शांततेचे विसर्जन!

ठाण्यात सर्वत्र ध्वनिमर्यादेचे उल्लंघन

गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा, बॅन्जोचा दणदणाट; ठाण्यात सर्वत्र ध्वनिमर्यादेचे उल्लंघन

गौरी-गणपतीला निरोप देण्याच्या निमित्ताने ठाणेकरांनी गुरुवारी शांतता आणि विवेकबुद्धीचेही विसर्जन केल्याचे दिसून आले. विसर्जन मिरवणुकांमध्ये वापरण्यात आलेल्या ढोलताशा, बॅन्जो आणि ध्वनिवर्धकांच्या ढणढणाटामुळे ठाण्यात सर्वत्र ध्वनिप्रदूषण झाल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांच्या तपासणीत आढळले आहे. विशेष म्हणजे, शांतता क्षेत्रांतही ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करून मिरवणुका काढण्यात येत होत्या. हे सर्व सुरू असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोपही पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी केला आहे.

राम मारुती रोड, गोखले रोड आणि कोपरी पूर्व भागातील रस्त्यावरून निघालेल्या गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकांच्या परिसरातील आवाजाच्या पातळीचे मापन करण्यात आले. त्यामध्ये राम मारुती रोड परिसरात रात्री १२ वाजेपर्यंत आवाजाची पातळी १०५ डेसिबलपर्यंत होती. गोखले रोड भागात रात्री दहा वाजेपर्यंत १०० डेसिबल तर रात्री ११.३० वाजेपर्यंत ९० डेसिबल इतकी होती. कोपरी स्थानक परिसरात रात्री १०.३० वाजता १०० डेसिबल इतका आवाजाची पातळी होती. मिरवणुकींमधील ढोल-ताशा, स्पीकर, बॅन्जो आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ही आवाजाची पातळी वाढून ध्वनिप्रदूषण झाले, अशी माहिती ठाण्यातील पर्यावरणप्रेमी डॉ. महेश बेडेकर यांनी दिली. तसेच शहराच्या विविध भागात ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या कार्यकर्त्यांनीही आवाजाची पातळी मोजली असून त्यामध्ये रुग्णालयांच्या परिसरात ध्वनिप्रदूषण झाल्याचे समोर आले आहे, असेही त्यांनी सांगितले. ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या ५० कार्यकर्त्यांनी शहराच्या विविध भागात आवाजाची पातळी मोजली असून त्यामध्ये कोपरी, गोखले रोड, पाचपखाडी, नौपाडा, खोपट तसेच अन्य भागातील रुग्णालयांच्या परिसरात आवाजाची पातळी १०० ते ११० डेसिबल इतकी असल्याचे समोर आले आहे.

अवघ्या ३० ठिकाणी तात्काळ कारवाई

अभियानाचे कार्यकर्ते मोबाइलच्या साहाय्याने मिरवणुकांमधील आवाजाची पातळी मोजत होते आणि त्यामध्ये ध्वनिप्रदूषण होत असल्याचे आढळून आले तर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आणि व्हॉटस अ‍ॅप क्रमांकावर तक्रार नोंदवित होते. शहराच्या विविध भागातील अशा प्रकारे एकूण ५० तक्रारी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आणि व्हॉटस अ‍ॅप क्रमांकावर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३० तक्रारींवर पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन कारवाई केली. मात्र, त्या ठिकाणी काही वेळाने पुन्हा ध्वनिप्रदूषण सुरू झाल्याचे दिसून आले, अशी माहिती ठाणे मतदाता जागरण अभियानाचे सचिव उन्मेष बागवे यांनी दिली.

महत्त्वाची निरीक्षणे..

  • गेल्या वर्षी शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये ६० ते ७० ठिकाणी बॉलीवूडमधील गाणी वाजत होती. मात्र, यंदाच्या मिरवणुकांमध्ये हे प्रमाण ३० टक्क्य़ांनी म्हणजेच निम्म्याने कमी झाले आहे.
  • यंदाच्या मिरवणुकांमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीचे प्रमाणही कमी होते.
  • मिरवणुकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून काही मंडळाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी वाहतुकीचे नियोजन करताना दिसून आले, अशी माहिती डॉ. बेडेकर यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ganesh immersion at thane