धोनीच्या चेन्नई विरोधात विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघामध्ये अंतिम ११ संघात बदल करण्यात आला आहे. आयपीएलच्या २५ व्या सामन्यात चेन्नईने आपल्या संघात एक तर बंगळुरुने दोन बदल केले आहे.

गेल्या काही सामन्यापासून अपयशी ठरणाऱ्या केदार जाधवला धोनीने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. केदार जाधवच्या ठिकाणी एन जगदीशन याला संधी देण्यात आली आहे. मागील सामन्यात केदार जाधवला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. सतत अपयशी ठरल्यामुळे केदार जाधव आणि चेन्नई संघाला टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जला १० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. एका क्षणाला सामन्यात वरचढ असणारा चेन्नईचा संघ काही क्षणांत बॅकफूटवर फेकला गेला. त्यातच केदार जाधवने मोक्याच्या क्षणी वाया घालवलेले चेंडू आणि संथ फलंदाजी याचा चेन्नईला मोठा फटका बसला. सोशल मीडियावर अनेकांनी केदार जाधवला संघातून वगळण्याची मागणी केली. अखेर चेन्नईने एन जगदीशनला संधी दिली आहे. एन जगदीशनचा आयपीएलमधील पहिलाच सामना असेल. तामिळनाडूच्या संघात जगदीशन यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडतो.

आरसीबीनेही आपल्या संघात दोन बदल केले आहेत. मोईन अली आणि मोहमद्द सिराजला वगळलं आहे. यांच्या जागेवर क्रिस मॉरिस आणि गुरकीरत सिंह मान यांना संधी देण्यात आली आहे. चेन्नई सातव्याही सामन्यात धावांचा पाठलाग करणार आहे.