सामान्य भाविकांचे हाल ‘जैसे थे’च
मुंबई : Mumbai Ganeshotsav VIP Darshan Issue ‘लालबागच्या राजा’च्या दर्शनासाठी सामान्य नागरिक आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी (व्हीआयपी) असलेल्या वेगवेगळ्या रांगांमुळे लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला मानवाधिकार आयोगाने नोटीस बजावली आहे. मात्र, नोटिशीनंतरही ‘लालबागचा राजा’चे व्हीआयपी दर्शन सुरूच ठेवण्यात आले असून त्यामुळे सामान्य भाविकांना धक्काबुक्की सहन करत तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. दर्शन व्यवस्थेतील या भेदभावामुळे मानवाधिकार आयोगाने लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला ६ आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
लालबागच्या राजाच्या दर्शनसाठी गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाकडून व्हीआयपी रांगेची व्यवस्था केली जाते. देशभरातून लाखो भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र, सामान्य भाविकांना २४ – ४८ तास रांगेत ताटकळत उभे राहिल्यानंतर गणपतीचे दर्शन होते. अनेक वेळा भाविकांना धक्काबुक्की देखील केली जाते. मात्र, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या रांगेतून अनेकांना काही मिनिटांतच लालबागच्या राजाचे दर्शन मिळते. त्यामुळे दर्शन व्यवस्थेतील या भेदभावामुळे ॲड. आशिष राय व पंकजकुमार मिश्रा यांनी थेट मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती.
त्या तक्रारीची दखल घेत मानवाधिकार आयोगाने मंडळाचे अध्यक्ष व सचिवांसह राज्याचे मुख्य सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनाही नोटीस बजावली आहे. सहा आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र, असे असूनही मंडळाने व्हीआयपी दर्शन बंद केले नसल्याचे दिसून येत आहे.
तसेच, अन्य सामान्य नागरिकांना धक्काबुक्की करत हिन दर्जाची वागणूक देण्यात येत असल्यामुळे अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुख्य रस्त्यावरही भाविकांची प्रचंड गर्दी होत असून त्यात महिलांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे व्हीआयपी दर्शन बंद करण्याची मागणी भाविकांकडून केली जात आहे. तसेच, मंडळाच्या गर्दी नियंत्रणातील अभावामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
तक्रारदारांचे म्हणणे काय?
लालबागच्या अरुंद गल्लीतील गर्दी नियंत्रणात नाही. तसेच, तेथील व्यवस्थापनही अत्यंत असमाधानकारक आहे. त्यामुळे अनियंत्रित गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. मंडळाचे कार्यकर्ते महिलांना, दिव्यांगांना, ज्येष्ठ नागरिकांना जबरदस्तीने ढकलून देतात, ओढतात. त्या ठिकाणची अनियंत्रित गर्दी ही नेहमीची बाब झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने या अतिउत्साही कार्यकर्ते व सुरक्षा रक्षकांना दूर करून त्यांच्याऐवजी मानवी हक्कांचा सन्मान राखणारे प्रशिक्षित कर्मचारी नेमावेत.