आयपीएलच्या तेराव्या हंगामाला युएईत सुरुवात झाली आहे. अबु धाबीच्या मैदानावर गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना खेळवण्यात येत आहे. चेन्नईचा कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक यांनी धडाकेबाज सुरुवात केली. रोहितने दिपक चहरच्या पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला. दुसऱ्या बाजूने क्विंटन डी-कॉकनेही फटकेबाजी करत चेन्नईच्या गोलंदाजांची पिसं काढली.

अवश्य वाचा – IPL 2020 : सुरुवातच दणक्यात ! पहिल्याच चेंडूवर ‘हिटमॅन’चा विक्रमी चौकार

पहिल्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांमध्ये ४६ धावांची भागीदारी झाल्यानंतर फिरकीपटू पियुष चावलाने मुंबईला पहिला धक्का दिला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला १२ धावांवर माघारी धाडण्यात चावला यशस्वी ठरला. या विकेटसह आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चावलाला तिसरं स्थान मिळालं आहे.

रोहित शर्मा हा पियुष चावलाचा आयपीएलमधला १५१ वा बळी ठरला. चावलाने आपला सहकारी हरभजन सिंहला मागे टाकलं. यंदाचा हंगाम हरभजन सिंह खेळणार नसल्यामुळे चावलाला आपलं स्थान अधिक बळकट करण्याची संधी आहे.