Konkan Railway Running Late All Train Time Table : संपूर्ण महाराष्ट्रभर गणेशोत्सवाचा उत्साह आहे. सर्वत्र लाडक्या बाप्पाच्या आगमनाची लगबग चालू आहे. गणेशोत्सव हा कोकणातला सर्वात मोठा सण असल्यामुळे मुंबई-पुण्यातील चाकरमान्यांनी गणेशोत्सवानिमित्त कोकणातील आपापल्या गावांची वाट धरली आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गाड्यांना प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. एसटी, रेल्वे आणि खासगी गाड्यांमधून कोकणवासी नागरिक आपापल्या गावी निघाले आहेत. परिणामी विविध रेल्वे आणि बस स्थानकांवर प्रवाशांची मोठी झुंबड उडाल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, चाकरमान्यांसाठी पुरेशा एसटी आणि रेल्वे नसल्यामुळे लोकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच ज्या रेल्वे आणि एसटी कोकणात जात आहेत त्यांना उशीर झाल्याचं पाहायला मिळत आहे.

कोकण रेल्वेने यंदाही गणपतीच्या निमित्ताने अनेक ट्रेन सोडल्या आहेत. परंतु, बहुसंख्य ट्रेन उशिराने धावत आहेत. कोकण रेल्वेच्या संकेतस्थळावरील लाइव्ह ट्रॅकरनुसार आठ ते १० गाड्या उशिराने धावत आहेत. तर, प्रत्यक्षात ही आकडेवारी जास्त आहे. काही ट्रेन्स उशिराने सोडण्यात आल्या. तर, काही ट्रेन्स धिम्या गतीने धावत असल्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत. कोकण रेल्वेच्या आठ ते १० ट्रेन एक ते पाच तास उशिराने धावत आहेत.

उशिराने धावत असलेल्या गाड्यांची यादी

  • 01445- पुणे-रत्नागिरी : ४ तास २ मिनिटं
  • 00148- मुंबई सीएसटी – सावंतवाडी : १ तास
  • 01109- मुंबई एलटीटी – सावंतवाडी : ५ तास ६ मिनिटं
  • 01151- मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी : १ तास २५ मिनिटं
  • 01155- दिवा – चिपळूण : १ तास
  • 01165- मुंबई एलटीटी – मडगाव : २ तास ५३ मिनिटं
  • 01171- एलटीटी सावंतवाडी : १ तास
  • 10103- मांडवी एक्स्प्रेस : १ तास २८ मिनिटं
  • 12051- जनशताब्दी : ५० मिनिटं

गाड्यांना उशीर होण्याचं कारण काय?

कोकण रेलेवे २२ ऑगस्टपासून गणेशोत्सव विशेष गाड्या चालवत आहे. सणानिमित्त कोकण रेल्वेने ३८० अधिक फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी पाहून ही व्यवस्था करण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावर अनेक अनारक्षित गाड्या देखील चालवल्या जात आहेत. या गाड्यांना कोलाड, मानगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार आणि उडुपी अशा प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. तसेच इतर काही छोट्या गावांमध्ये देखील थांबे देण्यात आले आहेत. इतके थांबवे आणि अधिकच्या गाड्या चालवल्यामुळे ट्रॅकवर ताण आला असून नियमित व विशेष गाड्या उशिराने धावत आहेत.