नागपूर: शहरातील १४०० गणेशोत्सव मंडळांच्या अंगणात वाजत गाजत लाडक्या गणरायाचे बुधवारी आगमन होणार आहे. त्यासाठी ५ हजार पोलिसांची फौज तयार करण्यत आली आहे. गणेशोत्सवाच्या उत्सालाहा कुठेही गालबोट लागू नये यासाठी पोलिस आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या आणि १३०० होमगार्डही सज्ज ठेवण्यात आले आहेत.
गणेशोत्सव मार्च महिन्यात शहरात उसळलेल्या जातीय दंगलींच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांसह एटीएस आणि बीडीडीएसलाही अलर्टवर ठेवण्यात आले आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून गर्दीच्या ठिकाणांवर पोलिसांची बारीक नजर राहणार आहे.
पोलिस आयुक्तांनी या संदर्भात सर्व अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शहरात सुमारे १४०० गणेश मंडळांनी नोंदणी केली आहे. गणेशोत्सवादरम्यान सुरक्षेसाठी पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन कंपन्या आणि होमगार्डचे १३०० जवानही तैनात आहेत. संशयास्पद लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी गुप्तचर संस्था आणि दहशतवाद विरोधी तुकड्या, दंगल विरोधी पथक तैनात करण्यात आले आहेत.
मार्चच्या दंगलीत सहभागी असलेल्या लोकांच्या हालचालींची नोंद करण्यास सांगण्यात आले आहे. मोठ्या मंडळांची नियमितपणे तपासणी करण्याचे निर्देश बीडीडीएसला देण्यात आले आहेत. शहर पोलिस दोन महिन्यांपासून गणेशोत्सवाच्या सुरक्षेत गुंतले आहेत. नागपूर शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्याची तयारी सुरू आहे. गणेशोत्सवादरम्यान कुठे काही गडबड गोंधळ दिसल्यास, संशयित व्यक्ती वा वस्तू आढळल्यास तातडीने पोलिस नियंत्रण कक्ष किंवा जवळच्या पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले आहे.
डीजेचे नियम मोडले तर जप्ती
एक गणेश मंडळ एक पोलीस आणि दर चार गणेशमंडळाच्या मागे एक पोलीस अधिकारी या प्रमाणे प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना गणेशोत्सव काळात बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. पोलिसांनी गणेश मंडळांना डीजे वाजवण्याच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल करून डीजे जप्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विनयभंगाच्या घटना लक्षात घेता, महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांना तैनात करण्यास सांगण्यात आले आहे.