सोलावूडमधून गुंफलेल्या मोगऱ्याच्या कळ्या.. डय़ुप्लेक्स कागदापासून साकारलेले आकर्षक गुलाब पुष्प.. कापडाची देखणी लेस.. अन् कार्डपेपर .. अशी पर्यावरणस्नेही आभूषणे यंदा गणरायाच्या अंगावर पाहावयास मिळणार आहेत. पर्यावरणाच्या रक्षणार्थ ‘मिळून साऱ्याजणी’ पर्यावरणप्रेमींनी गणरायाला ही आगळीवेगळी पुष्पांजली वाहिली आहे.
लहानपणापासून हस्तकलेची आवड असलेल्या प्रीती कदम यांनी पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आपल्या कलेतून छोटासा प्रयत्न केला आहे. हस्तकलेची एखादी वस्तू साकारत असताना त्यांच्या घरातील घरकाम करणारी महिला त्याकडे अधूनमधून चोरून पाहात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तिला ओरडण्याएवजी त्यांनी हस्तकलेचे धडे दिले. घरकाम करणाऱ्या तिच्या काही मत्रीणींनीही प्रीती कदम यांच्याकडून हस्तकला शिकून घेतली. यंदा या साऱ्याजणीनी मिळून गणरायासाठी पर्यावरणस्नेही आभूषणे साकारली आहेत. लाकडापासून तयार होणाऱ्या मऊशार सोलावूडपासून लहान-मोठय़ा आकाराच्या मोगऱ्याच्या कळ्या, डय़ुप्लेक्स कागदापासून साकारलेली गुलाबाची फुले, विविधरंगी कापडाची लेस यांचा वापर करून अतिशय सुंदर मुकुट, तोडे, बाजूबंद आणि कंठी आदी आभूषणे आकारास आली आहेत. गणेशोत्सवात फुलांचे दर गगनाला भिडतात आणि फुलांच्या कंठ्या सर्वसामान्यांना खरेदी करणे परवडत नाहीत. मग प्लास्टीकची फले, मणी आणि खड्यांनी सजविलेल्या कंठ्या खरेदी केल्या जातात. त्या पर्यावरणाला घातक ठरतात. त्यामुळे प्रीती कदम यांनी पर्यावरणस्न्ोही साहित्यापासून आभूषणे बनविण्याचा निर्णय घेतला आणि घरकाम करणाऱ्या आपल्या विद्याíथनींची मदत घेतली. या महिलांना त्यांनी साहित्य दिले आणि शिकविल्याप्रमाणे महिलांनी आभूषणे साकारली. बाजारात मिळणाऱ्या फुलांच्या अथवा कृत्रीम आभूषणांच्या चुलनेत ही पर्यावरणस्नेही आभूषणे स्वस्त असल्याचा दावा प्रीती कदम यांनी केला आहे. घरकाम करणाऱ्या २० महिला फावल्या वेळेत हे अलंकार घडवून चार पसे मिळवू लागल्या आहेत. या महिलांच्या मदतीने पर्यावरण संवर्धनासाठी टाकलेले एक पाऊल खारुताईचा वाटा आहे. पण भविष्यात यातूनच मोठी चळवळ उभी राहू शकेल, असा विश्वास प्रीती कदम यांनी व्यक्त केला.