सलामीवीर रॉबिन उथप्पाने तडाखेबाज ७५ धावा करूनही पुणे वॉरियर्सला आयपीएल क्रिकेट सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून १७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. १८८ धावांच्या लक्ष्याला सामोरे जाताना पुण्याने  २० षटकांत ९ बाद १७० धावा केल्या. ए बी डी’व्हिलियर्स सामनावीर ठरला.
बंगळुरूच्या घरच्या मैदानावर पावणेदोनशे धावांचा पाऊस पाडणाऱ्या ख्रिस गेलचा झंझावात रोखण्यात पुणे वॉरियर्सच्या गोलंदाजांना यश मिळाले. मात्र ए बी डी’व्हिलियर्सने शेवटच्या षटकात अशोक दिंडाला तीन चौकार व दोन षटकारांसह २६ धावा चोपल्या. त्यामुळेच आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील लढतीत रॉयल चॅलेंजर्सला पुण्यापुढे १८८ धावांचे आव्हान ठेवता आले.
बंगळुरूची गेलसोबत सौरभ तिवारीला सलामीला पाठविण्याची चाल यशस्वी ठरली. पण गेलला २१ धावांवर बाद करण्यात टी. सुमनने यश मिळविले. भुवनेश्वर कुमारने गेलचा सुरेख झेल टिपला. तिवारीने कर्णधार विराट कोहलीच्या साथीने ६.३ षटकांत ६३ धावा जमवीत संघाच्या डावाला आकार दिला. अशोक दिंडाने आपल्या पहिल्याच षटकात कोहलीचा त्रिफळा उडविला. तिवारीने ४५ चेंडूंत ५२ धावा केल्या. त्यानंतर मोझेस हेन्रिक्स व ए बी डी’व्हिलियर्स यांनी चौफेर टोलेबाजी करीत धावांचा वेग वाढविला. त्यांनी २९ चेंडूंमध्ये ६८ धावांची अखंडित भागीदारी केली. अब्राहमने सहा चौकार व दोन षटकारांसह नाबाद ५० धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ३ बाद १८७ (सौरभ तिवारी ५२, ए बी डी’व्हिलियर्स नाबाद ५०, टी. सुमन २/१५) विजयी वि. पुणे वॉरियर्स : २० षटकांत ९ बाद १७० (रॉबिन उथप्पा ७५, अँजेलो मॅथ्युज ३२,  विनयकुमार ३/३१, मुरली कार्तिक २/२९)
सामनावीर : ए बी डी’व्हिलियर्स.

पुणेरी मिसळ
प्रेक्षकांची खिलाडूवृत्ती!
पुणे वॉरियर्स हा घरचा संघ तर बंगळुरूचे ख्रिस गेल व विराट कोहली हे आवडते खेळाडू असा प्रश्न येथील प्रेक्षकांना पडला नाही तर नवलच. त्यावर तोडगा म्हणून प्रेक्षकांनी दोन्ही संघांचे ध्वज खरेदी करण्यास प्राधान्य दिले. काही प्रेक्षकांनी दोन्ही संघांच्या जर्सी एकाच वेळी घातल्या होत्या. जो संघ फलंदाजी करील त्या वेळी त्या संघाचा जर्सी घालून प्रोत्साहन देण्याचे तंत्र त्यांनी उपयोगात आणले. गेल व कोहली यांची छायाचित्रे असलेल्या छोटय़ा बॅनर्सना प्रेक्षकांकडून भरपूर मागणी होती. या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठीच अनेक प्रेक्षक आले होते. ‘गेल, विल यू मॅरी मी’, ‘ विराट, विल यू मॅरी मी’ अशी मागणी करणारीही पोस्टर्स काही उत्साही तरुणींच्या हातात होती.

गेलमुळे स्टेडियम हाऊसफुल
गेलने पुण्याविरुद्ध घरच्या मैदानावर नाबाद १७५ धावांची खेळी केली होती. त्यामुळे येथेही हा चमत्कार पाहावयास मिळेल या आशेने येथे स्टेडियम हाऊसफुल झाले होते. अनेक प्रेक्षकांना उभे राहूनच सामना पाहावा लागला. मात्र गेल लवकर बाद झाल्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली.

टाकाऊ कचऱ्यातून व्यवसाय!
पुणे व चेन्नई यांच्यात येथे नुकताच सामना झाला. त्या वेळी अनेक प्रेक्षकांनी सामना संपल्यानंतर पुणे वॉरियर्सचे ध्वज प्रेक्षकांच्या गॅलरीत टाकून दिले. हे ध्वज तीन-चार स्वयंसेवकांनी उचलले व आज येथे चक्क मोठय़ा किमतीला विकले. अशी नामी शक्कल त्यांनी लढवून कचऱ्यातून व्यवसाय साधला.

अँजेलो मॅथ्युजने कर्णधारपद सोडले
पुणे संघाचे कर्णधारपद सध्या आरोन फिन्च हा करीत आहे. तो स्वत:च्या वैयक्तिक कामगिरीत यशस्वी ठरला आहे. याउलट पुण्याचा अधिकृत कर्णधार अँजेलो मॅथ्युज याला संघातील स्वत:चे स्थानाविषयी खात्री नसल्यामुळेच त्याने पुण्याचे कर्णधारपद सोडत असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले.
– मिलिंद पुणेकर