गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपला विजयी परंपरा कायम राखली आहे. शारजाच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनराईजर्स हैदराबादवर ३४ धावांनी मात केली. २०९ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला हैदराबादचा संघ १७४ धावांपर्यंतच मजल मारु शकला. हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ६० धावांची खेळी करत आक्रमक खेळी केली. परंतू दुसऱ्या बाजूने त्याला योग्य साथ मिळाली नाही. मुंबईच्या गोलंदाजांनीही या सामन्यात टिच्चून मारा करत हैदराबादला फार मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही.

शारजाच्या मैदानावर आतापर्यंत झालेल्या सामन्यांत दोन्ही संघांनी २०० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे हैदराबादचे फलंदाजही मुंबईला कडवं आव्हान देणार की काय असं चित्र निर्माण झालं. परंतू मुंबईच्या गोलंदाजांनी सुरेख मारा केला. सामना संपल्यानंतर कर्णधार रोहितनेही आपल्या सहकाऱ्यांचं कौतुक केलं. “आम्ही मैदानात उतरलो तेव्हा काही खास उद्दीष्ट ठेवून उतरलो नव्हतो. मी फक्त माझ्या गोलंदाजांना त्यांचं काम चोख बजावण्यासाठी पाठींबा दिला आणि त्यांनी ते काम करुन दाखवलं. कधीकधी ही रणनिती यशस्वी होते तर कधी नाही होत…पण तुम्ही सर्वोत्तम कामगिरी करणं अपेक्षित असतं. मी माझ्या डोक्यातले विचार गोलंदाजांवर थोपवत नाही. ते मला रणनिती सांगतात आणि त्याप्रमाणे मी फिल्डींग लावतो. गोलंदाजांकडून अशा कल्पना येणं नेहमी चांगलं असतं.”

जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर जोडीने हैदराबादच्या डावाची आश्वासक सुरुवात केली. ट्रेंट बोल्टने बेअरस्टोला माघारी धाडत मुंबईला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर मनिष पांडे आणि वॉर्नर यांनी पुन्हा एकदा भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी मैदानात स्थिरावणार असं वाटत असतानाच मनिष पांडे जेम्स पॅटिन्सनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने ३० धावांची खेळी केली. यानंतर हैदराबदच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केली. एकीकडे कर्णधार वॉर्नर फटकेबाजी करत असतानाही केन विल्यमसन आणि प्रियम गर्ग स्वस्तात माघारी परतले. यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नरही पॅटिन्सनच्या गोलंदाजीवर इशान किशनकडे झेल देत माघारी परतला. त्याने ४४ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ६० धावा केल्या.

यानंतर अब्दुल समद आणि अभिषेक शर्मा या युवा फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन आणि जसप्रीत बुमराहने यांनी प्रत्येकी २-२ तर कृणाल पांड्याने एक बळी घेतला.