ganpati visarjan celebrate by Indian Army : लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर (एलएसी) चीनसोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान सियाचीन सीमेवरील गणेशोत्सवाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. देशभरात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. त्यात अनेकांनी पाच दिवसांच्या गणपती बाप्पाला ढोल-ताशांच्या गजरात आनंदात निरोपही दिला. त्याचप्रमाणे सियाचीनमधील भारतीय सीमेवरही जवानांनी पाच दिवस मनोभावे पूजा करीत गणपती बाप्पाला उत्साहपूर्ण वातावरणात निरोप दिला. या निरोपाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सियाचीन ही जगातील सर्वांत उंचावरील युद्धभूमी आहे. येथे तैनात भारतीय जवान अनेक अडचणींना तोंड देत रात्रंदिवस आपल्या सीमेचे रक्षण करत असतात. यामुळे कुटुंबापासून दूर राहत या जवानांना सीमेवरच सण-समारंभ साजरे करावे लागतात. काही वेळा कठीण परिस्थितीत तर हे सणही पाहायला मिळत नाहीत. पण सियाचीन सीमेवर होणाऱ्या गणपती बाप्पाच्या आगमनाने जवानांना लढण्यासाठी दहा हत्तींचे बळ मिळत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लडाखच्या लेहमधील सियाचिन सीमेवर भारतीय जवान वाजत-गाजत अगदी आनंदात पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देत आहेत. लाडक्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी एक मिलिट्री व्हॅन खास पद्धतीने सजावण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये गणपती बाप्पाच्या आजूबाजूने मावळ्यांच्या वेशातील जवान छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो असलेले भगवे झेंडे हातात घेत उभे आहेत. या विसर्जन मिरवणुकीत उपस्थित जवान गालालाची मुक्त उधळण करत नाचण्यात दंग आहेत, या मिरवणुकीत लेझीमच्या खेळाने एक वेगळाच बहार आणली आहे. याशिवाय अनेक जवान हातात छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो असलेले भगवे झेंडे फडकवत डीजेच्या तालावर नाचताना दिसत आहेत.. काठीनं घोंगडं घेऊ द्या की रं, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा यासह अनेक मराठमोळ्या गाण्यांवर भारतीय जवानांनी ठेका धरला. अगदी आनंदात, वाजत, गाजत सियाचीन सीमेवर गणपती बाप्पाची ही विसर्जन मिरवणूक पार पडली. सियाचिन बॉर्डरवर भारतीय जवानांनी गणरायाला दिला निरोप! पाहा व्हिडीओ सियाचीन सीमेवरील गणेश विसर्जन मिरवणुकीचा हा व्हिडीओ आमच्या loksattalive वर शेअर करण्यात आला आहे. जो आत्तापर्यंत सहा हजारपेक्षा जास्त युजर्सनी पाहिला आहे. तर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने गणपती बाप्पाकडे साकडं घालत लिहिले की, हे गणपती बाप्पा माझ्या सर्व जवान भावांना सुखरूप ठेवा, त्यांच्यावरील विघ्न दूर करा, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या जय श्रीराम जय भारतमाता की जय…