गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय उत्सव मानला जातो. भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत हा दहा दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घरात व सार्वजनिक मंडळांत गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. लालबागचा राजा (मुंबई), श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (पुणे) आणि मानाचे गणपती यांसारखी काही मंडळं राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहेत.
दरवर्षी विविध मंडळं भव्य देखावे, रोषणाई, मंदिरांच्या प्रतिकृती, तसेच पौराणिक कथांवर आधारित जिवंत देखावे साकारतात. पुण्यातील मध्यवर्ती पेठा, मुंबईतील सार्वजनिक मंडळं आणि कोकणातील गावागावांत उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, किर्तन, भजन, नाटकं, तसेच समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. लोकांना एकत्र आणून सामाजिक बंध वाढवणं हा या उत्सवाचा मोठा हेतू आहे. यंदा पुण्यात कुठे खंडोबा बानुचा विवाह सोहळा सादर केला जात आहे तर कुठे पद्मनाभस्वामी मंदिराची प्रतिकृती सादर केली जात आहे. दरम्यान एका मंडळाने पुण्यात गंगा घाट आरतीचा भव्य सोहळा आयोजित केला आहे. त्यामुळे पुणेकरांना पुण्यात राहून बनारसमधील गंगा घाट आरतीचा अनुभवा घेता येणार आहे.
बनारसची गंगा घाट आरती होते पुण्यात
गणेशोत्सवात पुणेकरांसाठी खास आकर्षण घेऊन आलंय एफ.सी. रोडवरील केसरिया मित्र मंडळ. यंदा त्यांनी गंगा घाटाची भव्य सजावट उभारली असून थेट बनारसहून चार पुजारी पुण्यात दाखल झाले आहेत. हे पुजारी दररोज तीन वेळा जिवंत गंगा आरती सादर करणार आहेत. दुपारी १२.३०, संध्याकाळी ७.३० आणि रात्री ९.३० वाजता होणारी ही आरती पुणेकरांसाठी अनोखा आध्यात्मिक अनुभव ठरणार आहे.
सोशल मीडियावर या गंगा घाट आरतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, जसे बनारसमध्ये गंगा घाटची आरती होते त्याप्रमाणे पुण्यातही ही आरती पार पडत आहे. बनारसचे पुजारी एका छोट्या स्टेजवर उभे आहेत जिथे गंगा घाट आरती करत आहे. हे दृष्य पाहण्यासाठी पुणेकरांना मोठी गर्दी केली आहे.
पुणेकरांनी मोठ्या संख्येने या सोहळ्याला हजेरी लावल्याचे दिसत आहे. तुम्हालाही पुण्यात राहून बनारसच्या गंगा घाट आरतीचा अनुभव घ्यायचा असेल तर या मंडळाला नक्की भेट द्या.