पिंपरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी मोशी खाणसह शहरातील प्रमुख गणेश विसर्जन घाटांची पाहणी केली. विसर्जनाच्या दिवशी भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी विसर्जन घाटांवर आवश्यक सुविधांसह पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे निर्देश आयुक्त सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

शहर अभियंता मकरंद निकम, सहआयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, उपायुक्त सचिन पवार, अण्णा बोदडे, सहायक आयुक्त अजिंक्य येळे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, कार्यकारी अभियंता हरविंदसिंह बन्सल यावेळी उपस्थित होते. मोशी खाण, इंद्रायणी नदी विसर्जन घाट, पिंपरी येथील पवना नदीवरील झुलेलाल घाट, सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाची आयुक्तांनी पाहणी केली.

आयुक्त सिंह म्हणाले, ‘मोशी खाणीकडे येणाऱ्या रस्त्यावर मुरूम टाकून त्याची डागडूजी करावी. गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत. आरोग्य विभाग व सुरक्षारक्षकांची पथके येथे कार्यरत ठेवावीत. आवश्यक तेथे सीसीटीव्हीसह वीज, मंडप, पिण्याचे पाणी आदी व्यवस्था करण्यात यावी. विसर्जन घाटांवर गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. विसर्जन घाटांवर पुरेसे कर्मचारी व यंत्रणा कार्यान्वित ठेवावी. निर्माल्यकुंडाची व्यवस्था करावी. कृत्रिम विसर्जन हौदांच्या स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. घाटांवर सुशोभीकरण करावे. दिशादर्शक फलक लावावेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

पीओपी व शाडू मातीच्या मूर्तींची नोंद

गणेश विसर्जन घाटांवर विसर्जन केल्या जाणाऱ्या उत्सव मूर्तींची नोंद ठेवण्यात यावी. विसर्जनासाठी आलेल्या मूर्तीची नोंद ठेवताना ती पीओपीची आहे की शाडू मातीची आहे. मूर्तीची उंची पाच फूट किंवा त्यापेक्षा जास्त आहे का, याप्रमाणे तिची नोंद करून ठेवावी, असेही आयुक्त सिंह यांनी सांगितले.

अतिरिक्त आयुक्तांनीही घेतला विसर्जन घाटांवरील सुविधांचा प्रभागनिहाय आढावा

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी महापालिकेच्या ग, ड आणि ह प्रभागातील तर अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी अ, ब प्रभागातील महत्त्वाच्या गणेश विसर्जन घाटांची पाहणी करून आवश्यक सोयीसुविधांचा सखोल आढावा घेतला. अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी ग प्रभागातील सुभाषनगर घाट, पवनेश्वर घाट, महादेव मंदिर घाट, दत्त मंदिर घाट, ड प्रभागातील पुनावळे राम मंदिर शेजारील घाट, पिंपळे निलख येथील इंगवले पूल घाट, पिंपळे गुरव घाट तसेच ह प्रभागातील कासारवाडी स्मशानभूमी लगतचा विसर्जन घाट, दापोडी येथील हॅरीस ब्रिज घाट आणि जुनी सांगवी येथील श्री. वेताळ महाराज घाट अशा विविध ठिकाणांना भेट दिली. तर, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी रावेत, चिंचवडगाव, निगडी, काळेवाडी या भागातील विसर्जन घाटांना भेट देत पाहणी केली.