लोकमान्य टिळकांना अभिप्रेत सार्वजनिक गणेशोत्सवाची मूळ संकल्पना जोपासणाऱ्या ११८ वर्षांचा इतिहास असलेल्या कल्याणच्या सुभेदारवाडा गणेशोत्सवात उत्सव व्यवस्थापनाचा यंदाचा मान स्त्री शक्तीला मिळाला असून २००१-०२ या वर्षांमध्ये व्यवस्थापन करणारे रिद्धी-सिद्धी महिला मंडळ यंदा पुन्हा हा उत्सव आपल्या कौशल्याने साजरा करणार आहेत. कल्याण शहरातील महिला वर्गाचा भरणा असलेल्या रिद्धी-सिद्धी मंडळामध्ये १९ वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीपासून ते ७५ वर्षांच्या आजीपर्यंत सुमारे ९० कार्यकर्त्यांची फौज आहे. पुढील वर्षीही याच मंडळाकडे उत्सवाचे व्यवस्थापन आहे.
कल्याण शहरामध्ये सुभेदारवाडा गणेशोत्सवाची एक वेगळी ओळख आहे. पारंपरिक सण साजरा करताना आधुनिक विचारांची प्रेरणा देणारा हा उत्सव संपूर्ण शहरवासीयांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असतो. शहरातील विविध संस्थांना प्रत्येकी दोन वर्षे या उत्सवाचे व्यवस्थापन करण्याची संधी दिली जाते. २००१-०२ मध्ये रिद्धी-सिद्धी महिला मंडळ आणि २००६-०७ साली उज्ज्वला महिला मंडळांनी व्यवस्थापनाची जबाबदारी घेतली होती. यंदा पुन्हा कल्याणच्या रिद्धी-सिद्धी महिला मंडळाने या उत्सवाचे व्यवस्थापन करण्याचे आव्हान स्वीकारले असून स्त्रियांची सामाजिक सुरक्षा आणि स्वामी विवेकानंदांच्या सार्थ शती वर्षांचे दर्शन आपल्या सुशोभिकरणातून घडवणार आहेत. त्यासोबत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लोकजागर करण्याचा प्रयत्नही या मंडळाने आपल्या विविध कार्यक्रमांतून केला आहे. यंदा या कार्यक्रमास ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, साप्ताहिक ‘लोकप्रभा’चे कार्यकारी संपादक विनायक परब, मानसोपचार तज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी आणि अ‍ॅड. उज्ज्वल निकम आदी मान्यवर उपस्थित राहून आपले विचार मांडणार आहेत. या व्यतिरिक्त शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, मुलांसाठी कठपुतळ्यांचा खेळ, तर महिलांसाठी गणेशोत्सवातील एक संपूर्ण दिवस राखून ठेवण्यात आला आहे. महिला विशेष दिवशी स्त्रीची सामाजिक सुरक्षितता या विषयावर एक विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये अभिनेत्री स्पृहा जोशी, शहरातील राजकीय, सामाजिक, पत्रकारिता, डॉक्टर, वकील या क्षेत्रांतील महिलांचा यामध्ये समावेश असणार आहे, अशी माहिती मंडळाच्या अपर्णा जोशी यांनी दिली. सुनीता केळकर या मंडळाच्या अध्यक्षा असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविले जाणार आहेत.