पिंपरी- चिंचवड: गणेश विसर्जन मिरवणूच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड शहरात शनिवारी तगडा बंदोबस्त असणार आहे. शहरात चौका- चौकात पोलीस बंदोबस्त असणार आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी कंबर कसली आहे.

शहरातील गणेश विसर्जन शांततेत पार पडावं यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे. यावर्षी गणपती बाप्पांना निरोप देताना डीजे चा दणदणाट आणि धिंगाणा खपवून घेतला जाणार नाही. असा इशारा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला आहे. बाप्पांची मिरवणूक म्हटलं की डीजेचा कर्कश्य आवाजाने नकोसा वाटतो. डिजेवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

पोलीस आयुक्तालयात सुमारे तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. यामध्ये एक सह पोलीस आयुक्त, एक अप्पर पोलीस आयुक्त, सहा पोलीस उपायुक्त, सहा सहाय्यक पोलीस आयुक्त, ६४ पोलीस निरीक्षक, २ हजार ३५० पेक्षा अधिक अंमलदार, २९१ सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, ४०० होमगार्ड, एक बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, १७ शीघ्र कृती पथक, सहा दंगल नियंत्रण पथके आणि दोन राज्य राखीव पोलीस दल यांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.