आयपीएलमध्ये मुंबईला प्ले ऑफमध्ये जाण्यास अत्यंत महत्वाचा असलेला सामना दिल्ली डेअरडेव्हिल्सने जिंकला. अत्यंत रोमहर्षक पद्धतीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्लीने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत चमक दाखवली. पण सर्वाधिक लक्ष वेधले ते दिल्लीचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने. ऋषभने मुंबईविरोधात अवघ्या ४४ चेंडुत ६४ धावा ठोकल्या. यामध्ये ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. आपल्या या खेळीने पंतने एका अनोखा विक्रम आपल्या नावे नोंदवला. पंत आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा बनवणारा यष्टीरक्षक बनला आहे. त्याने कोलकाताचा यष्टीरक्षक रॉबिन उथप्पाचा विक्रम मोडला आहे. पंतने आयपीएलमध्ये आतापर्यंत ३८ सामने खेळले आहेत. यामध्ये १२३८ धावा बनवल्यात आहेत. आतापर्यंत त्याने ८ अर्धशतक आणि १ शतक ठोकले आहे. १६२.७१ हा त्याचा स्ट्राईक रेट आहे.

पंतने आयपीएल २०१८ मध्ये ६८४ धावा बनवल्या आहेत. ज्या अकराव्या हंगामातील कोणत्याही संघाच्या यष्टिरक्षकापेक्षा जास्त आहेत. रॉबिन उथप्पाने वर्ष २०१४ मध्ये ६६० धावा काढल्या होत्या. ऋषभ पंतचा विक्रम के एल राहुल तोडू शकतो. पंजाबच्या या फलंदाजाने या हंगामात ६५२ धावा बनवल्या आहेत. या हंगामात राजस्थान रॉयल्सचा यष्टीरक्षक जोस बटलरनेही चांगली कामगिरी केली आहे. बटलरने ५४८ धावा केल्या आहेत.

धावांच्या स्पर्धेत यष्टीरक्षक ऋषभ पंत सर्वांत पुढे आहे. त्याने या हंगामात १०५ सीमापार धाडले. यामध्ये ३७ षटकार आणि ६८ चौकार आहेत. एका हंगामात १०० पेक्षा जास्त चेंडू सीमापार करणारा तो दुसरा भारतीय आणि चौथा आयपीएल खेळाडु आहे. आयपीएलमध्ये सर्वांत पहिल्यांदा ख्रिस गेलने ही कामगिरी केली होती. त्याने एकदा नव्हे तर तीनवेळा चौकार आणि षटकारांचे शतक केले आह. त्याने आयपीएल हंगामात २०११, २०१२ आणि २०१३ मध्ये ही कामगिरी केली होती. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि विराट कोहलीने २०१६ मध्ये याची पुनरावृत्ती केली होती.