रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध सामन्यात सुपरओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर गतविजेत्या मुंबई इंडियन्सने धडाकेबाज पुनरागमन केलं आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबवर ४८ धावांनी मात करत मुंबईने या हंगामातला आपला दुसरा विजय नोंदवला आहे. विजयासाठी मिळालेल्या १९२ धावांचा पाठलाग करताना पंजाबचा संघ २० षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात १४३ धावांपर्यंत मजल मारु शकला.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माने ७० धावांची खेळी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र अखेरच्या षटकांमध्ये रोहित माघारी परतल्यानंतर पोलार्ड आणि पांड्या यांनी सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत चौफेर फटकेबाजी करत धावांची लयलूट केली. त्यातच पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने अखेरचं षटक ऑफ स्पिनर कृष्णप्पा गौथमला दिलं, ज्याचा मुंबईला फायदाच झाला. भारतीय संघाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरनेही राहुलच्या याच निर्णयावर आश्चर्य व्यक्त करत पोलार्ड-पांड्या समोर असताना ऑफ स्पिनरला बॉलिंग कोणं देतं असं म्हणत कपाळावर हात मारला आहे…

दरम्यान, पंजाबच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच अंकुश लावण्याचं काम मुंबईच्या गोलंदाजांनी केलं. मोठे फटके खेळण्याची संधी न देता पंजाबच्या फलंदाजांवर दडपण आणण्यात मुंबईचे गोलंदाज यशस्वी ठरले. मुंबईकडून जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी २-२ तर ट्रेंट बोल्ट आणि कृणाल पांड्या यांनी १-१ बळी घेतला.