स्वीडनसारख्या आकाराने, लोकसंख्येने लहान आणि अलिप्त देशाने विकसित केलेले ग्रिपेन हे बहुउद्देशीय लढाऊ विमान आजच्या सर्वात आधुनिक विमानांमध्ये गणले जाते. भारतीय हवाईदलाला १२६ मध्यम आकाराच्या, बहुउद्देशीय लढाऊ विमानांची (मीडियम, मल्टिरोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट-एमएमआरसीए) गरज आहे. ती भागवण्यासाठी अमेरिकी एफ-१६, एफ/ए-१८ हॉर्नेट, रशियन सुखोई-३५, युरोफायटर टायफून, फ्रेंच राफेल यांच्यासह स्वीडिश ग्रिपेन विमानांचाही विचार केला जात होता.
स्वीडनच्या ‘साब’ (स्वेन्स्का एरोप्लान आक्टिबोलागेट म्हणजे स्वीडिश एअरक्राफ्ट कन्स्ट्रक्शन कंपनी) या कंपनीची १९३७ साली स्थापना झाली. त्यांनी विगेन, द्रागेन यांसारखी लढाऊ विमाने तयार केली होती. ती बदलण्यासाठी १९८० च्या दशकात ग्रिपेनच्या विकासाला सुरुवात झाली. स्वीडिश ग्रिपेन किंवा इंग्रजी ग्रिफिन म्हणजे सिंहाचे शरीर आणि गरुडाचे तोंड आणि पंजे असलेला मिथकांतील प्राणी. त्याच्या नावापुढील जेएएस या अक्षरांचे स्वीडिश विस्तारित रूप जॅक्त (यॅक्त), अॅटॅक, स्पॅनिंग असे असून इंग्रजीत त्याचा अर्थ इंटरसेप्शन, ग्राऊंड अॅटॅक आणि रेकोनेसन्स असा आहे. म्हणजेच हवाई लढती, जमिनीवरील हल्ला आणि टेहळणी अशा विविध भूमिकांमध्ये हे विमान वापरता येते.
स्वीडनने ग्रिपेनच्या निर्मितीसाठी खूप कठोर निकष आखले होते. ग्रिपेनचे वजन त्यापूर्वीच्या विगेन आणि फ्रेंच राफेलपेक्षा निम्म्याने कमी आहे. ग्रिपेन युरोफायटरपेक्षा आकाराने बरेच लहान आहे. डेल्टा विंग्ज आणि कॅनार्डमुळे ते आणीबाणीच्या स्थितीत रस्त्यावरील ८०० मीटरपेक्षा कमी अंतराच्या टप्प्यातून उड्डाण घेऊ शकते. त्याची देखभाल-दुरुस्ती खूप सोपी आहे. केवळ सहा तंत्रज्ञ त्याला केवळ १० मिनिटांत पुन्हा हल्ल्यासाठी सज्ज करू शकतात. टेक-ऑफची आज्ञा मिळताच केवळ ६० सेकंदांत ग्रिपेन हवेत झेपावते. अमेरिकेच्या एफ-१६ ला यासाठी तीन मिनिटे लागत असल्याने स्वीडनने ती विमाने नाकारली होती.
फ्लाय बाय वायर आणि संगणकीकृत नियंत्रण, शक्तिशाली एरिकसन पीएस-०५/ए पल्स डॉप्लर रडार अशा अत्याधुनिक यंत्रणांसह ग्रिपेनचे वैशिष्टय़ म्हणजे वेगवान डेटा लिंक प्रणाली. त्याच्या मदतीने ग्रिपेन त्याच्या तुकडीतील विमाने आणि जमिनीवरील व हवेतील केंद्रांकडून माहिती मिळवत असते. शत्रूवर हल्ला करताना लपून राहण्यासाठी ग्रिपेन स्वत:चे रडार बंद करून तुकडीतील अन्य विमानांकडून शत्रूच्या हालचालींची माहिती मिळवू शकते. इतकेच नव्हे तर विंगमनच्या विमानातील पेट्रोलची पातळीही समजू शकते.
सचिन दिवाण
sachin.diwan@expressindia.com