फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत रविवारच्या दोन लढतींमध्ये आश्चर्यकारक निकालांची नोंद झाली. मेक्सिकोने गतविजेत्या जर्मनीला १-० ने पराभवाचा धक्का दिल्यानंतर ब्राझील आणि स्वित्झर्लंडमधला सामना १-१ गोलबरोबरीमुळे अनिर्णित राहिला. या लढतीआधी बलाढय ब्राझीलला विजयासाठी सर्वाधिक पसंती दिली जात होती. पण स्वित्झर्लंडचा संघ ब्राझीलचे आव्हान थोपवून धरण्यात यशस्वी ठरला.

ब्राझीलच्या फिलीप कोतिन्होने सामन्याच्या २० व्या मिनिटाला शानदार मैदानी गोल केला आणि संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. गोलपोस्टपासून बऱ्याच लांब अंतरावरुन मारलेला हा फटका स्वित्झर्लंडच्या गोलरक्षकाला रोखता आला नाही.मध्यंतरापर्यंत ब्राझीलकडे १-० अशी आघाडी होती. चेंडूवर ब्राझीलचे नियंत्रण होते. स्विस खेळाडूंना चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता.

सामन्याच्या सुरुवातीपासून ब्राझील वर्चस्व राखून होता. पण सामन्याच्या ५० व्या मिनिटाला स्वित्झर्लंडच्या स्टीव्हन झुबेरने पेनल्टी कॉर्नरवर हेडरच्या सहाय्याने शानदार गोल करत संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर ब्राझील आणि स्विस संघाने परस्परांवर गोल डागण्याचे जोरदार प्रयत्न केला पण कोणालाही यश मिळाले नाही. अखेर ग्रुप ई मधला हा सामना १-१ असा बरोबरीत सुटला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रशियाच्या रोस्तोव एरीना स्टेडियममध्ये झालेला हा सामना पाहण्यासाठी मैदान प्रेक्षकांनी खच्चून भरले होते. ब्राझीलचा स्टार प्लेअर नेमार सुद्धा या सामन्यात खेळला. त्याच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या पण तो फारशी चमक दाखवू शकला नाही. पाचवेळचा विश्वविजेता ब्राझीलचा संघ ४० वर्षात पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये सलामीचा सामना जिंकू शकलेला नाही.