आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपलं आव्हान टिकवण्यासाठी दिल्लीविरुद्ध सामन्यात विजय आवश्यक असलेल्या RCB ला पराभवाचा सामना करावा लागला. अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनी सुरेख फलंदाजी करत अर्धशतकी खेळी करत दिल्लीच्या विजयाचा पाया रचला. परंतू १७.३ षटकांच्या आत सामना जिंकण्यात दिल्लीला अपयश आल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुलाही प्ले-ऑफचं तिकीट मिळालं. गेल्या काही सामन्यांपासून RCB चा संघ सूर गमावून बसला आहे. फिंचच्या जागी बंगळुरुच्या संघ व्यवस्थापनाने जोशुआ फिलीपला संधी दिली आहे. परंतू गेल्या काही सामन्यांमधील RCB च्या फलंदाजांनी कामगिरी पाहता फिंच खेळणार नसेल तर विराटने फलंदाजीसाठी सलामीला यावं अशी मागणी माजी भारतीय गोलंदाज आशिष नेहराने केली आहे.

“दिल्लीविरुद्ध सामन्यात विराटवर दबाव होता हे स्पष्ट जाणवत होतं. रविचंद्रन आश्विन, अक्षर पटेल यासारख्या फिरकीपटूंना फटकेबाजी करणं सोपं नसतं. हे गोलंदाज कदाचीत तुमची विकेट घेणार नाहीत पण ते तुम्हाला धावाही करु देणार नाहीत. दिल्लीच्या गोलंदाजांनी विराटला धावा करण्याची फारशी संधीच दिली नाही याबद्दल त्यांचं कौतुक करायला पाहिजे. पण यापुढील सामन्यांत जर RCB फिंचला खेळवणार नसेल तर विराटने फलंदाजीसाठी सलामीला यावं.” Star Sports वाहिनीवर कार्यक्रमात आशिष नेहरा बोलत होता.

दिल्लीविरुद्ध सामन्यात विराट कोहलीने २४ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह २९ धावांची खेळी केली. परंतू संघाला गरज असताना विराट रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. गेल्या काही सामन्यांपासून विराट कोहलीचा ढासळलेला फॉर्म हा देखील संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे यापुढील सामन्यांत RCB चं टीम मॅनेजमेंट यावर काय तोडगा काढतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.