आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपला अखेरचा सामना खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने पहिल्यांदाच संघात महत्वपूर्ण बदल केले. हैदराबादविरुद्ध सामन्यात कर्णधार रोहित शर्मानेही संघात पुनरागमन केलं. परंतू पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईचा डाव चांगलाच कोलमडला. हैदराबादच्या माऱ्यासमोर मुंबईचे फलंदाज झटपट माघारी परतले. परंतु सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी छोटेखानी भागीदारी करत आयपीएलच्या इतिहासात एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.

आयपीएलच्या इतिहासात एकाच संघाकडून खेळताना एकाच हंगामात दोन Uncapped खेळाडूंनी ४०० पेक्षा जास्त धावा करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार आणि किशनने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी ४२ धावा जोडल्या. सूर्यकुमार यादव शाहबाज नदीमच्या गोलंदाजीवर यष्टीचीत होऊन माघारी परतला आणि मुंबईची जोडी फुटली. सूर्यकुमारने ३६ धावांची खेळी केली.