एड्स या रोगावर मात करणारी लस तयार करणे लवकरच शक्य होणार आहे. ‘ओरेगॉन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटी’त प्राण्यांवर करण्यात आलेल्या प्रयोगात या प्रायोगिक लशीने एचआयव्ही विषाणू नष्ट केला असून त्याचे कुठलेच अंश बाकी ठेवलेले नाहीत. हा विषाणू मानवेतर प्राण्यातील आहे. ज्याला ‘सिमियन इन्युनोडेफि शियन्सी व्हायरस’ म्हणजे ‘एसआयव्ही’ म्हणतात. तो माकडांमध्ये आढळून येतो. मानवातील एचआयव्हीवर याच पद्धतीने लस तयार करता येणे शक्य आहे. या विद्यापीठाच्या लस व जनुक उपचार संस्थेचे सहायक प्राध्यापक लुइस पीकर यांनी सांगितले की, ‘एचआयव्हीला पूर्णपणे नष्ट करणे अजून जमलेले नाही. पण त्यावर आता विषाणूरोधक औषधे व मूलपेशी प्रत्यारोपण तंत्राने मात करण्यात येत आहे. नव्या संशोधनात वापरलेल्या लशीमुळे विषाणू पूर्णपणे नष्ट झाला ही सकारात्मक बाब आहे. ‘सायटोमेगलोव्हायरस’ म्हणजे सीएमव्हीचा वापर या प्रयोगात करण्यात आला. सीएमव्ही व एसआयव्ही यांचा संयुक्त परिणाम यात साधला जातो. यात एका विशिष्ट प्रकारच्या टी पेशींमुळे एसआयव्ही बाधित पेशी नष्ट केल्या जातात. टी पेशी या शरीरातील रोगांविरोधात लढण्याचे काम करीत असतात पण पारंपरिक लशींनी त्या विषाणूंचा नाश करू शकत नाहीत.’ किमान पन्नास टक्के माकडात या लशीचा चांगला परिणाम दिसून आला आहे असा दावा पीकर यांनी केला. ‘नेचर’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.