16 January 2021

News Flash

समजून घ्या : पराभवांची मालिका खंडीत करुन पंजाबचा रथ कसा आला विजयपथावर??

पंजाबच्या सलग ५ विजयांमुळे गुणतालिकेत रंगत कायम

साखळी फेरीत ४९ वा सामना झाल्यानंतर आयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिला संघ प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान पक्क करु शकला. चेन्नई सुपरकिंग्जने कोलकाता नाईट रायडर्सवर ६ गडी राखून मात केली आणि मुंबई इंडियन्सला प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवला. प्ले-ऑफची शर्यत रंगतदार होण्यामागे महत्वाचं कारण ठरलंय ते लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबने केलेलं दमदार पुनरागमन. स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात लागोपाठ पाच सामने गमावणाऱ्या पंजाबने यानंतर ख्रिस गेलला संघात स्थान देऊन लागोपाठ ५ सामने जिंकले. अचानक पंजाबच्या संघात हा बदल कसा झाला, नेमके पंजाबने संघात काय बदल केलेत हे आज समजावून घेणार आहोत.

सुरुवातीच्या टप्प्यात छोट्या फरकाने गमावले सामने –

स्पर्धेचा सुरुवातीचा टप्पा आपण आठवला तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की पंजाबच्या संघाने वाईट खेळ केला नव्हता. फक्त हातात आलेला सामना क्षुल्लक चुका करून ते गमावत राहिले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यात पंजाबचे फलंदाज ३ चेंडूत १ धाव काढू शकले नाहीत आणि सामना सुपरओव्हरमध्ये गेला. राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात पंजाबचे गोलंदाज २२३ धावांचं लक्ष्य डिफेंड करु शकले नाहीत. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्यात १७ चेंडूत २१ धावांचं सोपं आव्हानही पंजाबला पूर्ण करता आलं नाही. म्हणजेच मोक्याच्या क्षणी केलेल्या चुकांमुळे पंजाबने हे सामने गमावले. मात्र यानंतर RCB आणि मुंबईविरुद्ध सामन्यात पंजाबने अखेरपर्यंत झुंज देत विजयश्री खेचून आणली आणि त्यांचा आत्मविश्वास परत आला. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पंजाबच्या संघाने एक किंवा दोन सामने जिंकले असते तर गुणतालिकेत चित्र वेगळं दिसू शकलं असतं.

ख्रिस गेलच्या येण्यामुळे पंजाबला मिळाला मोठा आधार –

सुरुवातीच्या सामन्यांमध्ये लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल ही जोडी सेट झाल्यामुळे पंजाबने ख्रिस गेलला स्थान दिलं नाही. परंतू लागोपाठ होणारे पराभव आणि सोशल मीडियावर चाहत्यांची नाराजी लक्षात घेता पंजाबने गेलला संधी दिली. महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या सामन्यापासून गेल पंजाबच्या संघात आला त्यावेळपासूनच संघाला विजयी सूर गवसला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असताना ख्रिस गेल लोकेश राहुल आणि इतर फलंदाजांवरचं बरसचं दडपण कमी करतो. त्यातच फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या गेलचं दडपण हे प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांवरही असतंच. दिल्लीविरुद्ध सामन्यात तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर गेलने ठोकलेल्या २६ धावा आठवून पाहा…

निकोलस पूरनचं फॉर्मात येणं –

निकोलस पूरन हा पंजाबच्या फलंदाजीतला मधल्या फळीतला सर्वात मोठा खेळाडू. परंतू सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये पूरनच्या कामगिरीत सातत्य नसल्याचा फटका पंजाबला बसला. ज्या दिवशी फॉर्म असेल त्यादिवशी पूरन संघाला विजय मिळवून देईल अशी खेळी करेल…परंतू ज्या दिवशी फॉर्म नसेल त्यादिवशी झटपट बाद होऊन माघारी परतेल. परंतू गेल्या काही सामन्यांपासून पूरनच्या खेळात बदल झाला आहे. आपली जबाबदारी ओळखून पूरन अधिक चांगली फटकेबाजी करतो आहे. संघाला जिकडे गरज असेल तिकडे स्थैर्य देऊन खेळी करायची आणि जेव्हा गरज असेल तेव्हा फटकेबाजी करायची…यामुळे गेल्या काही सामन्यांपासून पूरनचं फॉर्मात येणं पंजाबला फायद्याचं ठरलंय. फलंदाजीव्यतिरीक्त क्षेत्ररक्षणातही पूरनची कामगिरी अव्वल दर्जाची आहे.

नवीन खेळाडूंची चांगली साथ –

अनुभवी मोहम्मद शमी हा पंजाबच्या गोलंदाजीचा कणा मानला जातो. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये विंडीजचा शेल्डन कोट्रेलही शमीच्या सोबत होता. शमीने काही सामन्यांमध्ये आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत चांगली कामगिरी केली. परंतू कोट्रेल आपल्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करु शकला नाही. तुलनेने युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने आपली जबाबदारी ओळखत आपल्या माऱ्याने सर्वांना प्रभावी केलं. धिम्या गतीचे चेंडू, यॉर्कर, ऑफ स्टम्प बाहेर चेंडू टाकून फलंदाजाला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न असं उत्तम मिश्रण अर्शदीप आपल्या गोलंदाजीत करतोय. अनेकदा महत्वाच्या सामन्यांत अर्धदीपने प्रतिस्पर्धी संघाची जमलेली जोडी फोडली आहे. याव्यतिरीक्त मुरगन आश्विन, रवी बिश्नोईहे युवा फिरकीपटूही चांगली कामगिरी करत आहेत.

याव्यतिरीक्त ग्लेन मॅक्सवेल फलंदाजीत चांगली कामगिरी करत नसला तरीही पंजाबचा संघ त्याचा वापर गोलंदाजीत करुन घेताना दिसत आहे. गेल्या काही सामन्यांपासून पंजाबच्या संघाने केलेला जिगरबाज खेळ हा वाखणण्याजोगा आहे. अशा परिस्थितीत यंदा या संघाने प्ले-ऑफचं तिकीट मिळवलं तर आश्चर्य वाटायला नको.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 2:16 pm

Web Title: five wins in a row after five losses how kings xi punjab bounced back psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 जाणून घ्या : मुंबईनंतर प्ले ऑफमध्ये कोणता संघ कशापद्धतीने होऊ शकतो क्वालिफाय
2 पराभवनानंतर KKR ची वाट बिकट; तरीही असे होऊ शकतील क्वालिफाय
3 धोनीला ऋतूराजच्या रुपात तरुण खेळाडूमध्ये सापडला स्पार्क, म्हणाला…
Just Now!
X