अलिबाग- लाडक्या गणेशाच्या आगमनासाठी रायगड जिल्हा सज्ज झाला असून आज १ लाख ०२ हजार १९८४ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. दरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा गजबजल्या, मखर, फुले, फळ खरेदीसाठी झुंबड उडतांना दिसत आहे. महागाईमुळे गणेश भक्तांच्या खिशाला झळ बसत असली तरी उत्साह मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे.

उत्सवप्रिय कोकणात गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. या सणाच्या निमित्याने दरवर्षी मुंबईतील लाखो गणेशभक्त कोकणात दाखल होत असतात. डोक्यावर उचलून वाजत गाजत गणेशमूर्तींना घरी आणले जाते. घराघरात मोठ्या उत्साहाने लाडक्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. पारंपारिक खालुबाजाचे सूर या निमित्ताने गावागावात ऐकायला मिळतात. बाल्या डान्स, भजन, किर्तन यांचे आयोजन केले जाते. गणपती हा कोकणवासियांचे आराध्य दैवत मानले जाते. त्यामुळे कुठे दिड दिवस, कुठे सात दिवस, कुठे दहा दिवस तर काही ठिकाणी २१ दिवसांसाठी गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना केली जाते.

रायगड जिल्ह्यात यंदा १ लाख २ हजार १९८ खाजगी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. तर २८६ सार्वजनीक गणेशमुर्तींचा समावेश आहे. गणेशोत्सवाची तयारी पुर्ण झाली असून मुंबईत वास्तव्यास असलेले गणेशभक्त मोठ्या संख्येनी रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहे. मंगळावारी सकाळपासूनच बाजारपेठा पूजा साहित्य आणि सजावट साहित्य खरेदीसाठी गजबजुन गेल्या होत्या. फुलांच्या आणि फळांच्या किंमतीही वाढल्या होत्या. फळ १५० ते २०० रुपये किलो प्रमाणे तर फुले २५० ते ४५० रुपये किलो प्रमाणे विकली जात होती. पर्यावरण पुरक मखरे २ हजार ५०० रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंत विकली जात होती. गेली काही दिवस शांत असलेल्या बाजरपेठा यानिमित्त्ताने गजबजल्या होत्या मात्र वाढत्या महागाईमुळे गणेशभक्तांच्या खिश्यावर ताण पडत असला तरी, खरेदीचा उत्साह मात्र कायम होता. .

पोलीस बंदोबस्तात वाढ

गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर रायगड जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. जिल्ह्यात २ हजार २०० पोलीस कर्मचारी, ८ पोलीस उप अधिक्षक, २२ पोलीस निरीक्षक, २७४ पोलीस अधिकारी, ५०० होमगार्ड, जालना येथून ५० पोलीस कर्मचारी तर नाशिक येथून १५ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. याशिवाय ६ शिघ्र कृती दल तैनात ठेवण्यात आले आहेत अशी माहीती जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालया मार्फत देण्यात आली.