या भारताच्या पहिल्या महिला एअर मार्शल आणि एव्हिएशन मेडिसिन स्पेशालिस्ट ठरणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्य म्हणजे २०२३ मध्ये स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाधी यांना मिझोरमचे मुख्यमंत्री हरिबाबू कंभमबाटी यांचे एडीसी म्हणून नियुक्त करण्यात आले. राज्यपालांच्या एडीसी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. २०१९ च्या सुरुवातीला लेफ्टनंट गनिवे लालजी यांना आर्मी कमांडरच्या एडीसी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. आर्मी कमांडरच्या एडीसी होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.